Wednesday 9 December 2020

बॉईज लॉकर रूम

बॉईज लॉकर रूम


दक्षिण दिल्लीतील एका शाळेतील पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील  सधन कुटुंबातील मुलं. त्यांनी मिळून इंस्टाग्राम वर एक ग्रुप बनवला. ग्रुपला नाव दिलं "बॉईज लॉकर रूम". सुरुवातीला शाळकरी मुलांच्या इतर ग्रुप प्रमाणेच या ग्रुप मध्ये चॅटिंग, पोस्टिंग, व्हिडिओ, फोटो शेअरिंग व्हायचे. एक दिवस ग्रुपमधील एका मेम्बरने त्याच्याच वर्गातील एका मुलीचा मॉर्फ केलेला (चेहरा त्या मुलीचा आणि बाकी शरीर दुसऱ्या एका नग्न स्त्री चे) अश्लील फोटो शेअर केला. त्यावर काही मेम्बर्स चे आचकट, विचकट आणि अश्लील असे कमेंट्स आले.

त्या दिवसापासून ग्रुपमधील काही मेंबर्स चे असले विकृत उद्योग सुरू झाले. ओळखीतल्या आणि अनोळखी मुलींचे फोटो फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप वरून काढून घेऊन मॉर्फ करून, ग्रुपमध्ये पोस्ट करायचे आणि त्यावर अत्यंत अश्लील, विकृत टिपण्या करायच्या. हा उद्योग बरेच दिवस सुरू होता.

मे 2020 मध्ये मात्र कहरच झाला. एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा मॉर्फ केलेला फोटो पाहून काही मेम्बर्सनी त्या मुली वर रेप करण्याची योजना बनवायला सुरुवात केली. त्या अत्यंत विकृत योजनेच्या संदर्भातच बहुतेक मेंबरस् पोस्ट करू लागले. या सर्व प्रकाराला घाबरून ग्रुप मधील काही मेंबर्स ने ग्रुप सोडला. त्यातीलच एका मुलाने ने या विकृत योजनेच्या संदर्भातील चॅटिंग चा स्क्रीनशॉट त्याच्या मैत्रिणीला पाठवला. त्या मुलीने तो स्क्रीनशॉट व्हायरल केला आणि ही गोष्ट उघडकीस आली.

या घटनेचा वृत्तांत दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी यासंदर्भात एफआयआर दाखल केला. पोलिस तपासाची चक्र वेगाने फिरली. सव्वीस मुलांना पोलिसांनी अटक केली. यातील बहुतेक मुलं अल्पवयीन होती. सायबर पोलिसांनी इंस्टाग्राम ला रिपोर्ट करून हा ग्रुप डिलीट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंस्टाग्राम ने "बॉयस लॉकर रूम"  ग्रुप डिलीट केला.

गोष्ट एवढ्यावरच संपली नाही. ग्रुप डिलीट झाल्यावर ग्रुप मधील काही निगरगट्ट मुलांनी "बॉईज लॉकर रूम 2" या नावाने दुसरा ग्रुप इंस्टाग्राम वर सुरू केला. मात्र पोलिसांच्या रडारवर ही मुलं असल्याने तो ग्रुप जास्त दिवस चालू शकला नाही.

या सर्व घटनाक्रमाचा आढावा घेतला असता, काही प्रश्न मनात उद्भवतात. या मुलांमध्ये एवढी विकृति कुठून आली?

या सर्व मुलांचे असले विकृत उद्योग चालू असताना कोणाच्याही पालकांना ते कसे कळले नाहीत? आणि शेवटचा प्रश्न इन्स्टाग्राम वर जे काही पोस्ट होतं ते त्याच्या सर्व्हर वर व्हेरिफाय होतं तरीदेखील इंस्टाग्राम ने कुठलीही ॲक्शन का घेतली नाही?

या सर्व प्रश्नांची मी माझ्या परीने उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं जाणवलं की मुलांना घरून मिळणारे संस्कार फार महत्त्वाचे आहेत.  पालकांचे मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांमध्ये मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच आत्मिक, नैतिक आणि सामाजिक विकासासाठी पुरेसे प्रयत्न व्हायला हवेत. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ॲप्स ने नैतिक जबाबदारी उचलून असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

©कविता दातार



2 comments:

  1. फारच गंभीर विषय आहे हा.मुलं आपल्या अपरोक्ष काय बघतात किंवा काय करतात हे पण जाणून घ्यायला हवेच.त्या साठी मुलां सोबत मोकळेपणाने बोलता येईल असे संबंध दृढ व्हायला हवेत.नक्की फायदा होतो.पालकांनी मुलां सोबत नाजुक विषयावर गप्पा मारायलाच हव्यात तेव्हाच त्यांच्या बालमनावर योग्य संस्कार होतील.आवश्यक विषयावर बोट ठेवलय..

    ReplyDelete
    Replies
    1. 100% खरय..सुजाण आणि सजग पालकत्व यासाठी खूप जरुरी आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

      Delete