Wednesday 16 May 2018

मायाजालात गुंतलेली तरुणाई

मायाजालात गुंतलेली तरुणाई

चेतन एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी. वसतिगृहात राहून विद्यापीठात एमसीए करणारा. चेतनचा चौथ्या सेमिस्टरचा निकाल मात्र त्याच्या पालकांसाठी अगदीच अनपेक्षित आणि धक्कादायक होता. चक्क चार विषयात तो नापास झाला होता. त्याच्या नापास होण्याचे कारण दिवस अन रात्र सोशल नेटवर्किंग, चॅटिंग आणि पोर्न साइटस्.
दहावीनंतरच्या सुट्टीत सोनिया लोणारला समर कॅम्प साठी गेली होती. तिथे तिची समीरशी ओळख झाली. कँप संपल्यानंतरही फेसबुकवरून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचा दिवसातील बराच वेळ एकमेकांशी चॅटिंग करण्यात जायचा. त्यामुळे सोनिया तिच्या कुटुंबीयांशी, मित्रमैत्रिणींशी दुरावली. समीर सोबत तिने स्वतःचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. काही दिवसांनंतर तिला या चॅटिंगचा कंटाळा आला. पण समीर तिचे व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला चॅटिंग करण्यास भाग पाडू लागला. या सर्व प्रकारामुळे सोनियाला डिप्रेशन आले. सध्या ती मानसोपचार घेत आहे.
अकरावीतला जतीन ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेल्यामुळे सैरभैर आणि चिडचिडा झाला आहे.
निशाचे कॅम्पस सिलेक्शन होऊन तिला एका चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी लागली. पण सारखे व्हॉट्सअॅप आणि मेल चेक करत राहण्याच्या सवयीमुळे तिला वारंवार वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या अशी बरीच उदाहरणे आपल्या आसपास दिसतील. आपली तरुण मुलं चॅटिंग, गेमिंग, सोशल नेटवर्किंग आणि पोर्न साइट्सच्या मायाजालात अडकून इंटरनेट व्यसनाधीन तर झाली नाहीत ना? याची खात्री पालकांनी करून घेणे अत्यावश्यक  आहे.

इंटरनेटचे व्यसन कसे ओळखाल ?

-बराचसा वेळ व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर ऑनलाईन असणे.
-रात्रीची झोप पूर्ण न होणे, त्यामुळे सकाळी लवकर  जाग न येणे.
-काही कारणाने इंटरनेट बंद असल्यास अस्वस्थ होणे, चिडचिड करणे.
-सारखे मोबाइल चेक करणे.
-बंद खोलीत एकटे बसणे.
-कुटुंबीयांशी संवाद कमी होणे.
-मित्र मैत्रिणींपासून दूर राहणे.
-अभ्यासात मागे पडणे.
-आधी असलेल्या छंद, आवडीमध्ये स्वारस्य न उरणे.
वरील लक्षणांपैकी पाच ते सहा लक्षणे जरी पालकांना आपल्या मुलांमध्ये आढळली तरी त्यांनी वेळीच सावध व्हावे.

पालकांची भूमिका

इंटरनेटचे हे व्यसन लागल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ते लागू नाही यासाठी पालकांनी काही गोष्टींची दक्षता घेणे जरूरी आहे.
-मुलांशी सुसंवाद साधा. त्यांच्याकडे लक्ष द्या. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. त्यांची दिनचर्या तुम्हाला माहिती असायला हवी.
-मुलांना इंटरनेट, चॅटिंग, सोशल नेटवर्किंग वगैरे बाबतचे परिणाम चांगल्या शब्दात समजावून द्या. तुम्ही स्वतः मोबाइल फोन आणि सोशल नेटवर्किंगचा मर्यादित वापर करा आणि मुलांसमोर एक चांगले उदाहरण ठेवा. त्याचबरोबर त्यांच्या ऑनलाईन अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा.
-कॉलेजला गेल्याशिवाय त्यांना स्मार्टफोन देऊ नका. स्मार्टफोन दिल्यावरही मर्यादित डेटा प्लॅन वापरायला द्या.
-त्यांना स्वयंशिस्त बाळगायला शिकवा. मोबाइल फोन आणि इंटरनेटवर घालवायची वेळ मर्यादा सुनिश्चित करा.
-घरात जर वायफाय नेटवर्क असेल, तर मुलांचे मोबाइल फोन्स आणि लॅपटॉप्स त्यांच्या अभ्यासाच्या वेळेत, जसे रात्री आठनंतर वायफाय राउटरला कनेक्ट होऊ शकणार नाहीत, असे सेटिंग तुम्ही तुमच्या सर्व्हिस इंजिनीअरला सांगून करून घेऊ शकता किंवा त्या वेळेत वायफाय राऊटर बंद ठेवा.
-त्यांना एखादा छंद बाळगायला शिकवा. घरातील कामात त्यांना सहभागी करून घ्या.
-त्यांच्या शिक्षकांना भेटून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घ्या.
-मुलांच्या वागणुकीत बदल आढळल्यास त्यांना विश्वासात घेऊन त्याचे कारण जाणून घ्या.
एवढे करूनही दुर्दैवाने तुमचे मूल इंटरनेटचा अति वापर करते आहे असे जाणवल्यास तुम्ही समुपदेशकाची मदत घेऊ शकता.
बऱ्याचदा मुलांना असाइनमेंट, प्रोजेक्ट, नोट्स वगैरेसाठी इंटरनेटवरून माहिती हवी असते. त्यासाठी मुलं इंटरनेट वापरत असतील तर तसे त्यांना वापरू द्यावे. मात्र ते नेमके कशासाठी इंटरनेट वापरत आहेत हे जाणून घ्यावे.

मुलांची भूमिका

-सर्वप्रथम आपले शैक्षणिक ध्येय निश्चित करा आणि दिवसातील जास्तीत जास्त वेळ ते साध्य करण्यासाठी द्या.
-आपला दिनक्रम ठरवून घ्या. त्यात काही वेळ मर्यादित प्रमाणात चॅटिंग आणि सोशल नेटवर्किंग केल्यास हरकत नाही.
-स्वयंशिस्त बाळगा. अभ्यासाच्या वेळी मोबाइल इंटरनेट बंद ठेवा.
-स्वस्त, अमर्यादित डेटा प्लॅन असला तरी तो विनाकारण वापरू नका. त्यामुळे तुमचा वेळ खर्च होईल. त्यापेक्षा तुमचे काम आणि अभ्यास महत्त्वाचे आहेत.
-तुमच्या अभ्यास आणि कामा संबंधित माहिती इंटरनेटवरून हवी असल्यास नेमके काय हवे आहे ते लिहून ठेवा आणि ते गुगल सर्च पॅटर्न वापरून सर्च करा. मिळालेली माहिती कॉपी पेस्ट करून ऑफलाइन ठेवा. म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. माहिती घेताना मध्ये येणाऱ्या नको असलेल्या लिंक्सवर जाऊ नका.

-ऑनलाईन गेम्सचे व्यसन फार लवकर लागते यासाठी अश्या गेम्सपासून कायम दूर राहा.
-स्वतःचे छंद, आवडी जोपासा.
-मित्र मैत्रिणींशी चॅटिंग करण्याऐवजी त्यांच्याशी फोनवर बोला.
-इंटरनेटचा विनाकारण अतिवापर होतो आहे, असे लक्षात आल्यास त्याच्या आहारी न जाता कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना विश्वासात घेऊन यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची मदत घ्या.

एका अहवालानुसार आज भारतात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ४६ करोड आहे. हे प्रमाण भारतातील लोकसंख्येच्या ३५ टक्के एवढे आहे. यातील ७४ टक्के प्रमाण हे तेरा ते तीस वयोगटातील तरुण वापरकर्त्यांचे आहे. यापैकी २५ टक्के तरुण इंटरनेटचा अतिवापर करतात आणि २ टक्के तरुण या मायाजालात पूर्णपणे अडकून इंटरनेट व्यसनाधीन झालेले आहेत.
अजून तरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पण देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरुणांना इतर व्यसनांप्रमाणे या मायाजालाच्या व्यसनापासून सुद्धा दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न अपेक्षित आहेत.



©कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट