Thursday 28 June 2018

स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

स्मार्टफोन. . . आपल्यापैकी बहुतेक जणांच्या आयुष्यात महत्त्वाचा असणारा. आपण आपल्या स्मार्टफोनची बाह्यतः    खूप काळजी घेतो. बॅककव्हर, स्क्रीनगार्ड लावून त्याला सुरक्षित ठेवतो.  हे गरजेचेही आहे. पण या बाह्य काळजीबरोबरच आपल्या स्मार्टफोनची अंतर्गत काळजी घेणे ही खूप जरुरी आहे. कारण आपला वैयक्तिक आणि महत्त्वाचा डाटा आपल्या स्मार्टफोनमध्ये असतो. जसे सोशल नेटवर्किंगवरील मेसेजेस, मोबाईल बँकिंगचे आणि ईमेल अकाऊंट्सचे पासवर्डस् इत्यादी. . .

स्मार्टफोनची सुरक्षितता

स्मार्टफोन इंटरनेटला जोडलेला असल्याने त्यावर व्हायरस, ट्रोजन, हॅकर्सचा वगैरे हल्ला होण्याची शक्यता असते. स्मार्टफोनवरील डाटा चोरीलाही जाऊ शकतो. या सगळ्यापासून स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठीचे काही उपाय.

- स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम / सॉफ्टवेअर सूचना मिळाल्यावर लगेच अपडेट करावे.

- स्मार्टफोनवरील ॲप्सचे अपडेट्स उपलब्ध झाल्यावर शक्यतो लगेच डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.

- आपल्या वापरासाठी लागणारे ॲप्स स्मार्टफोनमध्ये मुळातच उपलब्ध असल्यास त्याचाच वापर करावा. त्यासाठीच्या इतर ॲप्स (थर्ड पार्टी ॲप्स) चा वापर शक्यतो  टाळावा. उदाहरणा दाखल आरोग्याशी संबंधित ॲप वापरायचे असल्यास सॅमसंग फोनमध्ये सॅमसंग हेल्थ हे ॲप उपलब्ध आहे.

- आवश्यक असलेलेच थर्ड पार्टी ॲप्स स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे. जसे मोबाईल बँकिंग, युपीआय, शेअर बाजार, म्युच्युअल फंड , रेल्वे/बस रीझर्वेशन संबंधित ॲप्स.

- कुठलेही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर त्याचे गुगलवर रिव्ह्यूज तपासावे. कुठल्याही ॲपला आवश्यक तेवढ्याच एक्सेस परमिशन्स द्याव्यात. जसे मोबाईल बॅंकिंग ॲपला एसएमएस, स्टोरेज आणि लोकेशन एवढ्याच परमिशन्स आवश्यक आहेत.

- कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्टोरेजची परमिशन देताना विशेष सावधगिरी बाळगावी. या परमिशन्स वापरून काही ॲप्स नकळत तुमचे फोटो काढून त्यांच्या साइटवर अपलोड करू शकतात. तुमचे संवाद रेकॉर्ड करू शकतात तसेच स्टोरेजमधील फोटो, व्हिडिओ आणि इतर डाटाची चोरी करू शकतात.

- दिलेल्या परमिशन्स सेटिंग्जमध्ये जाऊन काढूनही घेता येतात.

- स्मार्टफोनवर क्विकहील, नोर्टन किंवा एव्हीजी यासारखे चांगले अँटीव्हायरस ॲप इन्स्टॉल करावे आणि ते कायम अपडेटेड ठेवावे. सध्या अँटीव्हायरस असल्याचा दावा करणारे बरेच मॅलीशियस ॲप्स इंटरनेट वर उपलब्ध आहेत. असे ॲप्स वापरल्यास व्हायरस आणि ट्रोजन्स ना प्रतिबंध होण्याऐवजी तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्यांचा शिरकाव होतो आणि स्मार्टफोनचा डाटा लीक होऊ शकतो.

- काही टेक्निकल कारण नसताना आणि इंटरनेटचा खूप वापर नसताना देखील मोबाईल डेटा चा जास्त वापर होत असेल आणि / किंवा बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असेल तर हॅकिंग ची संभावना असू शकते. अशा वेळेस  जाणकाराकडून मोबाईल तपासून घ्यावा. फॅक्टरी रीसेट करून देखील हॅक झालेला मोबाईल दुरुस्त करता येतो.

डाटा, स्टोरेज आणि मेमरी यांची देखभाल

- अँटी व्हायरस ॲपचा वापर करून दोन तीन दिवसांतून एकदा मेमरी आणि जंक फाइल्स साफ करावे आणि फोन स्कॅन करावा.

- वापरात असलेले ॲप्स तेवढे चालू ठेवून बाकीचे मिनिमाइझ न ठेवता बंद ठेवावे.

- स्मार्टफोनवरील सर्व डाटा, काँटॅक्ट्स, ॲप्स आणि सेटिंग्सचा बॅकअप ठेवावा. स्मार्टफोन ज्या ब्रॅण्डचा आहे त्याच्या क्लाऊडवर (web space) ऑटो बॅकअप करण्यासाठीचे सेटिंग करावे. दुहेरी सुरक्षा म्हणून काँटॅक्ट्स मेमरी कार्ड किंवा इमेलवर एक्सपोर्ट (सेव) करून ठेवावे.

- जमा झालेले फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस वेळच्यावेळी काढून टाकावे.

- संग्रहणीय असलेले फोटो आणि व्हिडिओ मेमरी कार्डमध्ये ठेवावे.

- रात्री झोपताना स्मार्टफोनवरील इंटरनेट बंद ठेवावे.

- आठवड्यातून एकदा तरी स्मार्टफोन पूर्णपणे बंद करून दहा ते तीस सेकंदाने परत सुरू करावा.

- पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न (लक्षात राहील असे) वापरून मोबाईल नेहमी लॉक ठेवावा. मात्र लॉक स्क्रीन वर आपल्या जवळच्या व्यक्तिची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिसत राहिल, अशी सेटिंग करावी. आपत्कालीन परिस्थितीत याचा उपयोग होतो.

- मोबाईल डिव्हाईस बदलल्यास, जुन्या डिवाइस वरचे सेटिंग्स, ॲप्स, म्युझिक, फोटो, कॉन्टॅक्ट वगैरे सर्व माहिती नव्या डिवाइस मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी स्मार्ट स्विच सारखे ॲप्स वापरू शकता

याप्रमाणे स्मार्टफोनची काळजी घेतल्यास आपला वैयक्तिक डाटा सुरक्षित राहतो. स्मार्टफोन हँग होणे, अचानक रीसेट होणे हे प्रकार टळतात. आणि बरेच दिवसांपर्यंत स्मार्टफोन सुस्थितीत राहतो.

©कविता दातार

3 comments: