Wednesday, 9 December 2020

बॉईज लॉकर रूम

बॉईज लॉकर रूम


दक्षिण दिल्लीतील एका शाळेतील पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील  सधन कुटुंबातील मुलं. त्यांनी मिळून इंस्टाग्राम वर एक ग्रुप बनवला. ग्रुपला नाव दिलं "बॉईज लॉकर रूम". सुरुवातीला शाळकरी मुलांच्या इतर ग्रुप प्रमाणेच या ग्रुप मध्ये चॅटिंग, पोस्टिंग, व्हिडिओ, फोटो शेअरिंग व्हायचे. एक दिवस ग्रुपमधील एका मेम्बरने त्याच्याच वर्गातील एका मुलीचा मॉर्फ केलेला (चेहरा त्या मुलीचा आणि बाकी शरीर दुसऱ्या एका नग्न स्त्री चे) अश्लील फोटो शेअर केला. त्यावर काही मेम्बर्स चे आचकट, विचकट आणि अश्लील असे कमेंट्स आले.

त्या दिवसापासून ग्रुपमधील काही मेंबर्स चे असले विकृत उद्योग सुरू झाले. ओळखीतल्या आणि अनोळखी मुलींचे फोटो फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप वरून काढून घेऊन मॉर्फ करून, ग्रुपमध्ये पोस्ट करायचे आणि त्यावर अत्यंत अश्लील, विकृत टिपण्या करायच्या. हा उद्योग बरेच दिवस सुरू होता.

मे 2020 मध्ये मात्र कहरच झाला. एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा मॉर्फ केलेला फोटो पाहून काही मेम्बर्सनी त्या मुली वर रेप करण्याची योजना बनवायला सुरुवात केली. त्या अत्यंत विकृत योजनेच्या संदर्भातच बहुतेक मेंबरस् पोस्ट करू लागले. या सर्व प्रकाराला घाबरून ग्रुप मधील काही मेंबर्स ने ग्रुप सोडला. त्यातीलच एका मुलाने ने या विकृत योजनेच्या संदर्भातील चॅटिंग चा स्क्रीनशॉट त्याच्या मैत्रिणीला पाठवला. त्या मुलीने तो स्क्रीनशॉट व्हायरल केला आणि ही गोष्ट उघडकीस आली.

या घटनेचा वृत्तांत दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी यासंदर्भात एफआयआर दाखल केला. पोलिस तपासाची चक्र वेगाने फिरली. सव्वीस मुलांना पोलिसांनी अटक केली. यातील बहुतेक मुलं अल्पवयीन होती. सायबर पोलिसांनी इंस्टाग्राम ला रिपोर्ट करून हा ग्रुप डिलीट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंस्टाग्राम ने "बॉयस लॉकर रूम"  ग्रुप डिलीट केला.

गोष्ट एवढ्यावरच संपली नाही. ग्रुप डिलीट झाल्यावर ग्रुप मधील काही निगरगट्ट मुलांनी "बॉईज लॉकर रूम 2" या नावाने दुसरा ग्रुप इंस्टाग्राम वर सुरू केला. मात्र पोलिसांच्या रडारवर ही मुलं असल्याने तो ग्रुप जास्त दिवस चालू शकला नाही.

या सर्व घटनाक्रमाचा आढावा घेतला असता, काही प्रश्न मनात उद्भवतात. या मुलांमध्ये एवढी विकृति कुठून आली?

या सर्व मुलांचे असले विकृत उद्योग चालू असताना कोणाच्याही पालकांना ते कसे कळले नाहीत? आणि शेवटचा प्रश्न इन्स्टाग्राम वर जे काही पोस्ट होतं ते त्याच्या सर्व्हर वर व्हेरिफाय होतं तरीदेखील इंस्टाग्राम ने कुठलीही ॲक्शन का घेतली नाही?

या सर्व प्रश्नांची मी माझ्या परीने उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं जाणवलं की मुलांना घरून मिळणारे संस्कार फार महत्त्वाचे आहेत.  पालकांचे मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांमध्ये मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच आत्मिक, नैतिक आणि सामाजिक विकासासाठी पुरेसे प्रयत्न व्हायला हवेत. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ॲप्स ने नैतिक जबाबदारी उचलून असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

©कविता दातार



हेल्पलाईन नंबर (?)

 


"अरे दिपक ! हे आर ओ वॉटर प्युरीफायर कालपासून चालतच नाहीये. प्यायला  पाणी कसे मिळणार ?"

"कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून कंप्लेंट दे. ते सर्विस मॅन पाठवतील. त्याच्याकडून दुरुस्त करून घे." "हेल्पलाइन नंबर तुला माहित आहे का ?"

"नाही ग ! गुगलवर शोध ना .."

"अरे हो.. विसरलेच.." ज्योतीने लगेच गुगल वरून वॉटर प्युरीफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधून कॉल केला आणि कम्प्लेंट दिली.  सर्विस मॅनला दुपारी दोन वाजता पाठवतो, असे  त्या हेल्पलाइन वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

दुपारी दोन वाजता कंपनीचा सर्विस मॅन आला तेव्हा ज्योती एकटीच घरात होती. दीपक ऑफिस मध्ये होता. वॉटर प्युरीफायरचे नीट निरीक्षण करून त्या माणसाने फिल्टर आणि सिलेंडर बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यासाठी साडेसहा हजार लागतील असे तो म्हणाला. ज्योतीने लगेच दीपक ला फोन लावला,

"अरे फिल्टर आणि सिलेंडर दोन्ही बिघडले आहेत. ते बदलायला साडेसहा हजार रुपये लागतील म्हणे."

"अरे बापरे ! इतके ?? त्या सर्विस मॅनला फोन दे बरं.."

ज्योतीने सर्विस मॅन च्या हातात फोन देऊन त्याला दीपक सोबत बोलायला सांगितले.

"तुमचे नाव काय? काय झालंय ? वॉटर प्युरिफायर चालत का नाही??"

"साहेब मी मनोज गोराणे..." त्याचे नाव सांगून तो पुढे म्हणाला, "तुमच्या वॉटर प्युरीफायर च्या सिलेंडर मध्ये लिकेज आहे आणि फिल्टर मध्ये खूप क्षार जमा झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बदलून टाकावे लागतील."

"अरे पण साडेसहा हजार फार होतात.."

"अहो साहेब ही तर पार्ट ची किंमत झाली. मी तर  माझे सर्व्हिस चार्जेस लावतच नाहीये. नाहीतर तुम्ही अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. म्हणजे कुठलाही पार्ट पुढच्या तीन वर्षात बिघडला, तरीही फ्री रिप्लेस करून दिला जाईल."

"बरं त्यासाठी काय चार्जेस पडतील ?"

"अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट नऊ हजारात जाईल."

"अरे बापरे ! हे तर अजूनच जास्त आहेत."

"पण साहेब पुढचे तीन वर्ष कुठलाही पार्ट तुम्हाला विकत घ्यावा लागणार नाही. कंपनी मोफत बदलून देईल."

"बर, ठीक आहे. मॅडम ला फोन दे."

"ज्योती त्याला नऊ हजार रुपये दे आणि त्याच्याकडून ते पार्टस बदलून घे. रिसीट घ्यायला विसरू नको."

ज्योतीने त्या सर्विस मॅन ला नऊ हजार रुपये दिले. त्याने रिसीट दिली. पार्टस आणि मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट चे पेपर घेऊन थोड्याच वेळात परत येतो, असे सांगून तो बाहेर पडला.  बराच वेळ झाला तरीही तो सर्विस मॅन परत आला नाही. त्या कंप्लेंट नंबर वर परत फोन केल्यावर तो नंबर बंद असल्याचा मेसेज आला. पुढील दोन-तीन दिवस वाट पाहून देखील तो न आल्याने आणि फोनही न लागल्याने त्यांना आपण फसवले गेल्याची खात्री पटली.

वॉटर प्युरिफायर घेतल्या वेळेसची रिसीट त्यांनी शोधून काढली. त्यावर त्या वॉटर प्युरिफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर होता. त्या नंबर वर फोन केल्यावर त्यांना कळले, की मनोज गोराणे नावाचा त्या कंपनीचा कोणीही सर्विस मॅन नाही. आणि ज्योतीने केलेली कंप्लेंट ही त्यांच्याकडे रजिस्टर झालेली नाही.

"आपण सायबर पोलिसात कम्प्लेन्ट देऊ या." ज्योती म्हणाली.

"अगं फक्त नऊ हजारच गेले आहेत ना. एवढ्या पैशांसाठी कुठे पोलीस स्टेशनच्या चकरा मारायच्या? एवढा वेळ तरी आहे का आपल्याजवळ?"

"ह्या अशाच विचारामुळे या गुन्हेगारांचे फावते. 9000 असले तरी फसवणूक झाली आहे ना? मग कम्प्लेंट करायलाच पाहिजे." ज्योतीने म्हंटले

तिचा एक वर्गमित्र सायबर पोलीस स्टेशनला काम करत असल्याने तिने त्याला फोन करून आधी कल्पना दिली आणि सायबर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देखील केली. तिथे गेल्यावर तिला कळले, की अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी या काही दिवसात आलेल्या आहेत. गुगल वरून तिने शोधलेला मोबाईल नंबर एका रिक्षाचालकाच्या नावावर होता. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला शोधून काढल्यावर, त्याने सांगितले की  त्याचे आधार कार्ड आठवड्याभरा साठी 500 रुपयाने एका व्यक्तीला भाड्याने दिले होते. आता पोलिस त्या व्यक्तीच्या शोधात आहेत.

वरील घटनेवरून वाचकांच्या लक्षात आले असेलच, की गुगल वरून शोधलेली प्रत्येक गोष्ट विश्वासार्ह असतेच असे नाही. अशाच घटना  स्वीगी, झोमॅटो, डॉमिनोज आणि काही बँकांच्या बनावट हेल्पलाईन नंबर मूळे देखील घडल्या असून काही जणांचे त्यात आर्थिक नुकसान झाले आहे. शक्यतो कुठल्याही सेवेचा किंवा बँकेचा हेल्पलाइन नंबर गुगल वरून शोधू नाही. त्याऐवजी त्या सर्विस सेंटर आणि आस्थापनांच्या अधिकृत कागदपत्रांवरून किंवा त्यांना समक्ष भेट देऊन हे हेल्पलाइन नंबर घ्यावेत. तसंच वरील घटनेत ज्योतीने जर त्या सर्विस मॅनला कॅश ऐवजी चेक दिला असता, तर नंतर चेक पेमेंट कदाचित थांबवता  आलं असतं. अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट चे सर्व साधारणपणे कंपनीच्या नावावर चेक दिले जातात. लोकांनी थोडी सतर्कता बाळगली तर अशा प्रकारच्या घटना सहज टाळता येतील.

सावधान रहा.

सुरक्षित रहा.

©कविता दातार


Saturday, 28 November 2020

वॉर ड्रायव्हिंग

 वॉर ड्रायव्हिंग




मध्यरात्रीचा एक वाजलेला.  मुंबईतील, दादरच्या त्या उच्चभ्रू वस्तीतून एक होंडा सिटी कार सावकाश जात होती. कारमध्ये बावीस-तेवीस वर्षांची दोन मुलं. एक ड्रायव्हिंग सीटवर, दुसरा मागच्या सीटवर लॅपटॉप सोबत...

"संत्या... मिशन सक्सेसफुल..." मागे बसलेल्याने कार चालवणार्‍याला अंगठा वर करत सांगितले.

"That's like a good boy...योग्या.." कार चालवणारा हसत बोलला. कारने वेग घेतला आणि अर्ध्या मिनिटात दिसेनाशी झाली.

********

"सोहम! सोहम!! उठ रे.. आज  कॉलेजला जायचं नाही का तुला?"

आईच्या हाकेने सोहम जागा झाला आणि अंथरूणातून उठून पटकन आवरायला गेला. कॉलेजला जाण्यासाठी सोहम तयार होत असतानाच डोअरबेल वाजली. आईने दार उघडले.

दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या. "कोण हवंय आपल्याला?" सोहमच्या आईने विचारले, "मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम" इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले.

डोअर बेलचा आवाज ऐकून सोहम बाहेर आला.

"काय झालंय इन्स्पेक्टर?" प्रश्नांकित चेहरा करुन त्याने विचारले. 

"तुम्हाला आमच्या बरोबर पोलिस स्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल." इन्स्पेक्टर म्हणाले.

"का? काय झाले?" सोहमने विचारले. 

"दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे सुमारे साडेचार लाखांची." इन्स्पेक्टरने माहिती दिली.

"पण यांत माझा काय संबंध?" सोहमला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं  आपल्याला का सांगताहेत. सोहम आणि त्याची आई दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे पाहत होते.

"तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे. आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे." दीक्षितांनी पुस्ती जोडली.

सोहमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. आईला तर काय चालले आहे? हेच कळत नव्हते.  

"मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस." सोहम आईला धीर देत म्हणाला आणि त्या तिघांबरोबर बाहेर पडला.

थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर सोहम बसला होता.

दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक दीड वाजेच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता.

"हे कसे शक्य आहे? आमच्या घरी मी आणि माझे आई-बाबा असे तिघेच असतो. सध्या बाबा तर कामाच्या निमित्ताने दुबईत आहेत.  रात्री साडेदहापर्यंत तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणी सुद्धा आलेले नव्हते, मग... " 

"मिस्टर सोहम जोशी.." त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले,  "आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही. " त्यानंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार सोहमला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला.

या प्रकाराला वॉर ड्रायव्हिंग असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर एअरक्रॅक सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस अडॅप्टर, वायफाय पासवर्ड  क्रॅक करण्यासाठी  लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला, कि ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल ती व्यक्ती संकटात येऊ शकते. सोहमच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड  आणि फारसे सिक्युर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चूक नसतांना तो नाहक गोवला गेला होता. थोडीशी बेपर्वाई त्याच्या अंगलट आली होती.

दोन महिने  खटला चालला. सोहमवर डेबिट कार्ड च्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची रक्कम भरावी लागली. मानसिक त्रास झाला तो वेगळाच. याचे परिणाम दुर्दैवाने त्याला भविष्यात त्याच्या करियरच्या बाबतीत भोगावे लागूं शकतात.

मित्र मैत्रिणींनो तुमच्यापैकी बहुतेक जण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा,

- तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA / WPA2 इन्क्रिप्शनचा वापर करा.

- स्ट्राँग पासवर्ड लावा.

- शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत  नसल्यास राऊटर बंद करून ठेवा.

- घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेस ला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता किंवा सर्विस इंजिनियर कडून करवून घेऊ शकता.

सावध आणि सतर्क राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

©कविता दातार

Saturday, 21 November 2020

व्हाट्सएप व्हिडिओ कॉल

व्हाट्सएप व्हिडिओ कॉल




(पॉर्न साईट्स बघण्याच्या व्यसनामुळे विचित्र अडचणीत सापडलेल्या व्यक्तीची सत्यकथा)

रमेश डोळ्यांत प्राण आणून मोबाईलवरचा व्हिडीओ पाहण्यात मग्न होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा हा रोजचा परिपाठ झाला होता. ऑफिसमधून आल्यावर आवरून, रात्रीचे जेवण आटोपल्यावर पुढचे दोन तीन तास तो मोबाईल किंवा लॅपटॉपवर पॉर्न साइट्सवरचे व्हिडिओ पाहण्यात रंगून जायचा. त्याला तसल्या साईटस सर्फ करण्याचे, त्यावरचे व्हिडीओ पाहण्याचे, क्वचित कधी तरी तिथे दिलेल्या लिंकवरून एखाद्या लेडी मेंबरशी चॅटिंग करण्याचे व्यसन जडले होते. स्वतःला या सगळ्यांपासून दूर ठेवण्याचे खूपदा ठरवूनही त्याला ते जमत नव्हते.

रमेश पुण्यातील एका मोठ्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता. त्याची हुशारी, कार्यक्षमता आणि सरळ, साधा स्वभाव यामुळे तो त्याच्या सहकारी आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होता. चार वर्षांपूर्वी त्याची पत्नी रीमाचा कॅन्सरने मृत्यू ओढवला. एकुलती लेक राशी, आयआयटी पवईला इंजिनिअरिंग शिकत होती. रीमाच्या मृत्यूनंतरचे एकाकी आयुष्य रमेशला खायला उठायचे. दिवस तर कामात निघून जायचा. पण संध्याकाळी घरी आल्यावर त्याचा वेळ जात नसे. अशातच दुसरे कुठलेही व्यसन नसलेल्या रमेशला पॉर्न साईट बघण्याचे व्यसन लागले.

रात्रीचे साडेबारा वाजले. आता झोपावे, नाहीतर उद्या ऑफिसला उशीर होईल, या विचाराने त्याने मोबाइलवर सुरू असलेला व्हिडिओ बंद केला आणि मोबाइल बाजूला ठेवला. अंथरूणावर पडणार तेवढय़ात मोबाईल ची रिंग वाजली. त्याने पाहिलं व्हाट्सएप व्हिडिओ कॉल होता. कॉलर ओळखीचा दिसत नव्हता. त्याने बेडसाइड लॅम्प लावला,  व्यवस्थित उशीला टेकून बसत त्याने उत्सुकतेपोटी कॉल रिसिव्ह केला आणि.......आणि......

एक पूर्णपणे नग्न तरुणी मोबाईल स्क्रीनवर झळकली. रमेशला आश्चर्याचा  धक्का बसला. आश्चर्यचकित अवस्थेतही तो मोबाईल स्क्रीन वर दिसणाऱ्या अनावृत्त स्त्रीकडे डोळे फाडून बघत होता.

"हाय रमेश !" ती बोलली.

"..." रमेश च्या तोंडून शब्द फुटत नव्हता.

ती पुढे बोलली.

"I have got your cell no from your favourite porn site, where you registered it, while signing up." (मला तुझा मोबाईल नंबर तुझ्या आवडत्या पॉर्न साईट वरून मिळाला, जो तू त्या साईट वर साईन अप करताना दिला होता.)

कॉल करणारी स्त्री इंग्लिश मध्ये बोलत होती.

"So....I called you, if you are interested, call me at this number anytime, I 'll be available wherever you wish..." (तुला वाटेल तेव्हा मला या नंबर वर कॉल कर, तु म्हणशील तिथे मी येईन.)

तिने कशासाठी कॉल केलाय? हे आता कुठे रमेशच्या ध्यानात आलं. कसंतरी अवसान आणून तो म्हणाला.

"Sorry...I am not at all interested..."

रमेश कॉल disconnect करणार तेव्हढ्यात ती म्हणाली,

"Ok...then...I have taken the screenshot of our conversation and now I am going to make it viral. If you don't want me to do so, then, do make arrangements of rs 50000/- ASAP...I'll message you my account details."

(ठीक आहे, मी या संभाषणाचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे, तो व्हायरल करेन, मी तसे  करू नाही असे तुला वाटत असेल, तर लवकरात लवकर पन्नास हजार रु. ची व्यवस्था कर. माझे अकाउंट डिटेल्स मी तुला मेसेज करीन.)

एव्हढं बोलून तिने कॉल disconnect केला.

रमेशच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून हा कॉल रिसिव्ह केला असे त्याला वाटायला लागले. काय करावे ? त्याला समजत नव्हते. या बदनामी तून वाचण्यासाठी लगेचच पन्नास हजार  देऊन मोकळे व्हावे, असा एक विचार त्याच्या मनात आला.

पण त्याआधी शेखर शी बोलावे असे त्याने ठरवले. शेखर त्याचा कलीग आणि फार जवळचा मित्र. तो त्याच्या कंपनीतील सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटचा इन्चार्ज होता. आता रात्र फार झाली आहे, उद्या त्याच्याशी बोलावे. असे ठरवून रमेशने झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याची झोप त्या व्हाट्सएप व्हिडिओ कॉल ने पुरती उडवली होती.

दुसऱ्या दिवशी शेखरला भेटून त्याने सर्व हकिकत काहीही आडपडदा न ठेवता सांगितली. त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन शेखरने बोलायला सुरुवात केली.

"रमेश. . पॉर्न साइट्स बघणं ठीक नाही हे तर नक्की. पण

असं आजकाल सर्रास होतं आहे, कोणीतरी अनोळखी स्त्री व्हाट्सएप व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याची धमकी देते. आशा बऱ्याच complaints सायबर सेल ला रजिस्टर आहेत. पण हे असं ब्लॅकमेल करणं काही सोपं नाही. यात तो नंबर, त्या स्त्रीचा फोटो सगळंच समोर येतं. नंबर बदलता आला तरी तिलाही, कशीही असली तरी स्वतः चा फोटो व्हायरल झालेला आवडणार नाही. त्यामुळे तू याकडे दुर्लक्ष कर. तरीही आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेन्ट देऊन ठेवू."

"फार तर काय... स्क्रीनशॉट्स आणि एखाद्या साइटवरील तुझा डेटा त्या ब्लॅकमेलर जवळ असू शकतो. कारण या पॉर्न साइट्स युजर्सच्या आवडी निवडीं बद्दल चा डेटा रेकॉर्ड करून ठेवतात. या वेबसाइटस् वरील युजर डेटा लीक करून हॅकर्स डार्क वेबवर काही हजारात विकतात. त्या डेटाच्या आणि स्क्रीनशॉट्सच्या आधारे तुझी बदनामी कोणी करू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण तुझा जवळचा मित्र म्हणून मी तुला एक गोष्ट जरूर सुचवीन की पॉर्न साइट्स बघण्याच्या या व्यसनातून बाहेर येण्यासाठी तू सायकियाट्रीस्टची जरूर मदत घ्यावी."

शेखरने सुचविल्यानुसार रमेशने पुण्यातील नामवंत सायकियाट्रीस्टची दोन महिने ट्रिटमेंट घेतली. त्यांनी दिलेल्या औषधांसोबत, उपचाराचा भाग म्हणून आपल्या घरातील इंटरनेट दोन महिने पूर्णतः बंद ठेवले. त्याबरोबरच चांगल्या साहित्याचे वाचन, मेडिटेशन आणि प्राणायाम यात आपले मन गुंतवले.

आज रमेश या पॉर्न साइट्स बघण्याच्या घाणेरड्या व्यसनातून पूर्णतः बाहेर येऊन एक सुखी जीवन जगत आहे.

©कविता दातार

Sunday, 8 November 2020

क्यूआर कोड स्कॅम (QR Code Scam)

 क्यू आर कोड स्कॅम (QR Code Scam)


अनिता बेंगलोर मध्ये राहणारी एक स्मार्ट गृहिणी. दिवाळीची खरेदी म्हणून तिने लेटेस्ट मॉडेल ची फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन खरेदी केली. जुनी टॉप लोडिंग वॉशिंग मशीन विकण्यासाठी म्हणून लोकल न्यूज पेपर मध्ये जाहिरात दिली. तीन-चार चौकशीचे फोन येऊन गेले. चौकशी करणाऱ्यांना तिने दहा हजार रुपये किंमत सांगितली. काहींना सेकंड हँड वॉशिंग मशीनची ती किंमत जास्त वाटली. बाकीच्यांना बहुतेक त्या वॉशिंग मशीनच्या खरेदीत इंटरेस्ट नसावा. उगाच चौकशी करायला त्यांनी फोन केला असावा, असं अनिताला वाटलं. मात्र त्या दिवशी ज्या व्यक्तीचा फोन आला, त्याला खरोखरीच वॉशिंग मशीन घेण्याची निकड असावी. 


त्याने आपले नाव रामन असे सांगितले. तो टीसीएस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, असे त्याने सांगितले. वॉशिंग मशीनची ब्रँड, मॉडेल, कॅपॅसिटी असे सगळे डिटेल्स त्याने नीट विचारले. किंमतही त्याला मान्य होती. स्वतःचा नाव, पत्ता सांगून वॉशिंग मशीन न्यायला एक ऍपेरिक्षा येईल असे तो म्हणाला. अनिताने त्याला, 'पेमेंट कसे करणार?' विचारल्यावर त्याने सांगितले, "मॅडम ! तुम्हाला व्हाट्सअप वर एक क्यू आर कोड येईल. तो स्कॅन करून तुमचा अकाउंट नंबर टाकला, की पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील."

तिने त्याचे नाव, पत्ता पुन्हा विचारून ज्या नंबर वरून कॉल आला, तोच त्याचा व्हाट्सअप नंबर असल्याची खात्री केली. आतापर्यंत क्यूआर कोड वापरून, तिने बऱ्याचदा पेमेंट केले असल्यामुळे, पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड वापरतात की नाही ? याबद्दल साशंक असलेल्या अनिताने त्याला क्यू आर कोड पाठवण्यास सहमती दर्शवली.

व्हाट्सअप वर त्याने पाठवलेला क्यू आर कोड तिने फोटो गॅलरीत ओपन केला आणि मोबाईल वरचे  bixby vision हे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी असलेले ॲप वापरून स्कॅन केला. पण हे काय? .....

तिचे अकाउंट डिटेल्स देण्याच्या तयारीत  असलेली अनिता एका वेगळ्याच वेबसाईटवर री-डायरेक्ट झाली. वेबसाईटचे लँडिंग पेज बघत असतानाच तिच्या मोबाईलवर बँकेकडून 90 हजार रुपये डेबिट झाल्याचा एस एम एस आला. अनिताला घाम फुटला. नक्कीच क्यूआर कोड पाठवणाऱ्या त्या रामनने काही तरी घोळ केला होता. तिने त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. वेळ न घालवता तिने जवळच्या सायबर पोलिस स्टेशन वर जाऊन कम्प्लेंट दिली आणि एफ आय आर ची कॉपी पोलीस अधिकाऱ्याच्या सही, शिक्क्या सोबत तिच्या बँकेत जमा केली. या केसचा सायबर पोलिस तपास करत आहेत.

क्यूआर (Quick Response) कोड पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळ्या चौकोनी ठिपक्यांनी बनलेला चौकोनाकृती द्विमितीय बारकोड असतो. बारकोड रीडर, मोबाईल कॅमेरा किंवा अँप द्वारे तो स्कॅन करून वाचता येतो. कारखान्यात उत्पादित वस्तूंच्या किंवा इतर माहिती साठी, एखाद्या वेबसाइट वर लॉगिन करण्यासाठी, वेगवेगळ्या ऑफर्स व डिस्काउंट मिळवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी क्यूआर कोड वापरतात.

सध्या या कोरोना काळात स्पर्श विरहित आर्थिक व्यवहारांसाठी क्यूआर कोडचा वापर वाढला आहे. कुठल्याही दुकानाच्या काउंटरवर तुम्हाला क्यूआर कोड लावलेला दिसेल. मोठ्या शहरात भाजीवाले, फेरीवाले देखील याचा सर्रास वापर करताना दिसतात.

सध्याच्या डिजीटल युगात आपणा सर्वांना या गोष्टींचा वापर टाळता येणं शक्य नाही. पण क्यूआर कोड वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

1.पेमेंट साठी क्यूआर कोड स्कॅन केल्यावर स्क्रीन वर आलेले डिटेल्स नीट वाचावे म्हणजे आपण नक्की कोणाला,किती पेमेंट करत आहोत याची खात्री करावी. पैसे घेण्यासाठी सहसा क्यूआर कोड वापरत नाहीत.

2.काहीही असाधारण आढळल्यास पेमेंट करणे टाळावे.

3.सार्वजनिक, अज्ञात ठिकाणावरील किंवा अज्ञात स्रोत असलेला क्यूआर कोड स्कॅन करू नाही.

4.काढता येण्याजोग्या (removable) स्टिकर वरील क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नाही.

5.कुतूहल म्हणून उगाच कुठलाही क्यूआर कोड स्कॅन करू नाही.

6.कुठल्याही पोस्टरवर, इमारतीवर किंवा घराच्या भिंतीवर बोगस  क्यूआर कोड आढळल्यास संबंधित व्यक्तीला त्याबद्दल माहिती द्यावी.

7.क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वेबसाईट ओपन होऊन त्यावर तुमचे पर्सनल डिटेल्स विचारले जात असतील तर ते देणे टाळावे आणि लगेच तिथून बाहेर निघावे. कधीकधी डिटेल्स विचारले जात नाहीत पण वेबसाईट मात्र malicious  असते त्यावरून तुमच्या मोबाईल मध्ये मालवेअर इन्स्टॉल करून मोबाईल हॅक केला जाऊ शकतो आणि तुमचे कार्ड डिटेल्स चोरले जाऊ शकतात. अनिताच्या केस मध्ये तसेच झालेले आहे.

8. मोबाईल कॅमेरा ने क्यूआर कोड स्कॅन करत असल्यास मोबाईल मध्ये चांगले अपडेटेड अँटिव्हायरस असल्याची खात्री करावी.

9. शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी सिक्युरिटी सिस्टम असलेले ॲप (जसे Kaspersky's QR Scanner, NeoReader ) वापरल्यास तुम्ही सुरक्षित रहाल. कारण सिक्युरिटी सिस्टम असलेले ॲप तुमच्या मोबाईल मध्ये क्यूआर कोड द्वारा कुठलेही मालवेअर इन्स्टॉल होऊ देणार नाही.

सावध आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

पुन्हा भेटूया एका नव्या सायबर क्राईम कथे सोबत.... 
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...

©कविता दातार

Tuesday, 20 October 2020

खाजगी (?) माहितीची अधिकृत चोरी


"ए आई ! मला चांगले स्पोर्ट शूज घ्यायचेत गं !" 


"बरं ...आपण टाटा क्लिक किंवा ॲमेझॉन वर पाहूयात का ?"

"नको.. मार्केटला जाऊनच घेऊ या.. साईजचा प्रॉब्लेम नको यायला..."

हा  माझ्या आणि माझ्या मुलीत झालेला संवाद... थोड्याच वेळात ती तिच्या खोलीतून बाहेर येऊन आश्चर्याने म्हणाली,

"आई ! मी फेसबुक उघडल्यावर मला सारख्या स्पोर्ट शूज च्या एडवर्टाइजमेंट येताहेत... यांना कसं कळलं, मला स्पोर्ट शूज घ्यायचे आहेत ते ??"

मला मात्र काहीही आश्चर्य वाटलं नाही. तिच्या मोबाईलमधील कुठल्यातरी ॲपला मायक्रोफोन ॲक्सेस असणार, आणि आमचा संवाद  रेकॉर्ड करून  त्या ॲपने लगेच एखाद्या मार्केटिंग वेबसाइट वर अपलोड केला असणार...

होय, हे खरं आहे आणि हे तुम्हीही अनुभवले असणार.

आपल्यापैकी बहुतेक जण सोशल नेटवर्किंग साइटस् चा, मोबाईल वरील वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करतात. बहुतेकांच्या हातात स्मार्टफोन आल्याने  हा वापर  वाढत जात आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होणारे फायदे जसे अनेक आहेत, तसे तोटे देखील आहेत. यात अधोरेखित करता येण्याजोगा तोटा म्हणजे तुमची खाजगी माहिती खाजगी न राहता तिचे  व्यापारीकरण होणं. 

एकदा का आपण सोशल नेटवर्किंग साइटवर अथवा एखाद्या स्मार्टफोन ॲपवर आपल्याबद्दलची माहिती लिखित किंवा फोटो, व्हिडीओच्या स्वरूपात टाकली, कि ती माहिती खाजगी राहू शकत नाही. 

कुठल्याही वेबसाइट किंवा ॲपचे दोन प्रमुख आर्थिक स्रोत म्हणजे जाहिराती आणि  वापरकर्त्यांची माहिती (users' data). बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या कंपनी, संस्था, शॉपिंग अथवा मार्केटिंग साइट्स कडून ई-मेलस् येतात. आपला ईमेल आयडी त्यांना कुठून मिळतो????

याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि आपला इमेल आयडी यांना पुरवला जातो. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे भारतात वीस कोटी युजर्स आहेत. दिवसागणिक यात वाढ होत आहे.  लोकप्रियतेमुळे अनेक मार्केटींग कंपनी फेसबुकच्या यादीत आहेत. यावरून यूजर्स डेटाची उलाढाल किती प्रचंड प्रमाणात आहे याचा अंदाज येऊ शकतो. आज फेसबुकचे मार्केट कॅपिटल साधारणतः  साडेपाचशे अब्ज डॉलर्स एवढे आहे. असे म्हणतात की कुठलीही सेवा जर आपल्याला विनामूल्य मिळत असेल तर त्यात आपणच प्रॉडक्ट असतो.

२०१८ मध्ये उघडकीस आलेले केंब्रिज अनालिटिका कंपनी प्रकरण काही जणांना आठवत असेल. डेटा चोरी वर  प्रकाश  टाकणारे हे प्रकरण आहे. या प्रकरणात फेसबुकवरील एका ॲपच्या द्वारे युजर्सचा डेटा फेसबुकच्या नकळत चोरून केंब्रिज अनालिटीका कंपनीला अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणूक अभियानासाठी विकला गेला. 

फेसबुकच्या सेटींग्स मध्ये "Download a copy of your Facebook data" असे लिहिलेली एक लिंक आहे. ती लिंक वापरून फेसबुकवरील आपला सुरुवातीपासूनच डेटा डाऊनलोड करता येतो यात वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, वॉल पोस्ट्स, आपल्या फ्रेंडलिस्टमधील लोकांचे ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर असं सगळं काही मिळतं. एक साधारण हॅकर किंवा ज्याला आपला पासवर्ड माहीत असेल अशी व्यक्ती हा डेटा सहज मिळवू शकते. फेसबुकच नाही तर  लिंक्डइन, ट्विटर आणि इतर कुठलीही वेबसाइट या प्रकारे आपल्या डेटाचा वापर करतात. 

एवढेच नाही तर स्मार्टफोनच्या अँड्रॉइड, आयओएस या सारख्या ऑपरेटिंग सिस्टम्स सुद्धा आपल्या स्मार्टफोनवरील सगळा डेटा त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करून ठेवतात. त्यांचा सर्व्हर हॅक झाल्यास आपल्या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. 

यावरून असं म्हणता येइल की आपल्या लिखित, फोटो आणि व्हिडिओ स्वरूपातील वैयक्तिक माहितीची विक्री, चोरी आणि दुरुपयोग शक्य आहे.

खासगी माहितीचे व्यापारीकरण पूर्णपणे टाळता येणे आजच्या काळात शक्य नसले तरीही काही गोष्टींची खबरदारी  आपण घेऊ शकतो. 

- शक्यतोवर मोबाईल नंबर कुठल्याही वेबसाइटवर शेअर करणे टाळावे.

- खासगी आयुष्याबद्दलची सुक्ष्म माहिती, फोटो, व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करणे टाळावे. जुजबी माहिती फक्त पोस्ट करावी.

- सोशल मीडिया वापरत असताना त्यावरील दुसरे अनधिकृत अ‍ॅप (embeded apps) वापरू नये. उदा. फेसबुकवरील मल्लू अ‍ॅप किंवा तुम्ही कुठल्या हिस्टॉरिकल कॅरेक्टर सारखे दिसता? ते दाखवणारे ॲप वगैरे.

- एका ॲप मध्ये असताना त्यावरून  दुसऱ्या ॲप किंवा वेबसाईटवर नेणाऱ्या लिंक्स शक्यतो क्लिक करू नये.

- आपले बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयीची कसल्याही प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

- स्मार्टफोनवर खासगी क्षणांचे फोटो, व्हिडिओ शक्यतो चित्रित करू नये, त्याऐवजी वैयक्तिक कॅमेराचा वापर करावा.

- स्मार्टफोनवर जेवढे वापरत असाल तेवढेच ॲप्स ठेवा आणि त्या ॲप्सना जरुरी तेवढ्याच परमिशन्स द्याव्या.

- लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर हॅकिंग किंवा तत्सम गोष्टींपासून वाचण्यासाठी आणि डेटाच्या सुरक्षेसाठी क्विक हील, ए व्ही जी, नॉर्टन सारखे चांगले इंटरनेट सिक्युरिटी अँटी व्हायरस वापरावे.

यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे, जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरत नसाल, तेव्हा स्मार्टफोनवर वाय-फाय किंवा डेटा ऑफ ठेवा. म्हणजे निदान तुमचे खाजगी संवाद रेकॉर्ड होऊन लिक होणार नाहीत.


©कविता दातार

Wednesday, 30 September 2020

तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट सुरक्षित आहे का?


तुमचे व्हॉट्सऍप अकाउंट सुरक्षित आहे का?

नयनाचा काल मला फोन आला. फोनवर फारच घाबरलेली वाटत होती.

"अगं ताई ! माझ्या व्हॉट्सऍप वरून माझ्या शाळेच्या ग्रुप मधल्या मित्रांना, चार-पाच दिवसांपासून पैशांची मागणी करणारे मेसेजेस आणि घाणेरडे व्हिडिओज् जात आहेत."

"अरे देवा ! तुला कळलं कसं असे मेसेजेस जात आहेत म्हणून ?"

"अग मला निलेशने, माझ्या मित्राने आज सकाळी फोन करून विचारले, तुला पन्नास हजार रुपये केव्हा हवे आहेत म्हणून..."

"काय??"

"हो अगं... त्याला  व्हॉट्सऍप वर,अकाउंट डिटेल्स आणि त्यासोबत मेसेज मिळाला की, या माझ्या कंपनीच्या अकाउंट मध्ये 50000 लगेच जमा कर. मला तातडीने हवे आहेत म्हणून. मी निलेश ला म्हटले, अरे मी तुझ्याकडे का पैशांची मागणी करेन? मला काहीच सुचत नाहीये गं ताई ! मी येऊ का तुझ्याकडे ? तूच काय ते बघ."

नयनाचा आवाज बोलता-बोलता रडवेला झाला.

"हे बघ नयना,.शांत हो आधी..तुझे व्हॉट्सऍप अकाउंट कोणीतरी हॅक केलं आहे असं वाटतंय. तू ये लगेच माझ्याकडे...मी काय करायचं ते बघते."

पंधरा-वीस मिनिटांत नयना हजर झाली. ती फारच तणावात दिसत होती. मी तिला बसवून आधी पाणी दिले आणि फार काही न बोलता तिचा मोबाईल तिच्या कडून घेतला. 

सर्वात आधी मी तिच्या मोबाईल वरचे व्हॉट्सऍप अकाउंट डिलीट केले. त्यानंतर एव्हीजी अँटिव्हायरस इन्स्टॉल करून मोबाईल हॅक झाला नाही ना?  याची खात्री करून घेतली. मोबाईल फोन हॅक  झाला असता तर मला, तिच्या मोबाईल वरच्या डेटाचा बॅकअप घेऊन, मग फॅक्टरी रीसेट करून व्हॉट्सऍप सह बाकी सगळे ॲप्स परत इंस्टॉल करावे लागले असते. सुदैवाने मोबाईल हॅक झाला नव्हता. शेवटी मी व्हॉट्सऍप परत इंस्टॉल करून सेटिंग्स मध्ये जाऊन टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि फिंगर प्रिंट लॉक एनेबल करून दिले. जेणेकरून पुन्हा व्हॉट्सऍप किंवा मोबाईल फोन हॅक झाल्यास तिचे व्हॉट्सऍप अकाउंट हॅकर वापरू शकणार नाही.

वरील प्रसंग कमी अधिक फरकाने गेल्या सहा महिन्यांत माझ्या सहा-सात परिचितां सोबत घडला आहे. व्हॉट्सऍप हॅक झाल्यास काय करावे, हे तुम्हाला वरील परिच्छेद  वाचून कळले असेलच.

व्हॉट्सऍप हॅक होऊ नये म्हणून काही गोष्टींचे पालन करणे जरुरी आहे.

१) संशयास्पद लिंक्स क्लिक करू नयेत. ( लवकरच व्हॉट्सऍप मध्ये मेलिशियस लिंक्स ओळखून ऑटोमॅटिकली डिलीट करण्याचे नवे फिचर येणार आहे.)

२) खात्रीशीर स्रोतांमधूनच मोबाईल ॲप्स इन्स्टॉल करावे. काही ॲप्स निव्वळ तुमच्या मोबाईल मधल्या डेटा ची चोरी करण्यासाठी बनवले गेले असतात, त्यांना स्पाय ॲप्स  म्हणतात, ते तुमचा मोबाईल हॅक देखील करू शकतात.

३) टू स्टेप व्हरिफिकेशन आणि / किंवा फिंगर प्रिंट लॉक व्हॉट्सऍप च्या सेटिंग्स मध्ये जाऊन एनेबल करावे.

४) व्हॉट्सऍप वेब म्हणजेच लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वरून व्हॉट्सऍप मेसेजेस करत असाल, तर काम झाल्यावर लॉग आऊट करायला विसरू नका.

५) तुमचे प्रोफाइल फोटो, स्टेटस फक्त तुमच्या कॉन्टॅक्टस् मधील लोक पाहू शकतील अशी सेटिंग करून ठेवा.

६) कोणासोबतही तुमचा फोन किंवा त्यावर आलेले व्हेरिफिकेशन कोड, ओटीपी शेअर करू नका.

७) तुमचा मोबाईल फोन पासवर्ड, पीन किंवा पॅटर्न वापरून प्रोटेक्टेड ठेवा.

८) व्हॉट्सऍप च्या सेटिंग-> अकाउंट-> प्रायव्हसी-> ग्रुप मध्ये जाऊन तुम्हाला कुठल्याही ग्रुप मध्ये कोणी ऍड करू शकणार नाही, असे सेटिंग करून ठेवावे.

सावध आणि सतर्क राहून टेक्नॉलॉजी चा आनंद घ्या.

© कविता दातार