Monday 14 September 2020

फोटो माॅर्फिंग

फोटो माॅर्फिंग 




रविवारची मस्त सकाळ. खिडकीतून आत येणार्‍या गार वार्‍याने दामिनी ला जाग आली. तिने साईट टेबल वर ठेवलेला मोबाईल उचलून वेळ पाहिली. पावणे सात झाले होते. तास-दीड तास अजून झोप काढावी, या विचाराने पायाशी पडलेली चादर तिने अंगावर ओढून घेतली. पुन्हा झोपायचा प्रयत्न करत असतानाच, मोबाईलची रिंग वाजली.

"हॅलो !" आळसावल्या आवाजात दामिनी ने प्रतिसाद दिला.
"हॅलो ! मिस दामिनी पंडित बोलत आहात का?"
"होय...मी दामिनी.."
"मी अजय देशमुख, मी तुम्हाला लगेच भेटू शकतो का ? केंव्हा येऊ तुमच्या ऑफिसला ?"
पलिकडून अधीर आवाजात विचारणा झाली.
"तासाभरात ऑफिसला पोहोचते मी. पत्ता लिहून घ्या.."
"मला तुमचे ऑफिस कुठे आहे ते माहित आहे मॅडम.. मी तासाभरात पोहोचतो."
एवढे बोलून त्याने फोन बंद केला.

दामिनी अंगावरची चादर भिरकावून देत उठली. भराभर आवरून ती तयार झाली. मस्त आलं घालून तिने स्वतःसाठी चहा केला. ब्राऊन ब्रेड च्या दोन स्लाईसना चीज स्प्रेड फासून तिने प्लेटमध्ये ठेवले. चहाचा मग आणि प्लेट घेऊन ती गॅलरीत आली. तिथल्या केन चेअर वर बसून समोरच्या टेबलवर प्लेट ठेवून ती चहाचा आस्वाद घेऊ लागली.

दामिनी पंडित....तिने बेंगलोर आयआयटीमधून कम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक झाल्यावर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या नाकारून, स्वतःची सायबर सिक्युरिटी फर्म उभी केली होती. आज ती मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सायबर गुप्तहेर म्हणून गणली जात होती. खरंतर हेरगिरीचे बाळकडू प्रथमपासूनच तिला मिळालं होतं. तिची आई राधा पंडित महाराष्ट्रातील पहिली स्त्री गुप्तहेर होती. तिच्या पूर्वजांनी सतराव्या शतकात शिवाजी महाराजांसाठी यशस्वी हेरगिरी केली होती.  दामिनी ची बहिण यामिनी ही भारतीय गुप्तचर संस्था राॅ मध्ये गुप्तहेर म्हणून कार्यरत होती.

मेन डोअरचे लॅच लावून, लिफ्टने पार्किंग मध्ये येऊन, दामिनीने आपली वॅगन-आर बाहेर काढली आणि ती ऑफिसकडे निघाली. तिच्या फ्लॅट पासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर तिचे ऑफिस होते. रविवार असल्याने रस्त्यांवर तुरळक गर्दी होती. ऑफिसच्या बिल्डिंग पाशी गाडी पार्क करताना चाळीस पंचेचाळीशी चे एक गृहस्थ अस्वस्थपणे उभे असलेले तिला दिसले. अंदाजानेच तिने तो अजय देशमुख आहे हे ओळखलं.

"गुड मॉर्निंग मॅडम !"
"गुड मॉर्निंग !!!"
तिच्या मागोमाग अजय ऑफिसमध्ये आला.
दामिनीने अजयला खुर्चीत बसण्यास सांगितले आणि स्वतः टेबला मागच्या खुर्चीत स्थानापन्न झाली.
"बोला मिस्टर अजय, कशाच्या संदर्भात मला भेटायला आलात ते सविस्तर सांगा."

" मॅडम मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. मलबार हिल् ला  माझा फ्लॅट आहे. तिथे मी आणि माझी मुलगी श्रेया राहतो. श्रेयाच्या आईचे, म्हणजेच माझ्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले. काल...काल रात्री श्रेयाने हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.  मी वेळीच तिथे पोहोचलो म्हणून तिला वाचवता आले. रात्री तिला हॉस्पिटल ला ॲडमिट केले. सुदैवाने जखमा फारशा खोल नाहीत, त्यामुळे ती एक दोन दिवसांत घरी येईल. कोणीतरी व्हाट्सअॅप वर तिचे माॅर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो पाठवून आणि व्हॉइस कॉल करून गेल्या तीन महिन्यांपासून रोजच तिला ब्लॅकमेल करत आहे. तो ताण असह्य होऊन तिने हे पाऊल उचलले. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही या ब्लॅकमेलर ला शोधून काढावे."

"ओके...मी माझे काम सुरू करते, त्यासोबतच तुम्ही सायबर पोलिस स्टेशनला एफआयआर द्या...लगेच... आणि त्याची एक कॉपी मला पाठवा. दुसरे म्हणजे तिचा फोन मला इन्वेस्टीगेशन साठी लागेल.  तुम्हाला आणि तिला कोणावर संशय असल्यास त्या सगळ्यांची नावे आणि फोन नंबर मला द्या."

अजय देशमुख पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांनी लगेच श्रेयाचा मोबाईल फोन दामिनी समोर ठेवला.
"मॅडम मी लगेच सायबर पोलीस स्टेशनला जाऊन एफआयआर देतो, तुम्हाला त्याची कॉपी आणि संशयित लोकांची यादी श्रेया शी बोलून पाठवतो."

दामिनी ने सर्वात आधी श्रेयाचा मोबाईल चेक करायला घेतला. व्हाट्सअप वर ज्या नंबर वरून फोटो पाठवले गेले होते आणि ज्या दोन तीन नंबर्स वरून व्हॉइस कॉल केले गेले होते ते सगळे नंबर्स तिने नोट डाऊन करून घेतले. ट्रू कॉलर, हूकॉल्समी, ट्वीलीओ यासारख्या वेगवेगळ्या ओपन सोर्स टूल्स वापरून हे सगळे नंबर्स कोणाच्या नावे रजिस्टर आहेत हे ती पाहू लागली सगळे नंबर्स वेगवेगळ्या नावाने रजिस्टर होते. काही नंबर्स चे लोकेशन सिंगापूर तर काहींचे इंडोनेशिया दिसत होते. व्ही पी एन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरल्यास फोन नंबर्स चं लोकेशन बदलू शकतं हे तिला माहीत होतं. अशा केसेसमध्ये गुन्हेगार आसपासचे, परिचीत असतात हे तिच्या आतापर्यंतच्या अनुभवाने तिला माहित झाले होते.  एकंदरीत नंबर ट्रेसिंगचा फारसा उपयोग होणार नव्हता.

अजय ने चार-पाच संशयितांची नावे, त्यांचे फोन नंबर आणि एफआयआर ची काॅपी तिला पाठवली होती. सायबर पोलिसांच्या कॉल सेंटरला संपर्क करून तिने सगळ्या संशयितांची नावे आणि फोन नंबर्स पाठवून दिले. संध्याकाळपर्यंत या सर्व संशयितांना ॲडव्हर्टायझिंग च्या बहाण्याने फोन करून त्यांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग तिला मिळणार होते. श्रेयाच्या फोनवर तिने कॉल रेकॉर्डिंग चे ॲप इन्स्टॉल केले. म्हणजे ब्लॅकमेलर चा कॉल आल्यास तिला त्याचा आवाज रेकॉर्ड करता येणार होता.

तिच्या अपेक्षेप्रमाणे दुपारी श्रेया च्या फोनवर व्हाट्सअप व्हॉइस कॉल आला.
"हॅलो श्रेया ! अजूनही विचार कर, फक्त एकदा माझ्यासोबत ये...खूप मजा करू... अजूनही तू ऐकत नसशील, तर मी पाठवलेले तुझे फोटो पोर्न साईटस् वर अपलोड करेन. मग तू कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाहीस.... फक्त एकदा माझ्यासोबत...."

दामिनी ने रेकॉर्डर चालू ठेवला होता. त्यामुळे त्याचे बोलणे रेकॉर्ड झाले. व्हॉइस कॉल चे लोकेशन  सिंगापूर असे येत होते. ब्लॅकमेलर वीपीएन वापरतो आहे आणि तो या विषयातला चांगलाच जाणकार आहे, हे दामिनीच्या लक्षात आले. तिच्या दृष्टीने हा एक मोठा पुरावा होता.

संध्याकाळी कॉल सेंटर कडून तिला सर्व संशयितांचे रेकॉर्डिंग मिळाले.  पण त्यापैकी कोणाचाही आवाज ब्लॅकमेलर च्या आवाजाशी मिळत नव्हता. ब्लॅकमेलर च्या आवाजातील रेकॉर्डिंग दामिनीने अजयला पाठवून श्रेयाला पुन्हा  ऐकवण्यास सांगितले. पण श्रेया स्पष्टपणे काही सांगू शकत नव्हती. कदाचित आवाज बदलण्यासाठी तो कुठल्यातरी अॅप ची मदत घेत असावा.

काहीही फारसे न घडता दिवस संपला. पण दामिनीच्या स्वभावानुसार हातात घेतलेल्या केस चा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत खाणं-पिणं, झोप सगळं सोडून ती त्यावर काम करत बसे. त्याप्रमाणे रात्री उशिरा तिने श्रेयाचे सोशल नेटवर्किंग अकाउंट बघण्याचे ठरवले.

श्रेयाच्या फोनवरील फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे सर्व तिने बारकाईने बघितलं. पण फारसं काही हाताला लागलं नाही. मात्र  इंस्टाग्राम वर श्रेयाने बरेच फोटो अपलोड केलेले दिसत होते. नक्कीच ब्लॅकमेलरने इंस्टाग्राम वरूनच श्रेया चे फोटो सेव केलेले असणार  असा तिने कयास बांधला. तिने एक विशेष आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड टूल वापरून रिव्हर्स इंजीनियरिंग च्या साह्याने इंस्टाग्राम पुन्हा एकदा नीट बघायला सुरुवात केली. अचानक तिला माॅर्फ केलेल्या आक्षेपार्ह फोटों मधल्या श्रेयाच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते फोटो इंस्टाग्राम वर मिळाले.

ब्लॅकमेलर ने हेच सर्व फोटो स्वतःच्या मोबाईल किंवा  कॉम्प्युटर वर सेव्ह करून फोटोतील चेहरा दुसऱ्या मुलीच्या नग्न शरीरावर जोडला होता. यालाच फोटो मॉर्फिंग म्हणतात. दामिनी  ला माहित होते कि फेसबुक आणि इंस्टाग्राम वर दुसऱ्याच्या प्रोफाइल मध्ये जाऊन तिथले फोटो डाऊनलोड किंवा सेव केले असल्यास फेसबुक किंवा इंस्टाग्राम च्या सर्व्हरवर फोटो कोणी सेव्ह केले याचा रेकॉर्ड असतो. त्यानुसार तिने इन्स्टाग्राम च्या हेल्प सेंटर ला मेल करून त्यासोबत अजयने पाठवलेल्या एफआयआर ची कॉपी जोडली. आता इंस्टाग्राम कडून उत्तराची प्रतीक्षा होती.

दुसऱ्या दिवशी इंस्टाग्राम कडून उत्तर आले. त्यात हे फोटो जिथून सेव्ह झाले होते, त्या प्रोफाईलची लिंक होती. रिपोर्ट प्रमाणे गेल्या तीन महिन्यांत फक्त याच एका युजरने श्रेया चे फोटो डाउनलोड केले होते.  दामिनीने लिंक उघडून पाहिली. अखिलेश जाधव नावाच्या तरूणाचे इंस्टाग्राम प्रोफाइल होते.

दामिनी ने लगेच अजयला फोन लावला.
"गुन्हेगार मिळाला आहे. कोणी अखिलेश जाधव आहे, ज्याने श्रेया चे फोटो डाउनलोड केले आहेत. तुम्हाला माहित आहे का हा मुलगा कोण आहे ते ?"
"बापरे ! अखिलेशचे काम आहे हे ?? अखिलेश, श्रेयाच्या बेस्ट फ्रेंड दिपाली चा भाऊ आहे. श्रेयाचे आणि दीपालीचे एकमेकींकडे नेहमी येणेजाणे असते. अखिलेश असं काही करेल असं कधीच वाटलं नव्हतं."

दामिनी ने अखिलेशची सगळी माहिती गोळा केली. श्रेया कडून तिला कळले की, अखीलेश कंप्यूटर इंजीनियरिंग च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याला फोटोशॉप वर फोटो मिक्सिंगचा नाद आहे.  श्रेया आणि  दीपालीच्या बाकीच्या मैत्रिणी  त्याला आपले काही खास फोटो देऊन  ते जास्त चांगल्या तऱ्हेने एडिट करायला बऱ्याचदा सांगत असत. पण तो श्रेया ला आपली शिकार बनवेल असं कधी वाटलं नव्हतं.

दामिनी ने  जमा केलेल्या सर्व पुराव्यां सोबत सायबर कोर्टात केस उभी राहिली. सेक्शन  66C, 66D, 66E आणि  67A आयटी ॲक्ट प्रमाणे  अखिलेश वर आरोप ठेवला गेला. एकोणीस वर्षांचा असल्याने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली.

©कविता दातार

No comments:

Post a Comment