Monday 22 January 2018

मृगजळ

नेहा एक निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीतील सामान्य रंग रूपाची आणि बुद्धीची बारावी कॉमर्सला शिकणारी मुलगी. मुंबईतील धारावीमध्ये छोट्या दोन रुमच्या ब्लॉकमध्ये ती, तिचे एका बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे वडील, आई आणि एक लहान भाऊ राहत होते. नेहाला कॉलेजमध्ये फारसे कोणी मित्र मैत्रिणी नव्हते. याला कारण तिचा एकलकोंडा, अबोल स्वभाव. छान कपडे घालावेत, स्टायलिश राहावं, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात रमावं, आपल्यालाही एक खास मित्र असावा, असे तिला फार वाटे. पण एकंदर परिस्थितीमुळे तिचे हे मनोरथ मनातच विरून जात. समवयस्क मुला मुलींना हास्य विनोद करताना पाहून तिला फार असूया वाटे. आपल्या परिस्थितीची चीड येई. आणि ती अजूनच अंतर्मुख होत असे. एक प्रकारचा न्यूनगंड तिच्यात वाढीस लागला होता.
कधी नव्हे ते नेहा आज खुशीत होती. त्याला कारणही तसेच होते. गेले दोन महिने ती तिच्या बाबांना एक सेकंडहँड स्मार्टफोन घेऊन द्या म्हणून सांगत होती. आज त्यांनी तिच्यासाठी आपल्या बँकेतील एका सहकाऱ्याचा दोन वर्ष जुना स्मार्टफोन उधारीवर खरेदी केला होता. थोडे थोडे करून ते त्या सहकाऱ्याला पैसे देणार होते. मोठ्या अपूर्वाईने तिने बाबांच्या हातून फोन घेतला. उलटपालट करून पाहिला. हात रुमालाने स्वच्छ पुसला आणि जुन्या साध्या मोबाइल फोनमधील सिमकार्ड काढून त्या  स्मार्टफोन  मध्ये घातले. फोन सुरू केल्यावर त्याच्या स्क्रीनवरील रंगबिरंगी आयकॉन्स ती अनिमिष नेत्रांनी बघू लागली. बाबांकडून थोडे पैसे घेऊन जवळच्या दुकानात जाऊन तिने नेटपॅक विकत घेतला. घरी येऊन तिने व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर असे अॅप्स मोबाइल फोनवर इन्स्टॉल केले. फेसबुकवर तिने स्वतःचे अकाऊंट तयार केले. आणि त्यावर प्रोफाइल फोटो म्हणून ऐश्वर्या या प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्रीचा सुरुवातीच्या काळातला फोटो लावला. तिच्या बरोबर शिकणाऱ्या काही मुला मुलींना फेसबुकवर शोधून तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही दूरस्थ, अनोळखी मुलांची नावं अंदाजे टाइप करून त्यांनाही तिने फ्रेंड रिक्वेट पाठवली. यातील एक होता क्रिश जॉन्सन.
                                    ******

क्रिश त्याच्या ऑस्ट्रेलियातील सिडनी मधील घरात लॅपटॉपवर कॉलेज असाइनमेंट पूर्ण करण्यात गढून गेला होता. मोबाईल फोनवरील नोटिफिकेशन साउंडने त्याची तंद्री भंग पावली.  त्याने मोबाईल उचलून पाहिला फेसबुकवर एक नवी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. साहजिक कुतुहलाने त्याने रिक्वेस्ट पाठवणाऱ्या व्यक्तीचा प्रोफाइल उघडून पाहिला. "wow ! beautiful !!" प्रोफाइल वरचा फोटो पाहताच त्याच्या तोंडून सहजोद्गार निघाले. लगेच त्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि फेसबुक मेसेंजरवरून मेसेज पाठवला. "Hi ! thanks for the request. You are very beautiful. what's the meaning of your name ? Neha ?" मेसेंजरचा नोटिफिकेशन साऊंड एेकताच  नेहाने मेसेज बॉक्स उघडला. क्रिशचे प्रोफाईल पाहून आणि मेसेज वाचून ती रोमांचित झाली. आयुष्यात प्रथमच कोणीतरी, त्यातही एका हॅण्डसम फॉरेनर मुलाने तिची स्तुती केली होती. नेहा हरखून गेली. लगेच तिने त्याला रिप्लाय केले. "Hi ! thanks. Meaning of my name is Love." यानंतर त्या दोघांनी जवळपास अर्धा तास चॅटिंग केले. क्रिशने तिला स्वतःबद्दल बरंच काही सांगितलं. सिडनीमध्ये तो इंटरनॅशनल फायनान्स या विषयात ग्रॅज्युएशन करत होता. त्याच्या वडिलांची सुपर शॉप्सची चेन होती. त्याची आई भारतीय असून मुंबईतील होती. बावीस वर्षांपूर्वी ती ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी आली असताना क्रिशच्या वडिलांशी तिची भेट झाली आणि त्यांनी लग्न केले. दोन वर्षांनी क्रिशचा जन्म झाला. क्रिश हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याला त्याच्या आईची जन्मभूमी मुंबईत एकदा भेट देण्याची इच्छा होती. नेहाने तिचे आई वडील डॉक्टर असल्याचे क्रिशला खोटेच सांगितले. क्रिश सोबत चॅटिंग केल्यापासून नेहा जणूकाही हवेत तरंगत होती. तिला या सगळ्याचे खूपच अप्रूप वाटत होते. एक प्रकारच्या आभासी जगात ती विहरत  होती. त्यानंतर रोजच किमान एकदा ती दोघं फेसबुक मेसेंजरवर भेटू लागली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले. क्वचित कधितरी क्रिश तिला फोन कॉल सुद्धा करायचा. अशातच क्रिशने तिच्यावरच्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली. नेहाला आभाळ कवेत आल्यासारखे वाटू लागले. तिला जणू स्वर्ग दोन बोटे उरला. क्रिशने नेहाला तिचे अजून काही फोटो पाठवायला सांगितले. तिने ऐश्वर्याचे काही काळापूर्वीचे फोटो इंटरनेट वर शोधून त्याला पाठवले. हे आभासी जगच तिला खरे वाटू लागले. तिच्या मनात कायम क्रिशचेच विचार असायचे. हळू हळू अभ्यासातील तिचे लक्ष उडाले. घरातील कामात आईला मदत करताना छोट्या छोट्या चुका होऊ लागल्या. कधीतरी तिला वाटे की क्रिशला सगळं खरं सांगून टाकावं आणि आपला खरा फोटो सुद्धा पाठवून द्यावा. पण एकदा चॅटिंग करताना तिने क्रिशला विचारले, "which quality of mine impress you the most ?" क्रिशने लगेच उत्तर दिले , "Your divine beauty.."
हे ऐकल्यावर तिने त्याला खरं सांगायचा विचारही सोडून दिला. या मृगजळा पासून दूर जाण्याची तिची इच्छा नव्हती. ती या सगळ्यांत अधिकच गुंतत चालली होती.

डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा होता. आज नेहाला थोडी कणकण असल्याने ती कॉलेजला न जाता घरी आराम करत होती.  दुपारचे तीन वाजले होते. तिने मोबाइलवर मेसेंजर उघडून पाहिले क्रिश ऑफलाइन होता. तिच्या लक्षात आले, ऑस्ट्रेलियात आता रात्रीचे साडेआठ वाजले असणार आणि क्रिश सॅटर्डे नाईट आऊटसाठी बाहेर असणार. तिने सहज जीमेल बॉक्स उघडला. त्यात क्रिशने काही तासांपूर्वी पाठवलेले मेल दिसत होते. अधीरतेने तिने मेल वाचायला सुरुवात केली.

Dearest Neha,
Here is a big surprise for you. I am coming to Mumbai on Friday, 29th December. I am eager to meet the most beautiful girl in the world.

पुढे त्याने त्याच्या फ्लाइटचे आणि हॉटेल बुकिंगचे डिटेल्स दिले होते आणि नेहा त्याला मुंबईत आल्याबरोबर एअरपोर्टबाहेर दिसावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. क्रिशची ममा जरी मुंबईतील होती तरी अॉस्ट्रेलिअन माणसाशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी काही संबंध ठेवले नव्हते. त्यामुळे क्रिश हॉटेलमध्ये राहणार होता. भारतात खास करून मुंबईला भेट देण्याची त्याची इच्छा माहित असल्याने त्याच्या ममा डॅडकडून त्याला सहज संमती मिळाली होती.  ईमेल वाचताना नेहाचे हात थरथरत होते. घशाला कोरड पडली होती. कशीतरी उठून माठाजवळ जाऊन ती दोन तीन ग्लास पाणी प्यायली. काहीतरी मौल्यवान असे हातातून निसटून चालले आहे या वैफल्याने आणि खोटेपणाच्या दडपणाने ती खूप अस्वस्थ झाली. तिने क्रिश च्या मेलला काही उत्तर न देता, त्याला कुठलाही मेसेज न पाठवता मोबाईल स्विचऑफ करून कपाटाच्या आतल्या खणात ठेवून दिला आणि घरात अस्वस्थपणे येरझारा घालत विचार करू लागली, 'आपलं खरं रंगरूप, परिस्थिती क्रिशला समजल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ? तो नक्कीच आपला तिरस्कार करेल. कदाचित आपल्या घरच्यांना भेटून आपला खोटेपणा उघडकीस आणेल. अरे देवा !! हे काय होऊन बसलं ?  त्याला आपण मुंबईच्या बाहेर जातो आहोत असं खोटं सांगू यात का ? पण त्याचा काय उपयोग ? कधी ना कधी तो इथे येणारच.'  खूप विचारांती नेहाने त्याच्याशी पूर्णपणे संपर्क थांबवण्याचे पक्के ठरवले. अगतिकतेने तिचे डोळे भरून आले.
                                  ******
सहार एअरपोर्टच्या सर्व्हिस काउंटरवर आपले ई टुरिस्ट व्हिसा डॉक्युमेंट दाखवून बाकी औपचारिकता पूर्ण करून क्रिश बाहेर आला आणि उत्सुकतेने नेहा कुठे दिसते का ? ते पाहू लागला. चार दिवसांपासून नेहाने त्याच्या मेसेजेस, ईमेल आणि फोन कॉल्सला उत्तर दिले नव्हते त्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती. ती बरी असेल ना? कि तिचा मोबाइल हरवला असेल? अशा अनेक शंका त्याच्या मनात येत होत्या. काही झाले तरी मुंबईत येऊन नेहाला भेटण्याचे त्याने नक्की ठरवले होते. बराच वेळ तिची वाट पाहून, तिला पुन्हा पुन्हा कॉल करूनही काही उत्तर येत नव्हते. कंटाळून क्रिश टॅक्सी करून, इंटरनेट वरून बुक केलेल्या, हॉटेलच्या रूमवर आला. साडे चौदा तासांच्या प्रवासाने तो खरं तर दमला होता. त्याला जेटलॅग  ही जाणवत होता फ्रेश होऊन त्याने थोडी झोप घेण्याचे ठरवले. दोन तास झोपून उठल्यावर त्याने नेहाला परत कॉल केला. यावेळेस दोन तीनदा रिंग वाजून कॉल डिस्कनेक्ट झाला. परत कॉल केल्यावर मोबाइल स्विच अॉफ असल्याचा ऑपरेटरचा मेसेज आला. नेहाशी कसा संपर्क साधावा ? हे त्याला कळत नव्हते. त्याच्या जवळ तिच्या घराचा किंवा कॉलेजचा पोस्टल अॅड्रेस सुद्धा नव्हता. आता क्रिशला नेहाचा संशय येऊ लागला. त्याला स्वतःच्या मूर्खपणाची चीड आली. गुगलवर 'नेहा शर्मा मुंबई' असे टाकून त्याने तिच्या बद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. पण त्याला तिच्या फेसबुक प्रोफाइल शिवाय तिच्या माहितीशी जुळणारं असं काही मिळालं नाही. नेहाने तिच्या खोलीतून समुद्र दिसतो असे सांगितल्याचे त्याला आठवले म्हणून त्याने बीचेसच्या आजूबाजूच्या रहिवासी भागात टॅक्सीतून फिरून तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला सापडणं  शक्यच नव्हतं. तेथील काही लोकांना त्याने तिचा मोबाईलवरील फोटो दाखवून ही मुलगी कुठे राहते ? असं विचारल्यावर ती लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. त्यातील एकाने त्याला सांगितले की ही बॉलिवूड  फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या आहे. ते ऐकून क्रिशला प्रचंड धक्का बसला.
नेहाने आपल्याला मुर्ख बनवले अशी त्याची खात्री पटली. त्याने मुंबई पोलीस सायबर सेलची मदत घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने सायबर सेलला ऑनलाइन कम्प्लेंट दिली. कम्प्लेंट देऊन दोन दिवस झाले तरीही त्याला सायबर सेल वरून कुठलाही रिप्लाय आला नव्हता.
त्याच्या डॅडने त्याला काही मदत लागली तर संपर्क करता यावा यासाठी मुंबईतील ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट मधील आपल्या एका मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. त्याच्या ममानेही तिच्या एका मुंबईतील मैत्रिणीचा फोन नंबर आणि पत्ता त्याला दिला होता. त्या दोघांनाही फोन करून त्याने सगळं सविस्तर सांगितलं. त्याचे मुंबईत येण्याचे प्रयोजनही सांगितले. दोघांनीही त्याला मदत करण्याचे मान्य केले. त्याच्या आईची मैत्रीण, त्याच्यासोबत मुंबईतील बीकेसी रोडस्थित सायबर सेल  पोलिस स्टेशनमध्ये आली. तेथील  सायबर सिक्युरिटी  एक्सपर्ट ने क्रिशच्या मोबाइलवर मेसेंजर थ्रू येणारे मेसेजेस तपासले. मेसेजेस ज्या डिव्हाइसवरून आले होते त्याचे लोकेशन बांद्र्याच्या आसपासचे दिसत होते. पण आता ते डिव्हाइस वापरात नसावे असे वाटत होते.   त्याच्या डॅडच्या ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट मधील मित्राने आपली ओळख वापरून पोलिसांना ते ठिकाण शोधून काढण्याची विनंती केली. पुढच्या तीन चार दिवसांत पोलिसांनी मोबाइल चे कॉल डिटेल्स वापरून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून नेहाचा पत्ता शोधून काढला. नेहाला तिच्या आई वडिलांबरोबर पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. नेहाला पाहून क्रिश आश्चर्य चकित झाला. इतकी सर्वसामान्य मुलगी अशी फसवणूक करेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सर्व प्रकार कळल्यावर नेहाचे वडील डोक्याला हात लावून खुर्चीत कोसळले. तिची आई रडायला लागली. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मान खाली घालून उभी होती. आज ती  कोणाशीही नजर मिळवू शकत नव्हती. धरणीने दुभंगून आपल्याला पोटात घ्यावं असं तिला वाटत होतं. क्रिश बरोबर आलेली त्याच्या आईची मैत्रीण नेहावर खूप संतापली होती. "काय केलंस तू हे ?? एका मुलाच्या आयुष्याशी खेळताना तुला लाज कशी नाही वाटली?" क्रिश नेहा जवळ जाऊन पाणावलेल्या डोळ्यांनी एवढंच म्हणाला, "You cheated me. you badly played with my emotions. but please don't do this again to anybody." पोलिसांनी नेहाच्या वडिलांना सांगितले की क्रिशने नेहाविरुद्ध कम्प्लेंट फाइल केल्यास तिला १ ते ३ वर्षांची शिक्षा आणि पंचवीस ते पन्नास हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. पण क्रिशचा टुरिस्ट व्हिसा तीसच दिवसांचा  असल्याने आणि तसेही त्याला आता इथे जास्त दिवस थांबण्याची  इच्छा नसल्याने त्याने नेहा विरुद्ध  कंप्लेंट दिली नाही. पोलिसांनी नेहाला समज देऊन सोडून दिले. 
                                   ******
आज दहा दिवसांनी क्रिश मुंबई हून सिडनीला जड मनाने, एक दुस्वप्न सोबत घेउन निघाला होता. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी.