Saturday 28 November 2020

वॉर ड्रायव्हिंग

 वॉर ड्रायव्हिंग




मध्यरात्रीचा एक वाजलेला.  मुंबईतील, दादरच्या त्या उच्चभ्रू वस्तीतून एक होंडा सिटी कार सावकाश जात होती. कारमध्ये बावीस-तेवीस वर्षांची दोन मुलं. एक ड्रायव्हिंग सीटवर, दुसरा मागच्या सीटवर लॅपटॉप सोबत...

"संत्या... मिशन सक्सेसफुल..." मागे बसलेल्याने कार चालवणार्‍याला अंगठा वर करत सांगितले.

"That's like a good boy...योग्या.." कार चालवणारा हसत बोलला. कारने वेग घेतला आणि अर्ध्या मिनिटात दिसेनाशी झाली.

********

"सोहम! सोहम!! उठ रे.. आज  कॉलेजला जायचं नाही का तुला?"

आईच्या हाकेने सोहम जागा झाला आणि अंथरूणातून उठून पटकन आवरायला गेला. कॉलेजला जाण्यासाठी सोहम तयार होत असतानाच डोअरबेल वाजली. आईने दार उघडले.

दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या. "कोण हवंय आपल्याला?" सोहमच्या आईने विचारले, "मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम" इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले.

डोअर बेलचा आवाज ऐकून सोहम बाहेर आला.

"काय झालंय इन्स्पेक्टर?" प्रश्नांकित चेहरा करुन त्याने विचारले. 

"तुम्हाला आमच्या बरोबर पोलिस स्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल." इन्स्पेक्टर म्हणाले.

"का? काय झाले?" सोहमने विचारले. 

"दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे सुमारे साडेचार लाखांची." इन्स्पेक्टरने माहिती दिली.

"पण यांत माझा काय संबंध?" सोहमला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं  आपल्याला का सांगताहेत. सोहम आणि त्याची आई दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे पाहत होते.

"तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे. आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे." दीक्षितांनी पुस्ती जोडली.

सोहमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. आईला तर काय चालले आहे? हेच कळत नव्हते.  

"मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस." सोहम आईला धीर देत म्हणाला आणि त्या तिघांबरोबर बाहेर पडला.

थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर सोहम बसला होता.

दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक दीड वाजेच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता.

"हे कसे शक्य आहे? आमच्या घरी मी आणि माझे आई-बाबा असे तिघेच असतो. सध्या बाबा तर कामाच्या निमित्ताने दुबईत आहेत.  रात्री साडेदहापर्यंत तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणी सुद्धा आलेले नव्हते, मग... " 

"मिस्टर सोहम जोशी.." त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले,  "आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही. " त्यानंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार सोहमला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला.

या प्रकाराला वॉर ड्रायव्हिंग असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर एअरक्रॅक सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस अडॅप्टर, वायफाय पासवर्ड  क्रॅक करण्यासाठी  लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला, कि ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल ती व्यक्ती संकटात येऊ शकते. सोहमच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड  आणि फारसे सिक्युर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चूक नसतांना तो नाहक गोवला गेला होता. थोडीशी बेपर्वाई त्याच्या अंगलट आली होती.

दोन महिने  खटला चालला. सोहमवर डेबिट कार्ड च्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची रक्कम भरावी लागली. मानसिक त्रास झाला तो वेगळाच. याचे परिणाम दुर्दैवाने त्याला भविष्यात त्याच्या करियरच्या बाबतीत भोगावे लागूं शकतात.

मित्र मैत्रिणींनो तुमच्यापैकी बहुतेक जण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा,

- तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA / WPA2 इन्क्रिप्शनचा वापर करा.

- स्ट्राँग पासवर्ड लावा.

- शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत  नसल्यास राऊटर बंद करून ठेवा.

- घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेस ला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता किंवा सर्विस इंजिनियर कडून करवून घेऊ शकता.

सावध आणि सतर्क राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

©कविता दातार

Saturday 21 November 2020

व्हाट्सएप व्हिडिओ कॉल

व्हाट्सएप व्हिडिओ कॉल




(पॉर्न साईट्स बघण्याच्या व्यसनामुळे विचित्र अडचणीत सापडलेल्या व्यक्तीची सत्यकथा)

रमेश डोळ्यांत प्राण आणून मोबाईलवरचा व्हिडीओ पाहण्यात मग्न होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा हा रोजचा परिपाठ झाला होता. ऑफिसमधून आल्यावर आवरून, रात्रीचे जेवण आटोपल्यावर पुढचे दोन तीन तास तो मोबाईल किंवा लॅपटॉपवर पॉर्न साइट्सवरचे व्हिडिओ पाहण्यात रंगून जायचा. त्याला तसल्या साईटस सर्फ करण्याचे, त्यावरचे व्हिडीओ पाहण्याचे, क्वचित कधी तरी तिथे दिलेल्या लिंकवरून एखाद्या लेडी मेंबरशी चॅटिंग करण्याचे व्यसन जडले होते. स्वतःला या सगळ्यांपासून दूर ठेवण्याचे खूपदा ठरवूनही त्याला ते जमत नव्हते.

रमेश पुण्यातील एका मोठ्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता. त्याची हुशारी, कार्यक्षमता आणि सरळ, साधा स्वभाव यामुळे तो त्याच्या सहकारी आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होता. चार वर्षांपूर्वी त्याची पत्नी रीमाचा कॅन्सरने मृत्यू ओढवला. एकुलती लेक राशी, आयआयटी पवईला इंजिनिअरिंग शिकत होती. रीमाच्या मृत्यूनंतरचे एकाकी आयुष्य रमेशला खायला उठायचे. दिवस तर कामात निघून जायचा. पण संध्याकाळी घरी आल्यावर त्याचा वेळ जात नसे. अशातच दुसरे कुठलेही व्यसन नसलेल्या रमेशला पॉर्न साईट बघण्याचे व्यसन लागले.

रात्रीचे साडेबारा वाजले. आता झोपावे, नाहीतर उद्या ऑफिसला उशीर होईल, या विचाराने त्याने मोबाइलवर सुरू असलेला व्हिडिओ बंद केला आणि मोबाइल बाजूला ठेवला. अंथरूणावर पडणार तेवढय़ात मोबाईल ची रिंग वाजली. त्याने पाहिलं व्हाट्सएप व्हिडिओ कॉल होता. कॉलर ओळखीचा दिसत नव्हता. त्याने बेडसाइड लॅम्प लावला,  व्यवस्थित उशीला टेकून बसत त्याने उत्सुकतेपोटी कॉल रिसिव्ह केला आणि.......आणि......

एक पूर्णपणे नग्न तरुणी मोबाईल स्क्रीनवर झळकली. रमेशला आश्चर्याचा  धक्का बसला. आश्चर्यचकित अवस्थेतही तो मोबाईल स्क्रीन वर दिसणाऱ्या अनावृत्त स्त्रीकडे डोळे फाडून बघत होता.

"हाय रमेश !" ती बोलली.

"..." रमेश च्या तोंडून शब्द फुटत नव्हता.

ती पुढे बोलली.

"I have got your cell no from your favourite porn site, where you registered it, while signing up." (मला तुझा मोबाईल नंबर तुझ्या आवडत्या पॉर्न साईट वरून मिळाला, जो तू त्या साईट वर साईन अप करताना दिला होता.)

कॉल करणारी स्त्री इंग्लिश मध्ये बोलत होती.

"So....I called you, if you are interested, call me at this number anytime, I 'll be available wherever you wish..." (तुला वाटेल तेव्हा मला या नंबर वर कॉल कर, तु म्हणशील तिथे मी येईन.)

तिने कशासाठी कॉल केलाय? हे आता कुठे रमेशच्या ध्यानात आलं. कसंतरी अवसान आणून तो म्हणाला.

"Sorry...I am not at all interested..."

रमेश कॉल disconnect करणार तेव्हढ्यात ती म्हणाली,

"Ok...then...I have taken the screenshot of our conversation and now I am going to make it viral. If you don't want me to do so, then, do make arrangements of rs 50000/- ASAP...I'll message you my account details."

(ठीक आहे, मी या संभाषणाचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे, तो व्हायरल करेन, मी तसे  करू नाही असे तुला वाटत असेल, तर लवकरात लवकर पन्नास हजार रु. ची व्यवस्था कर. माझे अकाउंट डिटेल्स मी तुला मेसेज करीन.)

एव्हढं बोलून तिने कॉल disconnect केला.

रमेशच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून हा कॉल रिसिव्ह केला असे त्याला वाटायला लागले. काय करावे ? त्याला समजत नव्हते. या बदनामी तून वाचण्यासाठी लगेचच पन्नास हजार  देऊन मोकळे व्हावे, असा एक विचार त्याच्या मनात आला.

पण त्याआधी शेखर शी बोलावे असे त्याने ठरवले. शेखर त्याचा कलीग आणि फार जवळचा मित्र. तो त्याच्या कंपनीतील सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटचा इन्चार्ज होता. आता रात्र फार झाली आहे, उद्या त्याच्याशी बोलावे. असे ठरवून रमेशने झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याची झोप त्या व्हाट्सएप व्हिडिओ कॉल ने पुरती उडवली होती.

दुसऱ्या दिवशी शेखरला भेटून त्याने सर्व हकिकत काहीही आडपडदा न ठेवता सांगितली. त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन शेखरने बोलायला सुरुवात केली.

"रमेश. . पॉर्न साइट्स बघणं ठीक नाही हे तर नक्की. पण

असं आजकाल सर्रास होतं आहे, कोणीतरी अनोळखी स्त्री व्हाट्सएप व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याची धमकी देते. आशा बऱ्याच complaints सायबर सेल ला रजिस्टर आहेत. पण हे असं ब्लॅकमेल करणं काही सोपं नाही. यात तो नंबर, त्या स्त्रीचा फोटो सगळंच समोर येतं. नंबर बदलता आला तरी तिलाही, कशीही असली तरी स्वतः चा फोटो व्हायरल झालेला आवडणार नाही. त्यामुळे तू याकडे दुर्लक्ष कर. तरीही आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेन्ट देऊन ठेवू."

"फार तर काय... स्क्रीनशॉट्स आणि एखाद्या साइटवरील तुझा डेटा त्या ब्लॅकमेलर जवळ असू शकतो. कारण या पॉर्न साइट्स युजर्सच्या आवडी निवडीं बद्दल चा डेटा रेकॉर्ड करून ठेवतात. या वेबसाइटस् वरील युजर डेटा लीक करून हॅकर्स डार्क वेबवर काही हजारात विकतात. त्या डेटाच्या आणि स्क्रीनशॉट्सच्या आधारे तुझी बदनामी कोणी करू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण तुझा जवळचा मित्र म्हणून मी तुला एक गोष्ट जरूर सुचवीन की पॉर्न साइट्स बघण्याच्या या व्यसनातून बाहेर येण्यासाठी तू सायकियाट्रीस्टची जरूर मदत घ्यावी."

शेखरने सुचविल्यानुसार रमेशने पुण्यातील नामवंत सायकियाट्रीस्टची दोन महिने ट्रिटमेंट घेतली. त्यांनी दिलेल्या औषधांसोबत, उपचाराचा भाग म्हणून आपल्या घरातील इंटरनेट दोन महिने पूर्णतः बंद ठेवले. त्याबरोबरच चांगल्या साहित्याचे वाचन, मेडिटेशन आणि प्राणायाम यात आपले मन गुंतवले.

आज रमेश या पॉर्न साइट्स बघण्याच्या घाणेरड्या व्यसनातून पूर्णतः बाहेर येऊन एक सुखी जीवन जगत आहे.

©कविता दातार

Sunday 8 November 2020

क्यूआर कोड स्कॅम (QR Code Scam)

 क्यू आर कोड स्कॅम (QR Code Scam)


अनिता बेंगलोर मध्ये राहणारी एक स्मार्ट गृहिणी. दिवाळीची खरेदी म्हणून तिने लेटेस्ट मॉडेल ची फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन खरेदी केली. जुनी टॉप लोडिंग वॉशिंग मशीन विकण्यासाठी म्हणून लोकल न्यूज पेपर मध्ये जाहिरात दिली. तीन-चार चौकशीचे फोन येऊन गेले. चौकशी करणाऱ्यांना तिने दहा हजार रुपये किंमत सांगितली. काहींना सेकंड हँड वॉशिंग मशीनची ती किंमत जास्त वाटली. बाकीच्यांना बहुतेक त्या वॉशिंग मशीनच्या खरेदीत इंटरेस्ट नसावा. उगाच चौकशी करायला त्यांनी फोन केला असावा, असं अनिताला वाटलं. मात्र त्या दिवशी ज्या व्यक्तीचा फोन आला, त्याला खरोखरीच वॉशिंग मशीन घेण्याची निकड असावी. 


त्याने आपले नाव रामन असे सांगितले. तो टीसीएस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, असे त्याने सांगितले. वॉशिंग मशीनची ब्रँड, मॉडेल, कॅपॅसिटी असे सगळे डिटेल्स त्याने नीट विचारले. किंमतही त्याला मान्य होती. स्वतःचा नाव, पत्ता सांगून वॉशिंग मशीन न्यायला एक ऍपेरिक्षा येईल असे तो म्हणाला. अनिताने त्याला, 'पेमेंट कसे करणार?' विचारल्यावर त्याने सांगितले, "मॅडम ! तुम्हाला व्हाट्सअप वर एक क्यू आर कोड येईल. तो स्कॅन करून तुमचा अकाउंट नंबर टाकला, की पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील."

तिने त्याचे नाव, पत्ता पुन्हा विचारून ज्या नंबर वरून कॉल आला, तोच त्याचा व्हाट्सअप नंबर असल्याची खात्री केली. आतापर्यंत क्यूआर कोड वापरून, तिने बऱ्याचदा पेमेंट केले असल्यामुळे, पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड वापरतात की नाही ? याबद्दल साशंक असलेल्या अनिताने त्याला क्यू आर कोड पाठवण्यास सहमती दर्शवली.

व्हाट्सअप वर त्याने पाठवलेला क्यू आर कोड तिने फोटो गॅलरीत ओपन केला आणि मोबाईल वरचे  bixby vision हे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी असलेले ॲप वापरून स्कॅन केला. पण हे काय? .....

तिचे अकाउंट डिटेल्स देण्याच्या तयारीत  असलेली अनिता एका वेगळ्याच वेबसाईटवर री-डायरेक्ट झाली. वेबसाईटचे लँडिंग पेज बघत असतानाच तिच्या मोबाईलवर बँकेकडून 90 हजार रुपये डेबिट झाल्याचा एस एम एस आला. अनिताला घाम फुटला. नक्कीच क्यूआर कोड पाठवणाऱ्या त्या रामनने काही तरी घोळ केला होता. तिने त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. वेळ न घालवता तिने जवळच्या सायबर पोलिस स्टेशन वर जाऊन कम्प्लेंट दिली आणि एफ आय आर ची कॉपी पोलीस अधिकाऱ्याच्या सही, शिक्क्या सोबत तिच्या बँकेत जमा केली. या केसचा सायबर पोलिस तपास करत आहेत.

क्यूआर (Quick Response) कोड पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळ्या चौकोनी ठिपक्यांनी बनलेला चौकोनाकृती द्विमितीय बारकोड असतो. बारकोड रीडर, मोबाईल कॅमेरा किंवा अँप द्वारे तो स्कॅन करून वाचता येतो. कारखान्यात उत्पादित वस्तूंच्या किंवा इतर माहिती साठी, एखाद्या वेबसाइट वर लॉगिन करण्यासाठी, वेगवेगळ्या ऑफर्स व डिस्काउंट मिळवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी क्यूआर कोड वापरतात.

सध्या या कोरोना काळात स्पर्श विरहित आर्थिक व्यवहारांसाठी क्यूआर कोडचा वापर वाढला आहे. कुठल्याही दुकानाच्या काउंटरवर तुम्हाला क्यूआर कोड लावलेला दिसेल. मोठ्या शहरात भाजीवाले, फेरीवाले देखील याचा सर्रास वापर करताना दिसतात.

सध्याच्या डिजीटल युगात आपणा सर्वांना या गोष्टींचा वापर टाळता येणं शक्य नाही. पण क्यूआर कोड वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

1.पेमेंट साठी क्यूआर कोड स्कॅन केल्यावर स्क्रीन वर आलेले डिटेल्स नीट वाचावे म्हणजे आपण नक्की कोणाला,किती पेमेंट करत आहोत याची खात्री करावी. पैसे घेण्यासाठी सहसा क्यूआर कोड वापरत नाहीत.

2.काहीही असाधारण आढळल्यास पेमेंट करणे टाळावे.

3.सार्वजनिक, अज्ञात ठिकाणावरील किंवा अज्ञात स्रोत असलेला क्यूआर कोड स्कॅन करू नाही.

4.काढता येण्याजोग्या (removable) स्टिकर वरील क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नाही.

5.कुतूहल म्हणून उगाच कुठलाही क्यूआर कोड स्कॅन करू नाही.

6.कुठल्याही पोस्टरवर, इमारतीवर किंवा घराच्या भिंतीवर बोगस  क्यूआर कोड आढळल्यास संबंधित व्यक्तीला त्याबद्दल माहिती द्यावी.

7.क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वेबसाईट ओपन होऊन त्यावर तुमचे पर्सनल डिटेल्स विचारले जात असतील तर ते देणे टाळावे आणि लगेच तिथून बाहेर निघावे. कधीकधी डिटेल्स विचारले जात नाहीत पण वेबसाईट मात्र malicious  असते त्यावरून तुमच्या मोबाईल मध्ये मालवेअर इन्स्टॉल करून मोबाईल हॅक केला जाऊ शकतो आणि तुमचे कार्ड डिटेल्स चोरले जाऊ शकतात. अनिताच्या केस मध्ये तसेच झालेले आहे.

8. मोबाईल कॅमेरा ने क्यूआर कोड स्कॅन करत असल्यास मोबाईल मध्ये चांगले अपडेटेड अँटिव्हायरस असल्याची खात्री करावी.

9. शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी सिक्युरिटी सिस्टम असलेले ॲप (जसे Kaspersky's QR Scanner, NeoReader ) वापरल्यास तुम्ही सुरक्षित रहाल. कारण सिक्युरिटी सिस्टम असलेले ॲप तुमच्या मोबाईल मध्ये क्यूआर कोड द्वारा कुठलेही मालवेअर इन्स्टॉल होऊ देणार नाही.

सावध आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

पुन्हा भेटूया एका नव्या सायबर क्राईम कथे सोबत.... 
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...

©कविता दातार