Wednesday 6 June 2018

कॉमेंट

कॉमेंट

सुमारे पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट. एका मोठ्या, लोकप्रिय नेत्याचे निधन झाल्याने अवघी मुम्बई शोकसागरात बुडाली होती त्यावेळची. . .
*****
फाटकाची कडी वाजल्याचा आवाज आला तसे प्राजक्ताने हातातले पुस्तक बाजूला ठेवून  बाहेर धाव घेतली. तिच्या अपेक्षेप्रमाणे पोस्टमन तिच्या नावाचे टपाल घेउन आला होता.  तिने ते पाकिट हातात घेउन  उघडले आणि अधीरतेने
वाचू लागली. मुंबईत दादरमधील बालमोहन विद्या मंदिर या शाळेत संगणक विभाग प्रमुख पदासाठी तिने अर्ज केला होता.  त्याचा तो इंटरव्ह्यू कॉल होता.
लातूरमधील १९९३ च्या भीषण भूकंपात आई वडिलांना गमावलेल्या पाच वर्षांच्या प्राजक्ताला तिचे काका कायमसाठी मालवण ला घेउन आले. काका-काकूला मूलबाळ नसल्याने प्राजक्ता त्यांची खूप लाडकी होती. प्राजक्ताचे मिलिंद काका आणि मालती काकू दोघेही चिपळूणमधील प्रसिद्ध डॉक्टर होते. हुशार आणि मेहनती प्राजक्ताने चिपळूणमधील एका कॉलेजमधून एमसीए पूर्ण केले होते. वेळ जाण्यासाठी तेथील एका संगणक संस्थेत तिने शिक्षिकेची नोकरी धरली होती. पण उत्तम प्रोग्रॅमिंग येत असलेल्या प्राजक्ताचे मन त्या नोकरीत रमत नव्हते. तिला मोठ्या शहरात जाऊन सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम करायचे होते. म्हणून काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात 'पाहिजेत' या शीर्षकाखाली आलेल्या या नोकरीची जाहिरात पाहून तिने अर्ज केला होता. त्याचा तो इंटरव्ह्यू कॉल होता. येत्या सोमवारीच तिचा इंटरव्ह्यू होता.  प्राजक्ताने मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली.
रविवारी सकाळी अकरा च्या बसने ती मुंबईला निघाली.
तिच्या काकूची मैत्रीण दादर बस स्टॅंडवर तिला घ्यायला येणार होती. पावणेसहाला बस मुंबईत आली. पण हे काय . . . जागोजागी रस्ते माणसांनी फुलले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते वाहनांसाठी बंद केले होते. त्या महान नेत्याची अंत्ययात्रा त्या मार्गाने जाणार असल्याने हा बंदोबस्त केला होता.  दादर बस स्टँड तर सोडाच, बस थोडी देखील पुढे जाऊ शकत नव्हती.  पोलिसांनी बस तेथेच थांबवली. बाकीची वाहने देखील तिथे थांबून होती. चौकशी केल्यावर प्राजक्ताला कळले की ही गर्दी त्या नेत्याचे अंत्यसंस्कार झाल्याशिवाय म्हणजे जवळजवळ रात्री पर्यंत अोसरणार नव्हती. काय करावे तिला कळत नव्हते. फार वेळ तिथे असे थांबता येणार नव्हते.  आपल्या मोबाईलवरून काकूच्या मैत्रिणीला तिने फोन लावला. पण त्यांनीही तिला तिथे घ्यायला येण्यास असमर्थता दाखवली. उलट गर्दीत किंवा चेंगराचेंगरीत अडकू नये म्हणून त्यांनी तिला मालवणला परत जाण्याचा सल्ला दिला. खूप विचार करून शेवटी इतर काही प्रवाशांबरोबर तिने परत मालवणला जायचे ठरवले. तिचा खूप विरस झाला. एवढी चांगली नोकरी हातची गेली होती. निराशेने ती परत मालवण ला येण्यासाठी टॅक्सीत बसली. घरी परत यायला तिला खूप रात्र झाली. सगळी हकीकत थोडक्यात काका-काकू ला सांगून, थकून ती झोपायला गेली.
सकाळी तिला बिलकुल उठवले जात नव्हते. खूप थकल्यासारखे वाटत होते. कसेबसे उठून, आवरून तिने लॅपटॉप सुरू केला आणि फेसबुकवर लॉगइन केले.

इतरांच्या पोस्टस् वाचत असताना तिचे लक्ष कुणीतरी शेअर केलेल्या त्या नेत्याच्या अंतिम यात्रेच्या फोटोकडे गेले. त्या फोटोवरील कमेंट्स ती वाचू लागली. बऱ्याच लोकांनी त्या नेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. तिला कालचा प्रसंग आठवला आणि या गर्दीमुळे आपण इंटरव्ह्यूला मुकलो हे आठवून तिला विषाद वाटला. त्या तिरीमिरीतच तिने कमेंट टाकले, "एका माणसाचा मृत्यू झाल्यास, मग तो कितीही मोठा असला तरी, त्याच्या अंत्ययात्रेसाठी रस्त्यावर लोकांनी एवढी गर्दी करून, रस्ते बंद करून, सामान्य जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे ?? मी या गोष्टीचा निषेध करते." तिची कमेंट पोस्ट झाल्याबरोबर तिला भलंबुरं ठरवणाऱ्या, धमकी आणि शिवीगाळ करणाऱ्या कमेंट एकामागोमाग एक पोस्ट होऊ लागल्या. वैतागून तीने लॅपटॉप बंद केला आणि पुस्तक वाचायला घेतले.
प्राजक्ताच्या काकांचे हॉस्पिटल त्यांच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते आणि वरच्या मजल्यावर त्यांचा रहिवास होता. दुपारचे जेवण झाल्यावर प्राजक्ता आणि तिची काकू बोलत बसल्या असताना अचानक बर्‍याच लोकांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काय झाले पाहायला दोघी गॅलरीत आल्या. तीन-चारशे लोकांचा जमाव त्यांच्या हॉस्पिटलच्या दिशेने येत होता. त्यांच्या हातात हॉकीस्टीकस्, क्रिकेट बॅटस्, काठ्या वगैरे होत्या. काही लोकांच्या हातात मोठे दगड होते. ती लोक जोर जोरात ओरडत, शिवीगाळ करत होते. त्यातील काही लोकांनी पुढे होऊन हॉस्पिटलचे प्रवेशदार गाठले होते आणि आत येऊन दिसेल ते सामान मोडतोड करून बाहेर फेकत होते. खिडक्यांच्या काचा दगड मारून फोडत होते. तिचे काका गडबड ऐकून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पायर्‍या उतरू लागले.
प्राजक्ता आणि तिची काकू सुद्धा  धावत जिन्याकडे आल्या. पण  काकांनी त्यांना हाताने तिथेच थांबवले.  जमाव खूप संतापला होता. हिंसक, आक्रमक  झाला होता.  प्रतिकार करणाऱ्या हॉस्पिटलच्या स्टाफपैकी एका दोघांना डोक्यात हॉकीस्टिक मारून त्यांच्यातील काही लोकांनी जखमी केले होते. काय होते आहे हे प्राजक्ताला आणि तिच्या काका काकूंना कळत नव्हते. ते हतबल होऊन जीन्यात उभे राहून सगळा गोंधळ पाहत होते. मिलिंद काका पुढे झाले आणि त्यांनी हिंसक जमावाला सामोरे जात, त्यांच्या अशा तर्‍हेने चाल करून येण्याचे कारण विचारले. "कारण काय विचारता डॉक्टर ? या तुमच्या पोरीने आमच्या देवासमान नेत्याला फेसबुकवर शिव्या दिल्या विचारा तीला." त्यांचे बोलणे ऐकून प्राजक्ताच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. रागात टाकलेल्या कमेंट चा तिला पस्तावा झाला. पण आता काही उपयोग नव्हता. जमाव काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. हॉस्पिटलचे खूप नुकसान झाले होते. स्टाफमधील काही जण आणि दोन तीन पेशंट सुद्धा जखमी झाले होते. जमावातील दोघे तिघे जण काका काकू आणि प्राजक्ताच्या दिशेने हॉकीस्टिक उगारत धावून आले. त्यांच्यापैकी एका वयस्कर माणसाने त्यांना आवरले आणि तो मिलिंद काकांना म्हणाला, "डॉक्टर तुम्ही देव माणूस, आमची इतकी वर्षं इमाने इतबारे सेवा केली. पण तुमच्या पुतणी ने सगळ्यावर पाणी फिरवले. तुम्ही लवकरात लवकर हे गाव सोडून निघून जा, नाहीतर ही लोक तुम्हाला जिवंत सोडणार नाही."
त्यादिवसा नंतर प्राजक्ता आणि काका काकूंना घराबाहेर पडणे कठीण झाले. रात्री बेरात्री त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली होती. असं वाटत होतं की, फेसबुकवरच्या पोस्टच्या रागाच्या आड काही हितशत्रू आपला दावा साधून प्राजक्ता च्या कुटुंबियांना गाव सोडायला भाग पाडत होते. शेवटी या प्रकाराला कंटाळून काका-काकू आणि प्राजक्ता ने मालवण सोडून बंगलोर ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. बंगलोर ला मालती काकूच्या भावाचे मोठे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल होते, तिथे दोघांनी रुजू होण्याचे ठरले. इतक्या वर्षांचे मालवण मधले वास्तव्य आणि जम बसलेली प्रॅक्टीस सोडून जाणे दोघांना फार जीवावर आले होते. पण करणार काय??
*****
प्राजक्ता आणि तिचे काका काकू आज बंगलोरला निघाले होते. मालवण सोडून कायमसाठी. फेसबुकवर रागात पोस्ट केलेल्या एका कमेंटने त्या सर्वांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते.
*****




No comments:

Post a Comment