Thursday 22 March 2018

फेसबुक डेटा लीक प्रकरण

फेसबुक डेटा लीक प्रकरण 

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेसबुकला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. #DeleteFacebook चे आवाहन जगभरातून जोर धरत आहे. हे आवाहन व्हॉट्सअॅप चा सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन याने जगभरातील लोकांना केले आहे.  अमेरिका आणि कॅनडात एक कोटी युजर्सने आपली फेसबुक अकाऊंट्स डिलीट केली आहेत. भारतात हा आकडा लाखांच्या घरात असेल.
२०१६ मध्ये अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून अप्रत्यक्षपणे  लीक झाली होती.  विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इलेक्शन कॅम्पेन हाताळणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी होती केंब्रिज अॅनालिटिका. ही इंग्लंडमधील एक मोठी डेटा अॅनालिटिक्स कंपनी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीत शिकणार्‍या अलेक्झांडर कोगन याने एक पर्सनॅलिटी क्विझ अॅप या कंपनीच्या मदतीने डेव्हलप करून फेसबुकमध्ये सामील केले.   खरे तर फेसबुकवर असे बरेच अॅप्स तुम्ही वापरले असतील. उदाहरणा दाखल "तुम्ही मागच्या जन्मी कोण होता?", "कुठल्या सेलिब्रिटीशी तुमचा चेहरा मिळतो?" किंवा "तुमचे खरे प्रोफेशन काय असायला हवे?" वगैरे. हे अॅप्स वापरताना तुमची परमिशन घेऊन तुमचा डेटा एक्सेस केला जातो.  तर या कोगन महाशयांनी अशा रीतीने पाच कोटी युजर्सचा डेटा मिळवून केंब्रिज अॅनालिटिकाला पुरवला. 
या डेटामधील युजर्सचे पॉलिटिकल व्ह्यूज, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे वैयक्तिक मतं, अपेक्षा या सगळ्याचा अभ्यासपूर्वक वापर करून ट्रम्प यांच्या इलेक्शन कॅम्पेन ची आखणी करण्यात आली, असा आरोप आहे. या सगळ्यांत फेसबुकचा प्रत्यक्ष संबंध नसताना नुकसान मात्र त्यांनाच सोसावे लागत आहे. फेसबुकचे मार्केट कॅपिटल ५० अब्ज डॉलर्सने घटले आहे. लाखो लोक फेसबुकवरून आपले अकाउंट डिलीट करत आहेत. काही देशात फेसबुकची चौकशी सुरू आहे. फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. भारतात फेसबुकचे वीस कोटी युजर्स आहेत. हा आकडा एकूण युजर्सच्या दहा टक्के आहे. म्हणूनच कदाचित भारतीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर माफी मागितली आहे आणि फेसबुकवरील सुरक्षा प्रणाली अजून जास्त अद्ययावत  करण्याची हमी दिली आहे. जेणे करून अशा प्रकारचे युजर्स डेटा लीक भविष्यात टाळता येतील.

कविता दातार
Cyber Security Consultant