Saturday 4 January 2020

#PUBG

#PUBG


नीरज आज सकाळपासून तणावात होता. आईने दोन-तीनदा कारण विचारूनही तो गप्पगप्पच होता. आजपासून त्याची विद्यापीठाची परिक्षा सुरु होणार होती. पहिलाच पेपर इकॉनॉमिक्सचा होता. यापूर्वी नीरजने दर वर्षी परीक्षेत डिस्टिंक्शन मिळविले होते. पहिल्या पाचात त्याचा नंबर ठरलेला असायचा. पण आज. . .

त्याने इकॉनॉमिक्सची क्वेश्चन बँक वरवर पाहिली. काहीच समजत नव्हतं. अभ्यासच झाला नाही तर क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन-अॅन्सर्स काय समजणार? त्याला स्वतःचाच खूप राग येत होता. तो विचार करत होता, 'का अडकलो मी या PUBG च्या जंजाळात?? अभ्यास सोडून का तासंतास हा गेम खेळत बसलो??'

चार महिन्यांपूर्वी मित्रांच्या नादाने नीरजने PUBG खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला अर्धा पाऊण तास खेळणारा नीरज हळूहळू  त्या गेम मधल्या मनोरंजक घडामोडींमुळे तीन-चार तास PUBG खेळायला लागला. त्यापुढे जाऊन कॉलेज, क्लास बुडवून घराजवळच्या बागेत बसून तो आपल्या मोबाइल वर हा व्हिडिओ गेम वेड्यासारखा खेळत बसायचा. रात्री परत अभ्यासाच्या नावाखाली आपल्या खोलीचे दार लावून अॉनलाईन आलेल्या इतर मित्रांसोबत उशिरा पर्यंत खेळायचा. यामुळे परीक्षेचा दिवस उजाडला तरीही त्याचा काहीही अभ्यास झाला नव्हता.

इकॉनॉमिक्सचा ‍पेपर नीरजच्या समोर होता. एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला येत नव्हतं. उत्तरपत्रिकेत जरूरी ती माहिती भरून तो नुसताच बसला होता. तीन तासांचा वेळ कसा काढावा त्याला कळत नव्हतं. स्वतःबद्दल त्याच्या मनात संताप भरून राहीला होता. त्या तिरिमिरीतच त्याने उत्तरपत्रिकेत ‘PUBG गेम मोबाइल वर कसा डाउनलोड करायचा? मित्रमैत्रिणींचा अॉनलाईन गृप बनवून कसा खेळायचा? त्यातल्या टीप्स अँड ट्रिक्स' याविषयी सविस्तर लिहून टाकलं आणि अर्धा तास आधीच परीक्षा हॉलच्या बाहेर पडला.

दोन महिन्यांनंतर नीेरजचा रिझल्ट लागला. अपेक्षेप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षेत तो नापास झाला. दर वर्षी परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवणारा अभ्यासू नीरज चक्क नापास झाल्याने आईवडिल हादरले. त्याला विश्वासात घेऊन कारण विचारल्यावर सगळ्याचा उलगडा झाला.

आई-वडिलांनी त्याला न रागावता समजावून सांगितलं. समुपदेशकाची मदत घेतली. नीरजलाही स्वतःची चूक समजली. त्याने PUBG खेळण्याचे व्यसन सुटावे यासाठी स्वतःहून मोबाइल आईजवळ दिला आहे आणि परत परीक्षेची तयारी करतो आहे.

नीरजला भेटण्यासाठी गेले असताना त्याने सांगितले, 'अजूनही PUBG च्या प्रतिमा माझ्या मनात सतत रेंगाळत असतात. पण मी प्रयत्नपूर्वक त्यापासून दूर राहण्याचे ठरवले आहे कारण तो गेम किती धोकादायक आहे, याची मला जाणीव आहे.'

जगभरातील १३ ते ३० वयोगटातील २० करोड लोक PUBG खेळतात. यात मुलांचे प्रमाण अधिक आहे.

सोशल नेटवर्कींग आणि गेमिंग च्या अभ्यासकां नुसार PUBG च्या आकर्षक डिझाइन मुळे आणि त्यामधील मनोरंजक घडामोडींमुळे या गेमचे व्यसन लवकर लागते. काही मुलांचे शैक्षणिक वर्ष या खेळाच्या व्यसनापायी वाया गेले आहे.

या खेळाच्या संदर्भात काही मुलामुलींशी संवाद साधल्यावर जाणवंलं की काहींना या खेळाचे व्यसन लागेल अशी भीती वाटते म्हणून ते त्यापासून कटाक्षाने दूर राहतात. एका २२ वर्षांच्या मुलाने सांगितले की हा खेळ त्याचे बहुतेक मित्रमैत्रिणी कमीअधिक प्रमाणात खेळतात. सुरुवातीला मित्रांचा खेळ बघायला त्याला आवडायचे मात्र खेळ नुसता पाहूनही आपल्यात हिंसक वृत्ती वाढते आहे असे त्याला जाणवल्याने त्याने ते बघणं देखील बंद केलं. काही जण दूरस्थ मित्रमैत्रिणींशी बोलता यावं म्हणून आठवड्यातून एकदोनदा खेळतात. काही शाळकरी मुलं शाळा, अभ्यास, क्लासेस यामुळे कंटाळून, विरंगुळा म्हणून आणि मित्रमैत्रिणीं खेळतात म्हणून रोज रात्री PUBG खेळण्यासाठी एकत्र येतात आणि काही मुलंमुली शाळा, कॉलेज बुडवून दिवसाचे ५ ते ८ तास खेळत राहतात. हा वर्ग या खेळाच्या पूर्णतः आहारी गेला आहे आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे.

पालकांची भूमिका
सर्वप्रथम पालकांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याशी सुसंवाद साधावा. मुलं शाळा, कॉलेज, क्लासला नियमित जातात का? त्यांचे अभ्यासाकडे लक्ष आहे का? शाळा, कॉलेज व्यतिरिक्त आणखी कुठे जातात? नेमके काय करतात? याकडे लक्ष ठेवावे. खरं तर शाळकरी मुलांना मोबाइल द्यायला नको. मोबाइल वापरायला दिल्यास त्यावर मर्यादा ठरवून द्यावी. मुलांचा मोबाइल त्यांना विश्वासात घेऊन अधूनमधून तपासावा. मुलं कुठलाही व्हिडिओ/अॉनलाइन गेम खेळत असल्यास तीव्र प्रतिक्रिया व्यक्त न करता किंवा लगेच मोबाइल काढून न घेता असले खेळ त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी कसे हानीकारक आहेत हे त्यांना व्यवस्थित समजावून सांगावे. जमल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. तसंच मुलं कधीतरी थोडा वेळ हा खेळ खेळत असतील तर पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

मुलांना मैदानी खेळ खेळण्यास उद्युक्त करावे. एखादा छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करावे. जी मुलंमुली मैदानी खेळ खेळतात किंवा गायन, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व यापैकी एखादा छंद जोपासतात त्यांना कुठलेही व्यसन लागण्याची शक्यता कमी असते.

आजची तरुणाई अत्यंत हुशार आणि कल्पक आहे. जरुरी आहे ते फक्त त्यांची हुशारी आणि कल्पकता योग्य दिशेकडे नेण्याची. हे काम फक्त त्यांचे पालक आणि शिक्षक करू शकतात.

©कविता दातार