Friday, 30 November 2018

सावधान भाग ४

सावधान भाग ४


मेघा आज विशेष उत्साहात होती. तिचे आणि समीरचे दुबई ला जाण्यासाठीचे एअर तिकीट आणि व्हिसा तिच्या मेलवर ट्रॅव्हल कंपनीकडून आजच आला होता. आठवडाभरापूर्वीच बँकेकडून कुरियरमार्फत नवे चिप बेस्ड डेबिट कार्ड तिला मिळाले होते. एटीएमवर जाऊन तिने त्याचा पीन सेट करून त्याला अॅक्टिवेट देखील केले होते. सेट केलेला पीन तिने कार्ड कव्हर वर व्यवस्थित (!) लिहून ठेवला. कार्डवरची स्पेंडिंग लिमिट पाहूनच तिने आपली शॉपिंग लिस्ट बनवली. मोठ्या उत्साहाने ती प्रवासाच्या तयारीला लागली.

दुबईत पोहोचल्यावर सिटी टूर, डेझर्ट सफारी वगैरे झाल्यावर टुर गाईड सोबत सर्वजण ग्लोबल व्हिलेजमध्ये आले. तिथे प्रत्येक देशाचा एक स्टॉल होता आणि त्यावर त्या देशातल्या विशेष वस्तू आणि खाद्यपदार्थ विकायला ठेवले होते. तिथे भारताच्या स्टॉलवर गाय वासराची एक सुंदर पितळीची मूर्ती मेघाला खूप आवडली आणि तीने ती खरेदी केली. मूर्तीची किंमत जास्त असल्याने आणि तेवढे डरहॅम तीच्या जवळ नसल्याने तिने तिच्या डेबिट कार्डने पेमेंट केले. स्टॉलवरून बाहेर पडताना एका चायनीज मुलीचा तिला धक्का लागून तिच्या हातातले सामान खाली पडले. दिलगीरी व्यक्त करून ती मुलगी तिच्या बरोबर खाली वाकून तीचे सामान गोळा करू लागली आणि नंतर तिथून निघून गेली. रात्रि हॉटेलवर पोहचल्या वर तिच्या लक्षात आले की तिच्या मोबाइलवर इंटरनॅशनल रोमिंग नसल्याने बँकेकडून कुठलाही अलर्ट मेसेज तिला येऊ शकणार नव्हता. तिने ही गोष्ट समीरला सांगितली पण त्यावर फार विचार न करता टूर एन्जॉय कर असे त्याने तिला समजावले.

चार दिवसांचा दुबई टूर मस्त एन्जॉय करून दोघेही मुंबईत परतले. मुंबईत आल्याच्या दुसऱ्या दिवशी समीर अॉफिसला गेल्यावर तिने लॅपटॉप उघडून आपल्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट पाहीले आणि तिला धक्का बसला. टूरवर जाण्याआधी अकाउंटमधे सव्वाचार लाख रुपये बॅलन्स होता आणि आता बँकेचे स्टेटमेंट केवळ दीड लाख बॅलन्स दाखवत होते. एवढी तर तीने खरेदी केली नव्हती. तिने स्टेटमेंट नीट बघितले. पावणे तीन लाख रुपये डेबिट कार्डने पे केलेले दिसत होते. तिने हिशोब लावला साधारणतः एक लाखाची तिने खरेदी केली होती. मात्र हे पावणे दोन लाख रुपये कुठेही खर्च केलेले तिला आठवत नव्हते. मेघाने बँकेत जाऊन तपास लावण्याचे ठरवले. बँकेतील अधिकाऱ्याने तिला सांगितले की हे पैसे दुबई मॉल मधे तिचेच डेबिटकार्ड वापरून खर्च केले गेले आहेत. यापेक्षा जास्त माहिती तो सांगू शकला नाही. मेघाला दुबई मॉल मधे काही खरेदी केल्याचे आठवत नव्हते. तिने समीरला फोन लावला आणि सगळं सांगून विचारलं,
"समीर, अरे तु दुबई मॉल मधे माझे डेबिट कार्ड वापरुन काही खरेदी केलं आहेस का?"
"माझ्याजवळ माझे कार्ड असताना मी कशाला तुझे कार्ड वापरेन?? ते ही तुला न सांगता? काहीतरी काय??"
समीरने चिडून म्हंटले.
"चिडू नकोस ना. मी फक्त खात्री करण्यासाठी विचारले."
रडकुंडीला येऊन मेघा म्हणाली.
"ठीक आहे. . तू काळजी करू नकोस. . मी शॉर्ट लिव्ह घेऊन लवकर घरी येतो. मग आपण माझ्या सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट असलेल्या मित्राकडे जाऊन काय करता येइल ते बघू."
एवढे बोलून त्याने फोन ठेवला. मेघाच्या मनाला थोडी उभारी आली. पण तिची बैचेनी कमी झाली नाही. ती संध्याकाळ केव्हा होते याची वाट पाहू लागली.

संध्याकाळी समीर आल्यावर दोघेही त्याच्या सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट असलेल्या जॉय विल्सन नावाच्या मित्राच्या ऑफिसला आले. जॉयला सर्व हकीकत सविस्तर पणे सांगून काय करता येईल असे समीरने विचारले. थोडा वेळ विचार करून, लॅपटॉपवर काही सर्च करून जॉयने मेघाला विचारले "कार्ड वापरून शॉपिंग केल्यावर कोणी तुमचे कार्ड घेतले होते का? किंवा तुमच्या फार जवळ आले होते का ?" मेघाला कळेना कि हा असे का विचारतो आहे? मग तिला एकदम आठवले आणि ती म्हणाली, "हो एक चायनीज मुलगी मला येउन धडकली होती. त्यामुळे माझ्या हातातील सामान खाली पडले आणि तिने ते माझ्याबरोबर खाली बसून उचलून दिले" हे ऐकून जॉय म्हणाला. "ती चायनीज मुलगी नक्कीच हॅकर असणार. तुमच्या सामानासोबत कार्डही खाली पडले असणार. तिने त्यावरचा पीन पाहून लक्षात ठेवला असणार आणि तिच्या जवळच्या वायफाय अॅडॉप्टरच्या सहाय्याने तुमचे डेबिट कार्ड डिटेल्स चोरले असणार. नंतर ते डिटेल्स ब्लँक प्लॅस्टिक कार्डवर कॉपी करून दुबई मॉल मधे शॉपिंग केली असणार. सर्व परिस्थिती पाहता सायबर गुन्हेगाराचा माग काढणे आणि तुमचे पैसे परत मिळणे कठीण दिसतेय. कारण गुन्हा आपल्या देशात घडला नसून दुसऱ्या देशात घडला आहे आणि गुन्हेगार तिसर्‍याच देशातला आहे. ही घटना घडूनही तीन चार दिवस होऊन गेले आहेत. तरी मी जमतील तसे प्रयत्न करतो." यापुढे शक्य ती काळजी बाळगण्याचे मनाशी ठरवून जॉयचा निरोप घेउन मेघा समीर तिथून बाहेर पडले.

जॉयने सांगितल्याप्रमाणे वायफायचे चिन्ह असलेले नवीन चीप बेस्ड डेबिट आणि क्रेडिट कार्ड आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेन्टिफिकेशन) एनेबल्ड असते. त्यामुळे वायफाय असलेल्या ठिकाणी कार्ड रीडरमध्ये स्वाइप न करता फक्त टॅप केले तरी चालते. एवढेच काय एखादा हॅकर तुमच्या सहा सात इंच जवळ आल्यावरही तुमच्या कार्डचे डिटेल्स आरएफआयडी मुळे वायफाय अॅडॉप्टर वापरून हॅक करू शकतो. मात्र ते डिटेल्स वापरून तो कुठलेही एकच ट्रान्जेक्शन करू शकतो. कारण आरएफआयडी च्या द्वारे पास झालेला कोड दरवेळेस वेगळा असतो. हे टाळण्यासाठी तुम्ही आपले कार्ड ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून सोबत बाळगू शकता किंवा आरएफआयडी ब्लॉकिंग वॉलेट कुठल्याही शॉपिंग साइटवरून किंवा दुकानातून खरेदी करून वापरू शकता. तेव्हा सावधान आणि सुरक्षित राहून नवीन टेक्नोलॉजी चा वापर करा.

© कविता दातार

Friday, 23 November 2018

सावधान भाग १

सावधान भाग १

प्रसंग १

मोहिनीने मेलबॉक्स उघडला. तिच्या बँकेकडून आलेले मेल दिसत होते. त्यात एक लिंक दिली होती. बँकेच्या नेट बँकिंग अॅप ची ती लिंक होती. लिंक क्लिक करून ते अॅप मोहिनीने मोबाइल वर इंस्टॉल केले. चेक करून पाहण्यासाठी अॅप ओपन करून तिने आपला कस्टमर आयडी आणि पासवर्ड देऊन  सबमिट बटन क्लिक केले. त्याबरोबर तिचा मोबाइल हँग झाला. रिसेट करून मोबाइल सुरू केल्यावर  बँकेकडून साठ हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज तिला आला. बर्‍याचदा हॅकर्स बँकेच्या इमेल आयडीशी मिळता-जुळता
इमेल आयडी वरून लोकांना इमेल पाठवून फसवणूक करतात.

प्रसंग २

सकाळी १० च्या सुमारास समीरला एक फोन कॉल आला. एक्सवायझेड सिक्युरिटीज मधून बोलत असल्याचे आणि आजचा दिवस शेअर ट्रेडिंग, ब्रोकरेज फ्री असल्याचे पलीकडील मुलीने गोड आवाजात सांगितले. ट्रेडिंग करण्यासाठीचे अॅप तिने त्याला मेलद्वारे पाठवले. समीरने ते इंस्टॉल केले.  समीरचे एक्सवायझेड बँकेत डिमॅट अकाऊंट होते. त्या अॅपमध्ये त्याच्या डिमॅट अकाउंटचे डिटेल्स दिसत होते. शेअर खरेदी करण्यासाठी लिंक दिसत होती. तरीही खात्री करुन घेण्यासाठी त्याने बँकेत फोन केला. तेथील अधिकार्‍याने ब्रोकरेज फ्री अॉफर नसल्याचे सांगितले. वेळीच समीरने खात्री करून घेतल्याने त्याची आर्थिक फसवणुक टळली.

बनावट अॅप्सपासून सावधान रहा. गुगल प्लेस्टोअर किंवा  आयओएस अॅप स्टोअर या सारख्या खात्रीच्या स्रोतांवरूनच कुठलेही अॅप इन्स्टॉल करून वापरा.

©कविता दातार

सावधान भाग २

सावधान भाग २

रीना लग्न होउन मुंबईत येउन वर्ष उलटलं होतं. तिचे एमसीए पर्यंत शिक्षण झाले होते. इंटरनेट वरील एका जॉब पोर्टलच्या माध्यमातून तिने पाच सहा कंपन्यांमधे नोकरीसाठी अप्लाय केले होते. काही दिवसांनी तिला एका नावाजलेल्या कंपनीकडून (??) ईमेल आले. ईमेलनुसार रीना त्या कंपनीत ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर  या पदासाठी निवडली गेली होती. सिक्युरिटी म्हणून तिचे डेबिट कार्ड डिटेल्स  कंपनीला हवे होते. बर्‍याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या रीनाला या बातमीमुळे खूपच आनंद झाला. फारसा विचार न करता तिने आपल्या डेबिट कार्डचे डिटेल्स त्या मेल आयडी वर पाठवले. तासाभरात तिला एक फोन आला. फोनवर बोलणारी मुलगी अत्यंत आर्जवी स्वरात पाचशे रुपये प्रोसेसिंग चार्जेस तिच्या डेबिट कार्ड वरून वळते करण्यासाठी परवानगी मागत होती. त्यासाठी जो ओटीपी तिच्या मोबाइल वर येइल तो पाठवण्याची तिने विनंती केली. रीना ला माहीत होते कि कोणाशीही कार्ड डिटेल्स आणि ओटीपी कधी शेअर करू नाही. पण तिला चालून आलेली नोकरीची संधी सोडावी वाटत नव्हती. तिने बँकेकडून आलेला ओटीपी ज्या नंबरवरून कॉल आला होता त्यावर  एसएमएस करून पाठवून दिला. थोड्याच वेळात तिच्या अकाऊंट मधले तीस हजार रुपये डेबिट झाल्याचा एसएमएस तिला आला. तिने लगेचच थोड्या वेळापूर्वी आलेल्या फोनवर फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला पण तो फोन बंद होता. तिला स्वतःच्या मूर्खपणावर खूप राग आला. अचानक तिला कुठेतरी वाचल्याचे आठवले की आरबीआयच्या नव्या नियमा नुसार डेबिट/क्रेडिट कार्ड फसवणुकीमुळे झालेले ग्राहकांचे नुकसान तीन दिवसांच्या आत बँकेत रिपोर्ट केल्यास बँकेकडून १००% नुकसान भरपाई मिळते. त्याप्रमाणे लगोलग ती बँकेत जायला निघाली. बँकेतील अधिकाऱ्याने सांगितले तुम्ही ओटीपी स्वतःहून दिला असल्यामुळे आम्ही हे नुकसान भरून देऊ शकत नाही.

बऱ्यांच प्रसंगांत असे होते की सुजाण, सुशिक्षित, लोकांना सर्व काही माहित असते जसे डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स, ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. नुकसान झाल्यास सायबर सेलला कम्प्लेंट करून बँकेत रिपोर्ट करावा म्हणजे नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच कुठलीही कंपनी तुम्हाला नोकरी देताना तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही किंवा तुमची कार्ड डिटेल्स मागत नाही.  पण परिस्थितीवश किंवा काही कारणाने त्यांच्या हातून अशा चुका घडतात आणि ते आर्थिक फसवणुकीला बळी पडतात.

यावर एक उपाय असा करता येइल कि आपण ज्या अकाऊंटद्वारे नेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंट करतो. त्या अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवावा म्हणजे नुकसान जरी झाले तरी त्याची तीव्रता कमी असेल. काही ठिकाणी डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याची सुरक्षित रक्कम मर्यादा जास्त असल्यामुळे नुकसान कमी होते. तसेच क्रेडिट कार्ड चोरी झाल्यास त्यानंतर त्याच्याद्वारे होणार्‍या व्यवहारांची जबाबदारी  कार्डधारकाची नसते. मात्र बँकेच्या हेल्पलाईनवर आणि सायबर सेलला चोरीची कंप्लेंट दिली गेली असावी.

©कविता दातार

सावधान भाग ३

सावधान भाग ३
आशाताई. . वय वर्षे सदुसष्ट. वयाच्या मानाने खूपच अॅक्टिव्ह, अलर्ट, पॉझिटिव्ह. सतरा वर्षांपूर्वी एकुलत्या मुलगा आणि सुनेचा रस्ता अपघातात झालेला अकाली मृत्यू त्यांना मुळापासून हादरवून गेला. पण पाच वर्षांच्या शाल्मली कडे पाहून त्यांनी आपले आभाळाएवढे दुःख गिळले. आणि तिच्या संगोपनात स्वतःला झोकून दिले. आता शाल्मली बीटेक, एमबीए होऊन मुंबईत मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतेय.
व्हॉट्सअॅपच्या नोटिफिकेशन साउंड ने आशाताई भानावर आल्या. त्यांनी हातातले पुस्तक बाजूला ठेवले आणि मोबाइल उचलला. कुठला तरी नवाच नंबर दिसत होता पण प्रोफाईल फोटो मात्र शाल्मलीचा होता.
"हाय आज्जी. ."
"अग हा कुठला नंबर आहे ?"
"मी म्हटले होते ना, ड्युएल सिम मोबाइल आहे तर जीओचे अजून एक सीम घेते. त्यावरून कॉलींग स्वस्त पडतं. त्यावरूनच तुला मेसेज करतेय. कशी आहेस?"
"मी छान आहे गं. . पण आजकाल तुझा आवाज दुर्लभ झालाय. . मला माहित आहे तुला खूप काम असतं, पण कधीतरी आजीसाठी थोडा वेळ काढावा की. . "
"हो ग एकदा हे प्रोजेक्ट संपलं ना कि मी जरा मोकळी होईन. मग नाशिकला २ -३ दिवस तुझ्याकडे येईन तेव्हा खूप गप्पा करूया. बरं ऐक ना. . मला ओनर ने फ्लॅट रीकामा करायला सांगितलं आहे. मी नवी जागा बघितली आहे पण डिपॉझिट दीड लाख म्हणताहेत. आता मी तिथूनच बोलतेय. लगेचच ही जागा फायनल करावी लागेल. नाहीतर कुठे रहायचे प्रश्न आहे. माझ्याजवळ सध्या एवढे पैसे नाहीत. सॅलरीची वाट बघत बसले तर ही जागा हातची जाईल. तु दीड लाख लगेच ट्रान्सफर करतेस का? नाहीतर तुझे कार्ड डिटेल्स दे. ते वापरून ऑनलाइन पेमेंट करते मी या फ्लॅटच्या ओनर ला."
"हं थांब. .कार्ड कुठे ठेवलं बरं मी. . हं आठवलं. . पर्स मधे ठेवलं होतं. .हं घे लिहून. . 4212xxxxxxxx7654. कार्डवरचे नाव आशा दीक्षित. एक्स्पायरी डेट 12/23. सीव्हीव्ही 911. एवढ्याने काम होईल ना? फ्लॅट नीट बघून घे. सर्व सोयी आहेत ना ? याची खात्री करून घे आणि डील झाल्यावर मला कळव. "
"थॅंक्स माय डियर आज्जी. . तुझ्या फोनवर एक ओटीपी येईल तो मला या नंबरवर लगेच फॉरवर्ड कर. मी पळते. I will catch you later....Byeee !!"
शाल्मली ऑफलाइन झाली. आशाताईंनी हसून फोन खाली ठेवला. फोनवर आलेला ओटीपी त्यांनी लगेच शाल्मलीच्या नव्या नंबर वर फॉरवर्ड केला. थोड्या वेळाने त्यांना परत मेसेज आल्याचा साउंड आला. "शामुने ओनरला पैसे ट्रान्सफर केले असणार." असे मनाशी म्हणून मेसेज न पाहताच बाजूला ठेवलेले पुस्तक त्यांनी उचलले.
संध्याकाळचे साडेसहा वाजले. फिरण्यासाठी म्हणून त्या बाहेर निघणार एवढ्यात मोबाइल वाजला. त्यांनी फोन उचलला. पलीकडून शाल्मली बोलत होती.
"काय गं ! पैसे दिलेत का ओनरला? केव्हा शिफ्ट होतेय नव्या जागेत ?" त्यांनी विचारले.
"कुठली नवी जागा?? कशा संबंधी बोलतेयस तु?" शाल्मलीने गोंधळून विचारले.
"अगं मघाशी नाही का आपण व्हॉट्सअॅपवर बोललो?? तुझ्या नव्या नंबरवरून? तुला मी माझे कार्ड डिटेल्स दिले. तुला दीड लाख रुपये लवकरात लवकर ओनरला ट्रान्स्फर करायचे म्हणलीस नवी जागा घेण्यासाठी."
"आजी बरी आहेस ना तू? मी आज दोन दिवसांनंतर तुझ्याशी बोलतेय. आणि माझा ह्या नंबर व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नंबर नाही आहे. तू कोणाला दिलेस कार्ड डिटेल्स ??"
आशाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी शाल्मलीला सर्व घटनाक्रम सांगितला. शाल्मली अवाक झाली. तिने त्यांच्याकडून ज्या नंबरवरून व्हाॅटस्अॅप मेसेजेस आले तो नंबर मागितला. त्यांनी फोन बंद केला आणि व्हॉट्सअॅपवरून शाल्मलीला तो नंबर पाठवला. मघाशी आलेला बँकेकडून चा मेसेज त्यांनी बघितला. त्यांच्या अकाऊंटमधून चार लाख डेबिट झाले होते. आशाताईंना स्वतःच्या मुर्खपणाचा खूप राग आला. अगतिकतेने त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. खूप मोठा आर्थिक फटका त्यांना बसला होता. स्वतःही त्यांनी त्या नंबरवर दोन तीनदा कॉल केला पण हा नंबर अस्तित्वात नाही असा त्यांना रिप्लाय मिळाला. त्यांनी बँकेच्या हेल्पलाइनला फोन करून सर्व डिटेल्स देऊन काही करता येत असल्यास करण्याची विनंती केली. पण त्यांनी स्वतःच ओटीपी फॉरवर्ड केल्याने हेल्पलाइन ऑपरेटरने त्यांना पैसे परत मिळणे कठीण असल्याचे सांगितले. तरी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आशाताईंना त्या आश्वासनातील फोलपणा जाणवला.
शाल्मलीने सुद्धा बँक हेल्पलाइनला फोन केला. सायबर सेलला ऑनलाइन कम्प्लेंट दिली. कम्प्लेंट ची कॉपी घेऊन दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन सर्व घटना सांगून पैसे परत मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. एका सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटचीही मदत घेतली. त्याने दिलेल्या माहितीनुसार कार्ड डिटेल्स चा उपयोग करून सायबर चोराने ऑनलाइन ज्वेलरी विकत घेतली होती. ज्या सीमकार्डवरून आशाताईंना मेसेजेस आले होते ते सिमकार्ड दादर मधील एका दुकानातून शाल्मलीच्या नावानेच खरेदी केले गेले होते. दोन महिन्यांच्या तपासाअंती सुद्धा अजूनपर्यंत सायबर गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला नाही.
हा घटनाक्रम पाहता एक खूणगाठ प्रत्येकाने लक्षात ठेवावी कि कुठल्याही परिस्थितीत आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स फोन किंवा इमेल वरून अगदी आपल्या जवळच्या माणसांशीही कधीही शेअर करू नये. तसेच आपले आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे कागदपत्रं कुठे द्यायचे झाल्यास त्यावर तारीख आणि कशासाठी देत आहात ते लिहून सही करावी. म्हणजे पुनःपुन्हा त्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही.

©कविता दातार

Tuesday, 2 October 2018

इंटरनेट वरील अर्थार्जनाचे मार्ग

#WorkFromHomeThruNet
#इंटरनेट वरील #अर्थार्जनाचे_मार्ग


इंटरनेट हे माहिती आणि मनोरंजनाचा खजिना हे आपणां सर्वांना माहितच आहे. याबरोबरच इंटरनेट वापरून आपण अर्थार्जन देखील करू शकतो हेही तुम्हांला ऐकून माहीत असेल. इंटरनेटवर अर्थार्जनाचे भरपूर मार्ग उपलब्ध आहेत जसे,

-#फ्रिलान्सर
तुम्ही  प्रोग्रामर, डिझायनर, मार्केटर, अकाउंटंट, कंसल्टंट, लेखक किंवा काहीही असलात तरी तुम्हाला इंटरनेटवरील फ्रीलान्सिंग वेबसाइट्सवर भरपूर काम उपलब्ध आहे. फ्रीलान्सर म्हणून काम देणाऱ्या काही विश्वासार्ह वेबसाइट्स. . .
Upwork.com
Elance.com
Freelancer.com
Guru.com
99designs.com
या साइट्सवर तुमचे आकर्षक प्रोफाइल बनवून, तुम्ही जे जे काही करू शकतात ते सर्व पर्याय निवडून ठेवल्यास तुम्हाला  नक्कीच काम मिळू शकते.  माझ्या परिचयातील एका मुलीने पुण्यातील नोकरी गमावल्यावर  Upwork या साइटच्या माध्यमातून वेब डिझाइनिंग करून अवघ्या वीस दिवसांत पंधराशे डॉलर्स कमावले. तुम्ही उत्तम चित्रकारी करत असाल तर 99designs या साइटवर  तुम्हाला खूप काही करण्यासारखे आहे.

- फ्रीलान्सर म्हणून काम करण्यासाठी तुम्ही खूप वेळ देऊ शकत नसाल तर काही छोटी कामे सुद्धा काही साइट्सवर उपलब्ध आहेत. जसे मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर करणे, स्कॅन केलेल्या पुस्तकातील उतारे टाइप करणे, कपड्यांचे डिझाइन्स बनवणे, लोगो डिझाइन्स, डेटा एन्ट्री वगैरे. यासाठी तुम्हाला कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ५० डॉलर्स मिळू शकतात आणि कुठलीही बांधिलकी न ठेवता तुम्ही जमेल तेव्हा काम करू शकता. अशी छोटी कामं देणाऱ्या साइट्स पैकी काही लोकप्रिय साइट्स आहेत
mturk.com (Amazon's mechanical turk)
fiverr.com
peopleperhour.com
या साइट्स म्हणजे कमी अवधीत काम करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या लोकांच्या मार्केट प्लेसेस आहेत.

- तुम्ही डॉक्टर, डायटिशियन, सायकॉलॉजिस्ट, शिक्षक किंवा समुपदेशक  असाल तर तुमच्या #लेक्चर्स_टिप्स आणि #सल्ल्यांचे_व्हिडिओज बनवून लिंकच्या स्वरूपात लोकांना उपलब्ध करून पैसे मिळवू शकता. हे सर्व कसे करायचे हे समजून घेण्यासाठी या विषयातील सल्लागारांची मदत घेता येइल.
-  वरील प्रमाणे व्हिडिओज बनवून यूटय़ूबवर (YouTube.com) अपलोड करता येतील. यासाठी फक्त तुमचे जीमेल अकाऊंट असणे गरजेचे आहे. व्हिडिओ सोबत जाहिराती दाखविल्यास जाहिरातदारांकडून यूट्यूबला पैसे मिळतात व त्यातील चोपन्न टक्के भाग व्हिडिओ ज्याने अपलोड केला आहे त्याला दिला जातो. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या अर्चना हेब्बर यांनी तेथे सॉफ्टवेअर टेस्टींगमध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना नोकरी मिळाली नाही. मग वेळ जाण्यासाठी म्हणून त्यांनी साऊथ इंडियन खाद्यपदार्थांचे ब्लॉग्ज लिहिणे सुरू केले. मैत्रिणीच्या सांगण्यावरून खाद्यपदार्थ बनवण्याचा व्हिडिओ बनवून त्यांनी यूट्यूबवर टाकला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज त्यांचे हेब्बर किचन या नावाचे यू ट्यूब चॅनेल सुप्रसिद्ध आहे आणि त्या लाखों रुपये कमवत आहेत.

- Meesho, Sello, InstaShop, SocialShopWave या आणि अशा काही #अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकांशी जोडले जाऊन त्यांना #ऑनलाइन_शॉपिंग उपलब्ध करून देऊ शकता. हा पर्याय वापरून अनेक गृहिणी घरबसल्या महिन्याला हजारो रुपये कमवत आहेत.

- #फेसबुक_पेज बनवून ते प्रमोट करून (पेजची जाहिरात करून, (हा पर्याय फेसबुकवर उपलब्ध आहे) ) त्यावर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या प्रोडक्ट लिंक्स उपलब्ध करून त्या लिंक्स बघणाऱ्यांनी क्लिक केल्यास आणि त्यावरून खरेदी केल्यास शॉपिंग वेबसाइट तुम्हाला चार ते दहा टक्के कमिशन देते. या प्रकाराला अफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात.

- फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवर प्रोडक्ट रिव्ह्यूज लिहून सुद्धा ते प्रॉडक्ट विकणाऱ्या शॉपिंग साइट कडून तुम्हाला कमिशन मिळू शकते. यासाठी मात्र लेखन कौशल्याबरोबरच त्या प्रॉडक्टची माहिती असणे जरुरीचे आहे.

- तुमचे लेखन कौशल्य वापरून तुम्ही एखाद्या #स्टार्टअप किंवा #वेबसाइटसाठी_लेखकाचे काम करू शकतात. याला कंटेंट रायटिंग असे म्हणतात. कन्टेंट रायटर्स ला इंटरनेटवर बऱ्यापैकी मागणी आहे. एक चांगला कंटेंट रायटर प्रत्येक आर्टिकल साठी ५००० ते २०००० रुपये घेतो.

- तुम्ही एखाद्या विषयात निष्णात असाल आणि तुमचे लेखन कौशल्य चांगले असेल तर तुम्ही #स्वतःची_वेबसाइट सुरू करून त्यावर #ब्लॉग लिहू शकतात. त्या ब्लॉग सोबत प्रोडक्ट लिंक्स जोडून अँफिलिएट मार्केटिंग करून बर्‍यापैकी पैसे कमवता येतात. मात्र यासाठी किमान पंधरा हजारांची सुरुवातातीला गुंतवणूक करावी लागते. तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि काही महिने किंवा एक दोन वर्षे वाट बघून मग कमाई सुरू होते. या कमाईत सातत्य असून हे तुमचे स्वतःचे रचनात्मक काम असते. अमित अग्रवाल, अर्चना दोषी, प्रदीप गोयल हे भारतातील काही सुप्रसिद्ध ब्लॉगर लाखो रुपये महिना कमावतात. सौंदर्य, आरोग्य, पाककला, गुंतवणूक, तंत्रज्ञान या विषयांवरील ब्लॉग्ज लोकप्रिय ठरतात.

- तुम्ही #डिझायनर असल्यास स्वतः डिझाइन केलेले कपडे, ज्वेलरी, शो पीसेस अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या अॉनलाइन शॉप वर विकायला ठेवू शकता किंवा स्वतःचे डिजिटल स्टोअर (स्टार्टअप) सुरू करू शकतात. डिजिटल स्टोअर सुरू करण्यासाठी सुरुवातीला बऱ्यापैकी गुंतवणूक आणि मेहनतीची तयारी हवी.

गृहिणी, अर्थार्जनाची गरज असलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींनी या पर्यायांचा विचार करण्यास हरकत नाही.

काही कारणाने नोकरी गमावलेल्या, दुर्दैवाने अपघातामुळे किंवा आजारपणामुळे घरी बसावे लागलेल्या लोकांनी निराश न होता या सर्व पर्यायांचा जरुर विचार करावा.

©कविता दातार

Tuesday, 21 August 2018

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला

पुणे येथील ११२ वर्षें जुनी कॉसमॉस सहकारी बँक गेल्या आठवड्यात मोठ्या सायबर हल्ल्याने हादरली. अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत बँकेच्या ९४.४२ कोटी रुपयांवर सायबर चोरांनी डल्ला मारला. कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे याच्यानुसार या हल्ल्याचा स्त्रोत कॅनडामध्ये आहे.
पहिला सायबर हल्ला शनिवारी ११ ऑगस्टला झाला. यात सायबर चोरांनी बँकेच्या एटीएम स्विच सर्व्हरवर मालवेअर वापरून ताबा मिळवला. मालवेअर (malicious software) हे एक प्रकारचे व्हायरस सॉफ्टवेअर असून त्याचा वापर करून हॅकर्स कुठल्याही कॉम्प्युटर सिस्टीमवर अनधिकृत ताबा मिळवतात. असा ताबा मिळवून ग्राहकांचे व्हिसा आणि रुपे डेबिट कार्डचे डिटेल्स चोरून या सायबर चोरांनी त्या डिटेल्सवरून क्लोन किंवा डुप्लिकेट डेबिट कार्ड्स बनवले. या क्लोन कार्ड्सचा वापर करून कॅनडा, हाँगकाँग आणि इतर अशा २८ देशांमधून व्हिसा डेबिट कार्ड वापरुन १२००० एटीएम ट्रॅन्झॅक्शन्स द्वारे ७८ कोटी रुपये  आणि भारतातील काही ठिकाणांहून रुपे कार्ड वापरुन २८४९ एटीएम ट्रॅन्झॅक्शन्स द्वारे २.५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. यासाठी ४५० व्हिसा आणि रुपे डेबिट कार्डचा वापर करण्यात आला.
तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की ग्राहकांचे एटीएम कार्ड वापरूनही ग्राहकांच्या खात्यातील पैसे कसे सुरक्षित राहिले ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी आपण जेव्हा एटीएम मशिनमधून कार्डद्वारे पैसे काढतो, तेव्हा काय होते हे बघू.
कार्ड एटीएम मशिनमध्ये घातल्याबरोबर त्याच्यावर असलेल्या मॅग्नेटिक स्ट्रिप वरील माहिती वाचली जाऊन पडताळून पाहिली जाते. त्यानंतर आपल्याला पिन (Personal Identification Number) टाकायला सांगितला जातो. हे सर्व काम बँकेचे एटीएम स्विच सर्व्हर करते. एटीएम स्विच सर्व्हर, बँकेच्या सर्व एटीएम मशिन्सना उपग्रहाद्वारे किंवा VPN (Virtual Private Network) किंवा 4G नेटवर्क ने जोडलेले असते. तर पिन टाकल्यावर तो कार्डवरील माहितीशी सुसंगत असल्यास पैसे काढण्याची सूचना एटीएम स्विच सर्व्हर, CBS (Core Banking System) ला पाठवते. आपल्या खात्यात पैसे असल्यास CBS एटीएम स्विच सर्व्हरला पैसे देण्याबाबत सूचना देते आणि आपल्याला हवे असलेले पैसे मिळतात.
सायबर हल्ल्याच्या या घटनेत सायबर चोरांनी मालवेअर वापरून ताबा मिळवलेल्या एटीएम स्विच सर्व्हरचा वापर ग्राहकांचे डेबिट कार्ड डिटेल्स मिळवण्यासाठी केला. त्याच बरोबर एक डुप्लिकेट, पॅरलल, एटीएम स्विच सर्व्हर (Proxy Switch Server) तयार करून ओरिजिनल स्विच सर्व्हरच्या ऐवजी त्याचा वापर केला. या प्रॉक्सी स्विच सर्व्हरने एटीएम मशिनकडून येणाऱ्या रिक्वेस्ट कोर बँकिंग सिस्टीमला न पाठवता स्वतःच सगळे ट्रान्झॅक्शन्स व्हॅलिडेट किंवा अॅप्रूव्ह केले. त्यामुळे ग्राहकांचे डेबिट कार्ड वापरूनही कोर बँकिंग सिस्टम बायपास केली गेल्यामुळे पैसे बँकेच्या कॉर्पस्  किंवा पूल मधून गेले. वारंवार होणाऱ्या एटीएम विड्रॉवल मुळे ही सायबर चोरी बँकेच्या  लक्षात आली आणि बँकेने व्हिसा, रुपे डेबिट कार्ड पेमेंट सिस्टीम आणि त्यांचे एटीएम नेटवर्क बंद केले.
१३ ऑगस्ट, सोमवार रोजी या सायबर चोरांनी उभारलेल्या प्रॉक्सी पॅरलल स्विच सिस्टीमचा वापर करून १३.९२ कोटी रुपये SWIFT (Society for Worldwide Interbank Financial telecommunication) द्वारे हाँगकाँग स्थित हँगसेंग बँकेत एएलएम ट्रेडिंग लिमिटेड या अकाऊंटला वळते केले.
सायबर तज्ज्ञांच्या मते या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या लाझारस (Lazarus) या मोठ्या हॅकर्स समूहाचा हात असावा. त्यांनी अशा प्रकारे पोलंड आणि बांग्लादेशातील बँकांत ही याआधि सायबर हल्ले केलेले आहेत.
बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहास गोखले यांनी या सर्व प्रकाराबाबतची एफआयआर पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस स्टेशनला नोंदविली.
कॉसमास बँकेवरील हा सायबर हल्ला रिझर्व बँक, बँकिंग सेक्टर, त्यांना सेवा पुरवणाऱ्या संस्था आणि बँकेचे आयटी डिपार्टमेंट यांना धोक्याचा इशारा आहे.
जगभरातील बँकिंग सेक्टर ने त्यांची सुरक्षा प्रणाली सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन जास्तीत जास्त अभेद्य बनवणे अत्यंत गरजेचे आहे.


©कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

Friday, 10 August 2018

रेड ईगल

रेड ईगल


स्कूल बसमधून उतरून निमिष आपल्या बंगल्याचे फाटक उघडून आत आला. प्रवेशद्वारापाशी येऊन त्याने डोअर बेल दाबली. लीलाबाईंनी दार उघडताच त्याचा चेहरा उतरला. निमिषला नेहमी वाटे, आपण शाळेतून आल्यावर मम्मीने हसतमुखाने दार उघडावे, आपली विचारपूस करावी, प्रेमाने खाऊपिऊ  घालावे. पण असं क्वचितच घडत असे. आजी होती तेव्हा ती त्याच्या परत येण्याच्या वेळेस आवर्जून लॉन मधल्या खुर्चीत बसून त्याची वाट बघत असे. लीलाबाईंना सांगून त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून घेत असे. पण आठ महिन्यांपूर्वीच, चार दिवसांच्या तापाचं निमित्त होऊन आजी गेली. तेव्हापासून तो खूप एकटेपण अनुभवत होता. पप्पा कायम बिझनेस टूरवर आणि मम्मी किटी पार्टी आणि क्लबमध्ये व्यस्त असे. कधीतरी दोघेही घरी असले की त्यांची  एकमेकांशी चाललेली धुसफूस, भांडणं निमिषला अगदी नकोसे व्हायचे. शाळा, क्लासेस यांत दिवसाचे आठ दहा तास निघून जात. पण घरी आल्यावर रिकामे घर त्याला खायला उठे. लीलाबाई सर्व आटोपून संध्याकाळी घरी निघून जात असत. तीन दिवसांपूर्वीच निमीष चा तेरावा वाढदिवस मम्मी पप्पांनी खूप थाटात साजरा केला होता. पप्पांच्या बिझनेस संबंधांतील लोक, मम्मीच्या मैत्रिणी आणि निमीषचे काही मित्र आमंत्रित होते. पप्पांनी त्याला महागडा स्मार्टफोन गिफ्ट केला होता. घरी एकटा असताना हा स्मार्टफोनच त्याचा सोबती झाला होता.

*****
फ्रेश होऊन, कपडे बदलून, लीलाबाईंनी केलेले कटलेट खात एका हाताने निमीष त्याच्या  स्मार्टफोनवरील व्हॉट्सअॅप मेसेजेस चेक करू लागला. त्याच्या शाळेतील दोन वर्षे पुढे असणाऱ्या त्याच्या मित्राने कसलीतरी लिंक पाठवली होती. लिंकच्या खाली "Get rid of boring life...Have thrill with this super game..." असे लिहिले होते. उत्सुकतेने निमिषने त्या लिंकवर जाऊन तो गेम डाऊनलोड केला. रेड ईगल. . ."Welcome to the super thriller game ..." लाल रंगाच्या बॅकग्राऊंड वर अक्षरं झळकली. "Are you ready for your first task??" त्यापुढे प्रश्न आला. प्रश्नाच्या खाली दोन बटन्स दिसत होती. YES आणि NO असे लिहिलेली. क्षणाचाही विलंब न करता निमिषने YES बटन दाबले. "तुमची पहिली टास्क तुम्हाला रात्री अकरा वाजता दिली जाईल." मोबाइल फोनवर मेसेज आला. निमिष अातुरतेने अकरा कधी वाजतात याची वाट पाहत मोबाइल हातात घेऊन बसला. बरोबर अकरा वाजता त्याला पहिल्या टास्कचा मेसेज रेड ईगल अॅपवर आला. "तुमच्या प्रिय व्यक्तीची एखादी मौल्यवान वस्तू लपवून ठेवा आणि त्यांची प्रतिक्रिया येथे नोंदवा." निमीष च्या डोक्यात एक आयडिया लक्कन चमकली. थोड्या वेळापूर्वीच त्याची मम्मी घरी येऊन तिच्या बेडरूममध्ये गेली होती. तो हळूच तिच्या बेडरूममध्ये आला. मम्मी गाढ झोपली होती. तिच्या उशाशी असलेल्या साइड टेबलवर तिचा भारी आयफोन चार्जिंगला लावून ठेवला होता. निमिषने पटकन तो फोन उचलला आणि आपल्या खोलीत येउन दप्तरात लपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मम्मीच्या आवाजाने जाग आली. तिचीआदळआपट, आरडाओरडा पाहून त्याला गंमत वाटून हसायला येत होते. त्याची मम्मी मोबाईल मिळत नव्हता म्हणून सैरभैर झाली होती. ड्रायव्हर, वॉचमन या सर्वांवर आगपाखड करत होती. निमिष सुद्धा मम्मीचा मोबाइल शोधायचे नाटक करत होता. बऱ्याच वेळाने निमिषने मोबाइल दप्तरातून काढून डायनिंग टेबलवरील मॅट खाली ठेवून दिला आणि मम्मीला हाक मारत म्हणाला. "अगं! हा बघ तुझा फोन . ." धावत येऊन तिने फोन त्याच्या हातून घेतला आणि प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली. "थँक्स अ लॉट माय बेबी !!".  निमीष ला या सगळ्या प्रकारात  खूप मजा येत होती. उत्साहाने या टास्क वरची प्रतिक्रिया रेड इगलला पाठवून तो शाळेच्या तयारीला लागला. आता निमिषला रेड इगलने कुठली नवी टास्क दिली आहे का ? हे बघायला मोबाइल फोन चेक करायची सवयच लागली. दोनच दिवसांत त्याला दुसरी टास्क मिळाली. या टास्कनुसार त्याला घरातील एखादी किमती, भारी वस्तू खराब करायची होती. जेणेकरून ती वापरण्यायोग्य राहणार नाही. "कुठली वस्तु खराब करावी ??" निमीष विचार करू लागला. त्याला जास्त विचार करावा लागला नाही. शाळेतून आल्यावर त्याने आपल्या खोलीत जाउन क्रिकेट बॅट घेतली आणि हॉलमध्ये येउन ५५ इंचाच्या टीव्ही स्क्रिनवर पूर्ण शक्तिनिशी दोनतीनदा मारली. टीव्ही ला २-३ मोठे तडे पडले. त्याने टीव्ही चालू करून पाहिला, आवाज येत होता मात्र चित्र दिसत नव्हते. आता तो मम्मी घरी येण्याची वाट पाहू लागला. मम्मी आल्यावर धावत जाउन त्याने सांगितले कि तो क्रिकेट प्रॅक्टीस करत असताना टीव्हीला बॅट लागून टिव्ही फुटला. मम्मीने त्याला जवळ घेउन समजूत काढली आणि उद्याच नवा टीव्ही आणण्याचे कबूल केले. मम्मीच्या प्रतिक्रियेने निमीष मनातून खट्टू झाला. मम्मी नाराज झाली असती. त्याला रागावली असती तर त्याला जास्त बरे वाटले असते. दुसर्‍या टास्कची प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी त्याने मोबाइल फोन हातात घेतला.
 रेड ईगल अॅडमिनकडून त्याला अभिनंदनपर मेसेज आला. लगेचच दुसऱ्या दिवशी त्याला तिसरी टास्क देण्यात आली. या टास्कनुसार निमीष ला स्वतःच्या हातावर रेड इगलचे चित्र पेनने रेखाटायचे होते आणि त्यावर ब्लेडने कट मारून त्याच्या पंखातून रक्त ठिबकत आहे असे दाखवायचे होते. चित्र काढल्यावर त्याचा फोटो काढून त्याला रेड ईगल अॅपवर पोस्ट करायचा होता. ही टास्क पूर्ण करताना वेदनांची सवय नसलेल्या निमिषला ब्लेडचा कट मारताना थोडा त्रास झाला. पण टास्क पूर्ण झाल्याचे त्याला समाधान वाटत होते. आता निमीष रेड ईगल गेमच्या पूर्णपणे आहारी गेला होता. त्याला शाळेला, क्लासला जाणे, अभ्यास करणे कंटाळवाणे वाटू लागले. मधून मधून काहीतरी कारण काढून तो शाळा, क्लासेस बुडवू लागला. रेड ईगल कडून आलेल्या चौथ्या टास्कनुसार त्याला अत्यंत जीवलग असलेल्या माणूस किंवा प्राण्याला इजा करायची होती. मात्र ही टास्क पूर्ण करण्याचे त्याच्या जिवावर आले होते. दोन दिवस त्याने रेड ईगल अॅप उघडलेच नाही. तिसऱ्या दिवशी अॅप उघडल्यावर त्याला भीतीयुक्त आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या मोबाइल मधे असलेले त्याचे वेगवेगळे फोटो आक्षेपार्ह रितीने मॉर्फ करून  त्यालाच पोस्ट केले होते. त्याच बरोबर त्याची पूर्ण माहिती त्याच्या पत्त्या सहीत लिहून फोटोंबरोबर सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती. निमीष ला रडू फुटले. आपण एका चक्रव्यूहात अडकत आहोत याची त्याला जाणीव झाली. रडतच तो आपल्या आवडत्या लवबर्डस् च्या पिंजर्‍या जवळ  गेला. पिंजरा उघडून पिवळ्या रंगाचा एक सुंदर लवबर्ड बाहेर काढून त्याने  मोबाइलचे व्हिडिओ शूटिंग ऑन केले आणि धीर करून त्या छोट्याशा लवबर्डची मान पिरगाळली. केविलवाणा आवाज करत तडफडत तो पक्षी त्याच्या हातून खाली निपचित पडला. या  प्रकाराने   निमीषला अत्यंत औदासीन्य आले. उदास मनाने त्याने तो व्हिडिओ रेड ईगलच्या अॅपवर पोस्ट केला. दोनच दिवसांनी रेड ईगल अॅपकडून निमिषला एक लिंक आली. एका अत्यंत भयावह हॉरर मूव्हीची ती लिंक होती. ती मुव्ही पहाटे तीन वाजता उठून त्याला पाहायला सांगण्यात आले. निमिषला असले सिनेमे पाहायला खूप भीती वाटत असे. पण धीर करून त्याने पहाटे उठून मोबाइल फोनवर ती हॉरर मूव्ही पाहिली.  शाळेतून आल्यावर घरी एकटा असताना ती हॉरर मूव्ही पाहिल्यामुळे त्याला प्रचंड भिती वाटत होती. आज तो कधी नव्हे ते मम्मीच्या येण्याची आतुरतेने वाट पहात होता. आता त्याला रेड ईगल गेमची प्रचंड भीती वाटत होती. त्याला सारखे वाटत होते कि आपण ती लिंक डाऊनलोड करून तो गेम सुरू करायलाच नको होता. रेड ईगल अॅपने दिलेल्या पुढच्या काही टास्क आधीच्या टास्कस् च्या तुलनेत काही प्रमाणात सोप्या होत्या. जसे तळपायावर रेड ईगलचे चित्र रेखाटने, रेड ईगल अॅपने पाठवलेले बीभत्स चित्र पाहून त्यावर स्लोगन देणे वगैरे. या काही टास्क पूर्ण केल्यानंतर रेड ईगल अॅपकडून निमिषला मेसेज आला, "दोन दिवसांनी तुम्हाला तुमची शेवटची टास्क देण्यात येइल. त्यासाठी तयार रहा."
आता आपल्याला शेवटची टास्क कुठली दिली जाणार?? या विचाराने निमिषला धाकधूक वाटू लागली. दोन दिवस तो त्याच गोष्टीचा विचार करत होता. शेवटी रेड ईगल अॅप वरून त्याला मेसेज आला, "ही तुमची शेवटची टास्क आहे.  ही टास्क पूर्ण केल्यानंतर हा गेम तुम्ही जिंकणार आहात. मात्र काही कारणाने ही टास्क पूर्ण करू शकत नसाल तर परिणामांसाठी तयार राहा. तुमच्या फोटोंसहीत तुमची सर्व खासगी माहिती सार्वजनिक करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही कधीही शाळेत जाऊ शकणार नाही किंवा कोणा मित्रांबरोबर राहू शकणार नाही... आता पायऱ्या चढून तुम्ही तुमच्या घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर जा. तेथील कठड्यावर उभे राहा. कुठलीही भीती बाळगू नका. डोळे मिटा आणि स्वतःला खाली झोकून द्या. लवकर कामाला लागा. वेळ घालवू नका." हे वाचून निमीष हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे आपल्या घराच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागला. गच्चीवर आल्यावर झपाटल्याप्रमाणे तो कठड्यावर चढणार, एवढ्यात त्याला पप्पांच्या कारचा हॉर्न ऐकू आला आणि पाठोपाठ कार घराकडे येताना दिसली.  आज जवळजवळ वीस पंचवीस दिवसांनी त्याचे पप्पा बिझनेस टूरवरून घरी येत होते. कारमध्ये मागे बसलेले पप्पा पाहताच त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो परत फिरून पायर्‍यां वरून खाली उतरून बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी आला. दार उघडून पप्पा घरात आल्याबरोबर त्यांना बिलगून तो ओक्साबोक्शी रडू लागला. पप्पांनी त्याला शांत केले. त्याला विश्वासात घेऊन बोलते केले. पप्पांना त्याने काहीही न लपवता रेड ईगल ची लिंक इंस्टॉल केल्यापासून ची सगळी हकीकत सांगितली. पप्पांनी त्याला समजावले. धीर दिला. "अशी कोणीही कोणाची खासगी माहिती सार्वजनिक करू शकत नाही. तु घाबरु नकोस. मी आणि तुझी मम्मी तुझ्या पाठीशी आहोत. आज तू हे काय करायला निघाला होतास? आम्हाला किती दुःख झाले असते याचा तू विचार केला आहेस का?  याआधीच तू हे सगळं आम्हाला सांगायला हवे होतेस. जाऊ दे. सगळं विसर आणि अभ्यासात लक्ष दे. आपले छंद जोपास. मित्रांबरोबर खेळायला जात जा. मोबाइलचा वापर  कमीतकमी कर. " हे ऐकल्याबरोबर निमिषने पटकन मोबाइल आपल्या खिशातून काढून  पप्पांजवळ दिला. "पप्पा, मला मोबाइल नको. तुमच्या जवळ ठेवा. जेव्हा मी कॉलेजमध्ये जाईन तेव्हाच मोबाइल वापरीन तेही फक्त कामासाठीच."
एवढ्यात निमीष ची मम्मी घरी आली. सर्व हकिकत ऐकून तिला खूप रडू आले. "माझे दुर्लक्ष झाल्यामुळे आज मी माझ्या एकुलत्या मुलाला गमावून बसले असते." निमीष च्या पप्पांनी रेड ईगल अॅप आणि त्याच्या अॅडमिन विरोधात सायबर सेलला रीतसर कम्प्लेंट नोंदवली. जगभरातून अशा कंप्लेंटस् येऊ लागल्याने सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी रशियातील अठरा एकोणीस वर्षांच्या मुलांच्या एका ग्रुपला हा गेम सुरू करून प्रसारित करण्याच्या गुन्ह्याखाली  अटक केली.

*****
आता मात्र निमीष अभ्यास, खेळ आणि मित्र यात रमला आहे. त्याच्या मम्मीने किटी पार्टी, क्लब ला जाणे कमी करून ती निमीषसोबत जास्तीतजास्त वेळ घालवते. निमिष चे पप्पा  वेळ काढून दिवसातून काही वेळ निमीष सोबत संवाद साधतात.

*****
मित्रमैत्रिणींनो, आपला अमूल्य ठेवा, आपली मुलं, त्यांना डोळ्यांत तेल घालून जपा. शक्यतो त्यांना लहान, शाळकरी वयांत  मोबाइल देऊ नका. दिल्यास त्याचा योग्य वापर कसा करावा हे शिकवा. मुलं मोबाइलवर ब्ल्यू व्हेल चॅलेंज, मोमो व्हॉट्सअॅप चॅलेंज सारखे जीवघेणे खेळ तर खेळत नाहीत ना? याकडे लक्ष द्या.

*****