Saturday, 4 January 2020

#PUBG

#PUBG


नीरज आज सकाळपासून तणावात होता. आईने दोन-तीनदा कारण विचारूनही तो गप्पगप्पच होता. आजपासून त्याची विद्यापीठाची परिक्षा सुरु होणार होती. पहिलाच पेपर इकॉनॉमिक्सचा होता. यापूर्वी नीरजने दर वर्षी परीक्षेत डिस्टिंक्शन मिळविले होते. पहिल्या पाचात त्याचा नंबर ठरलेला असायचा. पण आज. . .

त्याने इकॉनॉमिक्सची क्वेश्चन बँक वरवर पाहिली. काहीच समजत नव्हतं. अभ्यासच झाला नाही तर क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन-अॅन्सर्स काय समजणार? त्याला स्वतःचाच खूप राग येत होता. तो विचार करत होता, 'का अडकलो मी या PUBG च्या जंजाळात?? अभ्यास सोडून का तासंतास हा गेम खेळत बसलो??'

चार महिन्यांपूर्वी मित्रांच्या नादाने नीरजने PUBG खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला अर्धा पाऊण तास खेळणारा नीरज हळूहळू  त्या गेम मधल्या मनोरंजक घडामोडींमुळे तीन-चार तास PUBG खेळायला लागला. त्यापुढे जाऊन कॉलेज, क्लास बुडवून घराजवळच्या बागेत बसून तो आपल्या मोबाइल वर हा व्हिडिओ गेम वेड्यासारखा खेळत बसायचा. रात्री परत अभ्यासाच्या नावाखाली आपल्या खोलीचे दार लावून अॉनलाईन आलेल्या इतर मित्रांसोबत उशिरा पर्यंत खेळायचा. यामुळे परीक्षेचा दिवस उजाडला तरीही त्याचा काहीही अभ्यास झाला नव्हता.

इकॉनॉमिक्सचा ‍पेपर नीरजच्या समोर होता. एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला येत नव्हतं. उत्तरपत्रिकेत जरूरी ती माहिती भरून तो नुसताच बसला होता. तीन तासांचा वेळ कसा काढावा त्याला कळत नव्हतं. स्वतःबद्दल त्याच्या मनात संताप भरून राहीला होता. त्या तिरिमिरीतच त्याने उत्तरपत्रिकेत ‘PUBG गेम मोबाइल वर कसा डाउनलोड करायचा? मित्रमैत्रिणींचा अॉनलाईन गृप बनवून कसा खेळायचा? त्यातल्या टीप्स अँड ट्रिक्स' याविषयी सविस्तर लिहून टाकलं आणि अर्धा तास आधीच परीक्षा हॉलच्या बाहेर पडला.

दोन महिन्यांनंतर नीेरजचा रिझल्ट लागला. अपेक्षेप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षेत तो नापास झाला. दर वर्षी परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवणारा अभ्यासू नीरज चक्क नापास झाल्याने आईवडिल हादरले. त्याला विश्वासात घेऊन कारण विचारल्यावर सगळ्याचा उलगडा झाला.

आई-वडिलांनी त्याला न रागावता समजावून सांगितलं. समुपदेशकाची मदत घेतली. नीरजलाही स्वतःची चूक समजली. त्याने PUBG खेळण्याचे व्यसन सुटावे यासाठी स्वतःहून मोबाइल आईजवळ दिला आहे आणि परत परीक्षेची तयारी करतो आहे.

नीरजला भेटण्यासाठी गेले असताना त्याने सांगितले, 'अजूनही PUBG च्या प्रतिमा माझ्या मनात सतत रेंगाळत असतात. पण मी प्रयत्नपूर्वक त्यापासून दूर राहण्याचे ठरवले आहे कारण तो गेम किती धोकादायक आहे, याची मला जाणीव आहे.'

जगभरातील १३ ते ३० वयोगटातील २० करोड लोक PUBG खेळतात. यात मुलांचे प्रमाण अधिक आहे.

सोशल नेटवर्कींग आणि गेमिंग च्या अभ्यासकां नुसार PUBG च्या आकर्षक डिझाइन मुळे आणि त्यामधील मनोरंजक घडामोडींमुळे या गेमचे व्यसन लवकर लागते. काही मुलांचे शैक्षणिक वर्ष या खेळाच्या व्यसनापायी वाया गेले आहे.

या खेळाच्या संदर्भात काही मुलामुलींशी संवाद साधल्यावर जाणवंलं की काहींना या खेळाचे व्यसन लागेल अशी भीती वाटते म्हणून ते त्यापासून कटाक्षाने दूर राहतात. एका २२ वर्षांच्या मुलाने सांगितले की हा खेळ त्याचे बहुतेक मित्रमैत्रिणी कमीअधिक प्रमाणात खेळतात. सुरुवातीला मित्रांचा खेळ बघायला त्याला आवडायचे मात्र खेळ नुसता पाहूनही आपल्यात हिंसक वृत्ती वाढते आहे असे त्याला जाणवल्याने त्याने ते बघणं देखील बंद केलं. काही जण दूरस्थ मित्रमैत्रिणींशी बोलता यावं म्हणून आठवड्यातून एकदोनदा खेळतात. काही शाळकरी मुलं शाळा, अभ्यास, क्लासेस यामुळे कंटाळून, विरंगुळा म्हणून आणि मित्रमैत्रिणीं खेळतात म्हणून रोज रात्री PUBG खेळण्यासाठी एकत्र येतात आणि काही मुलंमुली शाळा, कॉलेज बुडवून दिवसाचे ५ ते ८ तास खेळत राहतात. हा वर्ग या खेळाच्या पूर्णतः आहारी गेला आहे आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे.

पालकांची भूमिका
सर्वप्रथम पालकांनी मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याशी सुसंवाद साधावा. मुलं शाळा, कॉलेज, क्लासला नियमित जातात का? त्यांचे अभ्यासाकडे लक्ष आहे का? शाळा, कॉलेज व्यतिरिक्त आणखी कुठे जातात? नेमके काय करतात? याकडे लक्ष ठेवावे. खरं तर शाळकरी मुलांना मोबाइल द्यायला नको. मोबाइल वापरायला दिल्यास त्यावर मर्यादा ठरवून द्यावी. मुलांचा मोबाइल त्यांना विश्वासात घेऊन अधूनमधून तपासावा. मुलं कुठलाही व्हिडिओ/अॉनलाइन गेम खेळत असल्यास तीव्र प्रतिक्रिया व्यक्त न करता किंवा लगेच मोबाइल काढून न घेता असले खेळ त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी कसे हानीकारक आहेत हे त्यांना व्यवस्थित समजावून सांगावे. जमल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. तसंच मुलं कधीतरी थोडा वेळ हा खेळ खेळत असतील तर पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

मुलांना मैदानी खेळ खेळण्यास उद्युक्त करावे. एखादा छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करावे. जी मुलंमुली मैदानी खेळ खेळतात किंवा गायन, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व यापैकी एखादा छंद जोपासतात त्यांना कुठलेही व्यसन लागण्याची शक्यता कमी असते.

आजची तरुणाई अत्यंत हुशार आणि कल्पक आहे. जरुरी आहे ते फक्त त्यांची हुशारी आणि कल्पकता योग्य दिशेकडे नेण्याची. हे काम फक्त त्यांचे पालक आणि शिक्षक करू शकतात.

©कविता दातार

Thursday, 26 December 2019

प्रसंगावधान



आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही.
आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.
हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर "मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला." असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले.
तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे.
थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती.
एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.
गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तीला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.
अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.
तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते.
आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले.
आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.
आदितीने दोघा नराधमां विरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातार जवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.
112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.
भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.
पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.
आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.
बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.
अॅपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.
©कविता दातार


Tuesday, 17 September 2019

छुपा कॅमेरा आणि मायक्रोफोन पासून बचाव



छुपा कॅमेरा आणि मायक्रोफोन पासून बचाव




नागपुरातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्या दोघांना अटक केली आहे. या आणि अशा अनेक प्रकरणांमुळे हॉटेल रूम्स, मॉल्स आणि दुकानांमधील ट्रायल/चेंजिंग रूम्स, टॉयलेट्स मधील प्रायव्हसीचा प्रश्न समोर आला आहे. दुर्दैवाने स्पाय कॅमेरा, मायक्रोफोन द्वारे लोकांचे खाजगी क्षण रेकॉर्ड करण्याच्या असामाजिक तत्वांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी विशेषतः स्त्रियांनी सतर्क राहून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

चेंजिंग / ट्रायल रूम मध्ये काय काळजी घ्यावी?

- तेथील आरशाला स्पर्श करून, आपले बोट आणि त्याचे प्रतिबिंब यांच्यात काही अंतर आहे का? हे तपासून पहा. नसल्यास, हा दोन बाजूंचा आरसा (Two Way Mirror) आहे. म्हणजे एका बाजूने आरसा व दुसर्‍या बाजूने खिडकी प्रमाणे या खोलीतील सर्व काही पाहता येते. आरशाच्या मागच्या बाजूस कॅमेरा असू शकतो. लगेच तेथून बाहेर पडा.

- हॅन्गरसारख्या विशेषत: स्क्रू असणार्‍या वस्तूंमधे लेन्स सारखे काही दिसते का हे तपासून पहा. खात्री वाटत नसल्यास सर्व स्क्रू असलेल्या भागांना कापडाने झाका.

- फॅन, लाईट, स्मोक डिटेक्टर वगैरे चे नीट निरीक्षण करा. कुठे लेन्स सारखे काही दिसते का ते पहा. खात्री वाटत नसल्यास सेलोटेप / स्टिकर ने स्मोक डिटेक्टर चा उघडा भाग तात्पुरता झाकून ठेवा. साधी किंवा काळी सेलोटेप कायम आपल्या जवळ बाळगा.

- काही आक्षेपार्ह आढळून आल्यास संबंधित सूत्रांकडे किंवा पोलीसांत तक्रार करा.

हॉटेल रूम मध्ये वास्तव्य करण्या अगोदर काही गोष्टींची काळजी घेणे जरूरी आहे जसे...

- हॉटेल रूम मध्ये शिरताक्षणीच एखाद्या परिचिताला मोबाइल फोनवरून कॉल करावा आणि मोबाइल वर बोलत असताना संपूर्ण खोलीत फिरून संभाषणात व्यत्यय येतो आहे काय? हे तपासावे. बहुतेक मायक्रोफोन्स आणि छुपे कॅमेरा वायफाय एनेबल्ड असल्याने मोबाइल फोनवरील संभाषणात एक प्रकारची खरखर किंवा व्यत्यय निर्माण करतात. असे असल्यास खोलीतील ज्या ठिकाणी जास्त खरखर येत असेल त्या जागी नीट तपासा.

- वर सांगितल्याप्रमाणे आरसा, हँगर्स, स्मोक डिटेक्टर, लाइट्स, नाइट लँप, फॅन वगैरे ची तपासणी जरूर करावी.

- कपाटं, फ्लॉवर वॉस, भिंतीतले इलेक्ट्रिक सॉकेट्स, कॉफी मेकर, टीव्ही, सेटटॉप बॉक्स, खोलीच्या कोपर्‍यांमधे अथवा छतावर असलेली संशयास्पद वस्तू जसे टेडीबेअर वगैरे अशा शक्य त्या वस्तूंची तपासणी करावी.

- इलेक्ट्रिक गॅजेट्स जसे एअरकंडिशनर, कॉफी मेकर, टीव्ही, सेटटॉप बॉक्स वापरून झाल्यावर बंद आणि डिसकनेक्ट करून ठेवावे.

- इलेक्ट्रिक सॉकेट्स काळ्या सेलोटेपने झाकावे.

- संशयास्पद वस्तू हलवून पलंगांखाली, कपाटात किंवा टेबलाखाली ठेवून द्याव्या अथवा टॉवेल किंवा चादरीने झाकाव्या.

- छुपा कॅमेरा शोधण्यासाठी एक सोपी युक्ती करता येईल. खोलीत संपूर्ण अंधार करावा. टीश्यू पेपरची सुरळी बनवून ती एका डोळ्यावर लावावी. दुसर्‍या डोळ्यापुढे टॉर्च किंवा मोबाइल चा फ्लॅशलाइट धरून सगळी खोली बारकाईने तपासावी. भिंतीत किंवा एखाद्या कोपर्‍यात छुपा कॅमेरा असल्यास त्याच्या लेन्स चा लाईट चमकून जाईल. तो छुपा कॅमेरा आहे अशी खात्री झाल्यास योग्य ती पावले उचलावी.

- डिजिटल किंवा स्मार्टफोनचा कॅमेरा आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या इन्फ्रारेड लाइटला पकडू शकतो. कॅमेरा चालू करून सर्व खोलीत फिरवल्यास छुप्या कॅमेरा चा इन्फारेड लाइट त्यात दिसू शकतो.

- हॉटेल्सच्या बाथरुममधील शॉवर, गीजर व पडद्याच्या रॉड्स मध्ये सुद्धा छुपा कॅमेरा असू शकतो. त्यामुळे बाथरूममध्ये सुद्धा सर्व नीट तपासून घ्यावे.

- स्पाय कॅमेरा म्हणजेच छुपा कॅमेरा किंवा मायक्रोफोन साधारणतः वायफायद्वारे इंटरनेटला जोडले असतात. तुमचा स्मार्टफोन जर एखाद्या अपरिचित वायफाय नेटवर्क चे नाव दाखवत असेल तर ते या डिव्हायसेसच्या इन बिल्ट वायफाय नेटवर्कचे नाव असू शकते. अशा वेळी सावध व्हा आणि हे वाय फाय नेटवर्क नेमके कुठले ?याची चौकशी करा.

- RF Detector या डिव्हाईस च्या द्वारे देखील वायफाय इनेबल्ड छुपे कॅमेरा आणि मायक्रोफोन्स चा शोध घेता येतो. हे डिव्हाइस साधारणतः एक हजार ते तीन हजार किमतीत कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स दुकानात मिळते. RF डिटेक्टरद्वारे शोध घेताना मात्र तुमचे स्वतःचे वायफाय इनेबल्ड डिव्हायसेस बंद ठेवा. म्हणजे इतर अनोळखी डिव्हायसेसचा तुम्हाला नीट शोध घेता येईल.

- या व्यतिरिक्त तुम्ही प्ले स्टोअर वरील हिडन कॅमेरा डिटेक्टर सारखे अॅप्स वापरू शकतात.

©कविता दातार







Tuesday, 23 July 2019

स्मार्ट टीव्ही स्टोरी

स्मार्ट टीव्ही स्टोरी



राजेश - रीमा, सुरतमधील उच्चभ्रू वस्तीत राहणारे एक जोडपे. लग्नाला दहा वर्षे झाली होती. राजेशला त्याच्याकडे असलेल्या स्मार्ट टीव्हीवर पॉर्न फिल्म्स बघण्याचा वाईट नाद होता. त्यासाठीच त्याने टीव्ही बेडरुम मधे लावून घेतला होता. पॉर्न फिल्म्स बघण्या सोबत राजेश कधी कधी पॉर्न वेबसाइट्सना सुद्धा टीव्ही वरूनच विजिट करत असे. एके रात्री अशाच एका साइटवरील व्हिडिओ पहात असताना त्याला भीतीयूक्त आश्चर्याचा धक्का बसला. रीमासोबतचे त्याचे खाजगी अंतरंग क्षण त्या व्हिडिओत चित्रित झाले होते.

राजेशने रीमाला तो व्हिडिओ दाखवला. रीमाला तर रडूच कोसळले. दोघांनाही काय करावे कळत नव्हते. पोलिसांत जावे तर बदनामीची भीती होती. राजेशने हा सर्व प्रकार त्याच्या जवळच्या मित्राला, सुधीरला सांगितला. सुधीरने त्याला सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टची मदत घेण्यास सांगितले.

अंकित देसाई हा सुरतमधील प्रसिद्ध सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट. त्याला भेटून राजेशने सर्व घटना सविस्तर सांगितली. अंकितने सर्व प्रथम राजेशची पूर्ण बेडरूम शोधली. कुठे एखादा स्पाय कॅमेरा असेल अशी त्याला शंका होती पण काहीच मिळून आले नाही. अंकित विचारात पडून इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर राजेशच्या बेडरूममधील स्मार्ट टीव्हीकडे गेली. राजेशला त्याने स्मार्ट टीव्हीचा वापर कशा कशासाठी करतो, ते सर्व विचारले. टीव्ही सुरू करून त्याच्या सेटिंग्स, हिस्टरी, त्याच्यावरील अॅप्स हे सगळे तपासले. आणि तो एका निष्कर्षाप्रत आला.

स्मार्ट टीव्हीवर पॉर्न साइट्स पाहत असतांना कुठल्या तरी पॉर्न व्हिडिओची मॅलिशिअस लिंक (मालवेअर असलेली (असल्या साइटवर अशा लिंक्स जास्त असतात)) राजेश कडून क्लिक झाली असणार आणि स्मार्ट टीव्हीमध्ये मालवेअरचा शिरकाव झाला. या मालवेअरने त्याच्या कॅमेराचा आणि मायक्रोफोनचा ताबा घेतला आणि बेडरूम मधले रेकॉर्डिंग केले. स्मार्ट टीव्ही वायफायद्वारे इंटरनेटला जोडला असल्याने रेकॉर्ड केलेली क्लिप त्या साइटवर अपलोड झाली. हे सर्व स्मार्ट टीव्हीबाबतच नाही तर इंटरनेटला जोडलेल्या कुठल्याही स्मार्ट डिव्हाइस बाबत घडू शकते. मालवेअर एकदा का तुमच्या स्मार्ट डिव्हाईस मधे शिरले की ते तुमचा डेटा, कॅमेरा, मायक्रोफोन सगळ्याचा ताबा घेऊन त्याचा गैरवापर करू शकते.

अंकितने संबंधित साईटच्या अॅडमिनशी संपर्क साधून राजेशची क्लिप काढून टाकण्याची विनंती केली. पण त्याअगोदर कोणी ती क्लिप डाऊनलोड करून व्हायरल केली असण्याची शक्यता त्याने राजेशला सांगितली.

राजेश - रीमा अजूनही भीती आणि बदनामीच्या सावटाखाली आहेत.

स्मार्ट टीव्ही हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. जसे की सेटिंग्जमध्ये जाऊन त्याचा कॅमेरा आणि मायक्रोफोन जरूर नसताना डिसॅबल करावे, किंवा त्यावर काळी टेप चिकटवावी. टीव्हीचे सिस्टम सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करावे, बरेच स्मार्ट टीव्ही अॅन्टीव्हायरस आणि अॅन्टीमालवेअर सोबत येतात (जसे सॅमसंग चे स्मार्ट सेक्युरीटी) त्यांचे अॅन्टीव्हायरस अपडेटेड ठेवावे. फक्त टिव्ही सोबत येणारे अॅप्स आणि रीमोट कंट्रोल चा वापर करावा. जरुरी नसलेले, माहीत नसलेले थर्ड पार्टी अॅप्स वापरू नाही. सेक्युर्ड वाय-फाय चा वापर करावा.

मुख्य म्हणजे तुम्ही जर टेक्नोलॉजी शी फारसे परिचित नसाल आणि पारंपारिक टीव्ही तुम्हाला पुरेसा असेल तर स्मार्ट टीव्ही पासून दूर राहणे केव्हांही चांगले.


**गोपनीयता ध्यानात ठेवून पात्रांची नांवे  बदलण्यात आली आहेत.

©कविता दातार

Monday, 15 July 2019

एजंट स्मिथ


एजंट स्मिथ

सायबर सुरक्षा कंपनी चेक पॉईंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी रिसर्चने मोबाइल मालवेअरचा एक नवीन प्रकार शोधला आहे. ज्याने भारतात 15 दशलक्ष मोबाईल डिव्हाइसेससह जगभरात 25 दशलक्ष डिव्हाइसेस शांतपणे संक्रमित केले आहेत. एजंट स्मिथ त्याचे नांव. हे मालवेअर Android सिस्टम च्या कमकुवतपणाचा फायदा घेत इन्टॉल केलेल्या अॅप्सना युझरच्या नकळत नव्या आवृत्तीसह पुनर्स्थित (reinstall) करते.

"एजंट स्मिथ" मालवेअर आर्थिक फायदा दर्शवणार्‍या किंवा पोर्नोग्राफी च्या फसव्या जाहिराती दाखवण्यासाठी डिव्हाइस मधील त्याच्या प्रवेशाचा वापर करते. परंतु ते बँकिंग क्रेडेन्शियल चोरी आणि eavesdropping (चोरून संभाषण ऐकणे) या सारख्या अधिक घृणास्पद आणि हानीकारक उद्देशांसाठी सुद्धा सहजपणे वापरले जाऊ शकते.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते चांगले अद्ययावत अॅन्टीव्हायरस या मालवेअरचा हल्ला रोखू शकते. तसेच कुठलेही अॅप इन्स्टॉल करताना प्ले स्टोअर चा वापर करावा. थर्ड पार्टी अॅप स्टोअर्स (9Apps वगैरे) वरून अॅप इन्स्टॉल केल्यास एजंट स्मिथचा तुमच्या स्मार्टफोनमध्ये शिरकाव होण्याची शक्यता अाहे. गुगल प्ले स्टोअरवरील काही अॅप्समध्ये देखील एजंट स्मिथ चा शिरकाव झाला असल्याने गुगलने युजर्सना खालील अॅप्स आपल्या स्मार्टफोनमधून अनइन्स्टॉल करण्याची विनंती केली आहे.

-Ludo Master - New Ludo Game 2019 For Free

--Sky Warriors: General Attack

--Color Phone Flash - Call Screen Theme

--Bio Blast - Infinity Battle Shoot virus

--Shooting Jet

--Photo Projector

--Gun Hero - Gunman Game for Free

--Cooking Witch

--Blockman Go: Free Realms & Mini Games

--Crazy Juicer - Hot Knife Hit Game & Juice Blast

--Clash of Virus

--Angry Virus

--Rabbit Temple

--Star Range

--Kiss Game: Touch Her Heart

--Girl Cloth Xray Scan Simulator

वरील पैकी कुठलेही अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास त्वरित काढून टाका. तसेच कुठलीही आक्षेपार्ह वाटणारी जाहिरात स्मार्टफोनमध्ये वारंवार येत असल्यास स्मार्टफोनचे व्यवस्थित स्कॅनिंग करून घ्या. एवढे करूनही स्मार्टफोनमधून एजंट स्मिथ जात नाही असे निदर्शनास आल्यास फोन थेट फॅक्टरी रीसेट करावा.

©कविता दातार

Friday, 28 June 2019

ओएलएक्स किंवा तत्सम साइटवर खरेदी करता आहात?

ओएलएक्स किंवा तत्सम साइटवर खरेदी करता आहात?

संतोष तालुक्याच्या गावी राहणारा एक सुशिक्षित शेतकरी तरुण. ऑनलाईन व्यवहारां ची बऱ्यापैकी समज असलेला.

त्याच्या स्मार्टफोन वरील ओएलएक्स अॅपवर एके दिवशी त्याने सेकंडहॅण्ड स्कॉर्पिओ गाडी विक्रीला असल्याची पोस्ट पाहिली. बंगलोरमधील प्रकाश शर्मा नांवाच्या एका सरकारी अधिकाऱ्याला आपली दहा वर्षे जुनी स्कॉर्पिओ एक लाख पाच हजारांत विकायची होती. गाडीचे रजिस्ट्रेशन ठाणे जिल्ह्यातील पालघरचे होते. फोटोंवरून गाडी चांगल्या कंडिशनमध्ये दिसत होती. ऑफर आकर्षक असल्याने संतोषने गाडी खरेदी करण्याचे ठरवले.

फोनवरून त्याने शर्माशी संवाद साधला व व्यवहार नक्की केला. सुरुवातीला एकवीस हजार रुपये घेऊन गाडी जळगावपर्यंत पाठवण्यास शर्मा तयार झाला. उरलेली रक्कम गाडीचा ताबा घेतल्यावर द्यायची असे ठरले. त्याप्रमाणे संतोषने पेटीएमद्वारे शर्माला एकवीस हजार रुपये ट्रान्सफर केले. संतोषच्या व्हॉट्सअॅपवर शर्माने त्याची अॅक्नॉलेजमेंट देखील पाठवली. गाडी जळगाव पर्यंत पोहोचली आहे आणि मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची अतोनात गरज आहे असे सांगून शर्माने आणखी बत्तीस हजार रुपये संतोषला पाठवण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संतोषने पेटीएमद्वारे पैसे ट्रान्सफर केले.

या घटनेला दीड महिना झाला. पण अजून संतोष गाडी मिळण्याची वाट बघत आहे. संतोषने बऱ्याचदा शर्माला फोन केले पण त्याचे म्हणणे एकच. . . उरलेले सगळे पैसे द्या आणि गाडी घेऊन जा. संतोषने अोएलएक्स हेल्प सेंटरला आणि पोलिसांतही कम्प्लेंट केली आहे. पुरावे म्हणून पेटीएमवरून पैसे ट्रान्स्फर केल्याचे स्क्रीन शॉटस्, शर्माचा फोन नंबर, ओएलएक्स वरील पोस्टचे स्क्रिनशॉटस् सर्व दिले आहेत पण अजूनही काही होऊ शकले नाही. संतोषचे त्रेपन्न हजार रुपये बुडाले, बहुमोल वेळ गेला आणि वरून मनस्ताप देखील झाला.

ओएलएक्स वरील फेक सेलर्स ओळखण्यासाठीच्या काही टीप्स . .
- एखादी वस्तू तिच्या मार्केटमधील किमतीपेक्षा बऱ्याच कमी किंमतीत मिळत असेल तर काहीतरी गडबड आहे असे समजावे आणि त्या वस्तू बाबतचा व्यवहार टाळावा.
- व्यवहार होण्याअगोदर सेलर जास्त किंवा वारंवार पैसे मागत असेल तर असा व्यवहार टाळावा.
- सेलर जर प्रत्यक्ष भेट किंवा ओएलएक्स वरील चॅट टाळून तुमच्याशी फोनवर, व्हॉटस्अॅपवर किंवा इमेलवर बोलणे पसंत करत असेल तर तो फेक असण्याची शक्यता असते. कारण ओएलएक्स वरील चॅट पुरावा म्हणून रेकॉर्ड केला जातो.
- ओएलएक्स किंवा तत्सम साइटवर फेक सेलर्स आणि बायर्सचे रिव्ह्यूज् असतात व्यवहार करण्याअगोदर ते जरूर तपासून घ्यावे.

©कविता दातार


Monday, 15 April 2019

सिमकार्ड स्वॅप




विनोद कुमार मेहता मुंबईतील एक मोठे व्यापारी. एके दिवशी दुपारी आपल्या वातानुकूलित ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांना एक फोन आला. 

"गुड आफ्टरनून. .मेैं एअरटेल से बात कर रहा हूं. क्या मेरी बात विनोद कुमार मेहता से हो रही है?"
"हां बोलीए. .मैं विनोदकुमार बात कर रहा हूं."
"यह कॉल आपको एअरटेल नेटवर्क अपग्रेडेशन की वजह से कि जा रही है. आपके लिए हम एक युनिक नंबर जनरेट करेंगे वह नंबर अौर एक मोबाइल नंबर आपको एसएमएस के जरिए भेजा जाएगा. आपको वह युनिक नंबर भेजे हुए मोबाइल नंबर पे आपके मोबाइल से एसएमएस करके भेजना है. रिप्लाय में जो मेसेज आएगा उसको 1 लिखके कन्फर्मेशन देना है. बस आप का नेटवर्क अपग्रेड हो जाएगा. लेकीन एक बात का ध्यान रखिये की अपग्रेडेशन के वक्त अापका मोबाइल थोडे समय के लिए बंद रहेगा. हमें आपका किमती समय देने के लिए धन्यवाद. आपका दिन शुभ हो."

या फोनकॉल पाठोपाठ मेहतांना एसएमएस आला. त्यात एक युनिक नंबर अाणि एक मोबाइल नंबर होता. वेळ न घालवता आणि कसलीही शहानिशा न करता त्यांनी तो युनिक नंबर दिलेल्या मोबाइलवर एसएमएसने पाठवून दिला. पाठोपाठ आलेल्या एसएमएसला त्यांनी 1 (one) असा रिप्लाय देऊन कन्फर्म केले.

थोड्या वेळातच त्यांच्या मोबाइलची रेंज जाऊन तो बंद झाला. पण कॉल सेंटरवरील माणसाने सांगितल्यामुळे त्यांनी फारशी काळजी केली नाही. त्यांच्या जवळ असलेल्या दुसऱ्या मोबाइलवरून त्यांनी त्यांचे व्यवहार चालू ठेवले. आपल्या कामाच्या व्यापात काही वेळातच मेहता ही गोष्ट विसरूनही गेले.

दुसरा दिवस उजाडला तरी त्यांच्या मोबाइलची रेंज आली नव्हती. म्हणून त्यांनी त्यांच्या ऑफिस बॉयला एअरटेल सर्व्हिस सेंटरवर पाठवले. चौकशीअंती असे समजले की त्यांचे सिमकार्ड व्यवस्थित चालू असून 3G वरून 4G वर अपग्रेड केले गेले आहे.

दरम्यान त्यांनी एका वेंडर ला दिलेला चेक बँकेत पुरेसा बॅलन्स नसल्यामुळे क्लिअर होऊ शकत नाही असा बँकेतील अधिकाऱ्याचा त्यांना फोन आला. मेहतांना फार आश्चर्य वाटले कारण त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांच्या अकाऊंटला किमान साठ लाख तरी बॅलन्स होता.

बँकेत जाऊन चौकशी केल्यावर समजले की काल संध्याकाळ पासून आठ दहा वेळेस त्यांच्या डेबिटकार्ड वरून अॉनलाइन खरेदी केली गेली आहे आणि बॅंकेत अवघा बेचाळिस हजार बॅलन्स आहे.

हे ऐकून मेहता बुचकळ्यात पडले. कारण डेबिटकार्ड तर त्यांच्याजवळ होते आणि त्यांनी कुठलीही खरेदी केली नव्हती. त्यांना काय करावे समजत नव्हते.

मेहतांनी ही बाब त्यांचा मुलगा दीपकला सविस्तर सांगितली. दीपकचा मित्र सौरभ बांद्रा सायबर पोलिसांचा सल्लागार होता. दीपकने सर्व प्रकार सौरभच्या कानावर घातला. सौरभला लगेच लक्षात आले की हा सिमकार्ड स्वॅप फ्रॉडचा प्रकार आहे.

खरा प्रकार असा होता की, मेहतांना एअरटेल सर्व्हिस प्रोव्हायडर कडून फोन आलेला नसून एका हॅकरकडून आलेला होता. त्याने फोन करण्याअगोदर मेहतांचे आधारकार्डचे झेरॉक्स कुठूनतरी मिळवून, त्यांच्या नावे त्यांच्या बॅंकेत रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरचे नवीन 4G सिम मिळवले.(खरं तर नुसत्या आधारकार्डच्या झेरॉक्सवर डुप्लिकेट सीम मिळत नाही. पण हॅकरने सर्व्हिस सेंटर मधील ओळखीच्या व्यक्तीशी संगनमत करून डुप्लिकेट सीम घेतले असावे.) नंतर मेहतांना फोन करून नव्या 4G सिमकार्ड चा नंबर पाठवून सिमकार्ड स्वॅप करायला लावले. सीमकार्ड स्वॅप म्हणजे एखाद्याचे 3G सिमकार्ड असल्यास 4G वर अपग्रेड होण्यासाठी जुन्या सिमकार्ड वरून नवीन सिमकार्ड चा नंबर मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर ला पाठवून अपग्रेड करावे लागते. त्यानंतरच नवीन सिमकार्ड अॅक्टिवेट होऊ शकते.

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, की हॅकरला मेहतांच्या डेबिट कार्डचे डिटेल्स कसे मिळाले?

हॅकर ने मालवेअर असलेला एसएमएस पाठवून आधी मेहतांचा मोबाइल हॅक केला असावा किंवा मेहतांच्या मोबाइल फोनवरील एखाद्या अॅपच्या माध्यमातून त्यांचे डेबिटकार्ड डिटेल्स लीक झाले असावेत. हॅकर्स हे असे डेबिट, क्रेडिट कार्डचे डिटेल्स डार्क वेब वरून किंवा दुसऱ्या हॅकर्सकडून विकत घेऊ शकतात. टू स्टेप ऑथेंटिकेशन चा अडथळा दूर करण्यासाठी त्याने सिमकार्ड स्वॅप फ्रॉड केला. म्हणजे मेहतांच्या अकाऊंटमधून पैसे जाताना ओटीपी हॅकरजवळच्या मेहतांचे सिमकार्ड लावलेल्या मोबाइलवर येईल.

सिम कार्ड स्वॅप फ्रॉडपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे जरुरी आहे.
- बँकेत मोबाइल नंबर सोबत आपला ई मेल आयडी सुद्धा रजिस्टर करावा. म्हणजे मोबाइलसोबत इमेलवरही ओटीपी किंवा पैसे डेबिट झाल्याचे मेसेजेस येतील.
- मोबाइलवर आलेल्या मेसेजमध्ये लिंक असल्यास ती क्लिक करून उघडू नका म्हणजे मोबाइलमध्ये मालवेअरचा शिरकाव होऊन मोबाइल हॅक होऊ शकणार नाही.
- अगदी जरूरी असलेले अॅप मोबाइलमध्ये ठेवा त्यांना परमिशन्स देताना काळजी घ्या. कारण अॅपमधूनही मोबाईलमधील डेटा लीक होतो. (जसे पेमेंट अॅप्समध्ये स्टोअर केलेले डेबिट क्रेडिट कार्ड डिटेल्स वगैरे.)
- कुठूनही फोन कॉल आल्यास आणि फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने कुठलीही सूचना दिल्यास (वरील घटने प्रमाणे) तर पूर्णपणे दुर्लक्ष करावे. त्याने सांगितल्याप्रमाणे करू नये.
- मोबाइलवर अँटी व्हायरस आणि अँटी मालवेअर इन्स्टॉल करून अपडेटेड ठेवावे.
- दुर्दैवाने सिमकार्ड स्वॅपिंग फ्रॉड तुमच्यासोबत झाल्यास लवकरात लवकर बँकेत सूचना देऊन पेमेंट स्टॉप करावे. आणि सायबर पोलिस स्टेशनला कम्प्लेंट नोंदवून जेथून फोन कॉल आला ते लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करावा.

सजग रहा. सुरक्षित रहा. पुन्हा भेटू एका नव्या सायबर क्राइम कथेसोबत.


©कविता दातार