Thursday 17 January 2019

एसेमेस हॅक


कारमधून उतरून अमितने घाईतच एटीएम गाठले. पैसे काढून झाल्यावर घाईत असल्याने वॉलेटमध्ये टाकताना कार्ड खाली पडले. कार्ड पडल्याची जाणीवही न होता त्याने कार स्टार्ट केली. आज महत्त्वाची मीटिंग असल्याने त्याला वेळेत ऑफिसला पोहचायचे होते. मीटिंग संपल्यावर त्याच्या केबिनमध्ये येऊन बसत त्याने मोबाइल बघितला. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या नोटिफिकेशन्सना टाळून त्याने एसएमएस ओपन केले. पैसे काढल्याचा बँकेकडून मेसेज होता. आणखी एक मेसेज बँकेकडून आलेला दिसत होता. तो त्याने उघडला. त्यात डेबिट कार्ड वापरल्याबद्दल चे कॅशबॅक पॉइंटस् मिळवण्यासाठी एक लिंक ओपन करण्यास सांगितले होते. क्लिक करून अमितने ती लिंक ओपन केली. तेवढ्यात एक कॉल आल्याने अमितचे त्या लिंकवरील पेज बघायचे राहून गेले.
हा आठवडा खूप धावपळीचा गेला. अमितला विचार करायला फुरसत नव्हती. पण सुट्टीच्या दिवशी अमितच्या एक गोष्ट लक्षात आली की गेला आठवडाभर बँकेकडून एकही एसएमएस आला नव्हता. अकाउंट बॅलन्स सांगणारा विकली मेसेज सुद्धा नाही. अमितला वाटले बँकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असावा, म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
सोमवारी ऑफिसमध्ये असतानाच अमितला बँक रिलेशनशिप मॅनेजरचा फोन आला.
"हॅलो अमित पाटील बोलत आहात का? मी चेतन देशमुख बोलतोय XXXX बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर. तुमचा अकाउंट बॅलन्स झीरो झाला आहे. काही प्रॉब्लेम आहे का ?" त्याचे बोलणे ऐकून अमित थक्क झाला.
"अहो देशमुख मागच्याच आठवड्यात माझा पगार बँकेत जमा झाला आहे. कमीत कमी अडीच लाख बॅलन्स तरी असला पाहिजे. मी मागच्या सोमवारी तीस हजार विड्रॉ केल्यानंतर कुठलेही ट्रान्झेक्शन केले नाही. पैसे जर काढले गेले असतील तर मला बँकेकडून एसएमएस यायला हवे होते. पण मला गेल्या आठवड्यात एकही एसएमएस आलेला नाही."
बँकेतील अपडेटेड रेकॉर्ड्सवरून कळले त्याचे डेबिट कार्ड वापरून ऑनलाइन शॉपिंग, बिल पेमेंट वगैरे केले गेले आहे.
ही काय गडबड आहे ? अमितला समजत नव्हते. त्याने त्याची मैत्रिण, मितालीला फोन लावला. तिचे सायबर सिक्युरिटी वरील नॉलेज अद्ययावत होते. सर्व प्रकार तिला सांगितल्यावर मिताली ने विचारले. "तुला कार्ड डिटेल्स विचारण्याकरता कुठून फोन आला होता का ?"
"नाही मला असा कोणताही फोन आला नव्हता."
"तुझे कार्ड तुझ्या जवळच आहे ना ?"
"हो. .माझ्या वॉलेटमध्ये आहे."
"एकदा खात्री करून सांग." अमितने वॉलेट काढून पाहिले. कार्ड दिसले नाही. त्याने वॉलेटमधील सगळ्या वस्तू काढून पुन्हा चेक केले. कार्ड मिळून आले नाही. त्याला धक्का बसला.
"अगं मिताली. . . माझे कार्ड हरवलेले दिसतेय. मागच्या सोमवारी पैसे काढल्यावर मी वॉलेटमध्ये ठेवताना ते पडले असणार."
"याचा अर्थ तुझे कार्ड ज्याला मिळाले आहे त्याने तुला एसएमएस सोबत मालवेअरची लिंक पाठवली असणार. अशी लिंक क्लिक केल्यावर स्मार्टफोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होऊन एसएमएस हॅक होऊ शकतात. म्हणजे तुझ्या ऐवजी त्या हॅकरला बँकेकडून एसएमएस मिळत असणार आणि त्यातील ओटीपी वगैरे वापरून तो तुझ्या कार्डचा सर्रास वापर करत असणार."
"हं. . आता आठवलं. मला त्या दिवशी एक एसेमेस आला होता. डेबिट कार्ड वापरल्याबद्दल कॅशबॅक पॉइंट्स मिळवण्यासाठी एक लिंक ओपन करायला त्यामधे सांगितले होते. हे सिमकार्ड स्वॅपिंग आहे का ?"
"नाही. सिमकार्ड स्वॅपिंग मध्ये कुठला तरी नंबर डायल करायला लावून तुमचे सिमकार्ड काही वेळापुरते ब्लॉक करतात. तुझ्या सोबत जे झाले आहे त्याला एसएमएस हॅकिंग असे म्हणतात. आता तू लगेच तुझ्या बँकेला संपर्क करून तुझे डेबिटकार्ड ब्लॉक कर आणि मोबाइल माझ्याकडे घेऊन ये. मी क्लीन करून अँटी मालवेअर त्यात इन्स्टॉल करून देते. मग आपण दोघं मिळून सायबर सेलला कम्प्लेंट देऊ."
अमितने फोन डिस्कनेक्ट केला आणि हाफ डे टाकून तो ऑफिस बाहेर पडला.

©कविता दातार

No comments:

Post a Comment