Thursday 24 January 2019

डर्टी सिक्रेट

डर्टी सिक्रेट


रमेश डोळ्यांत प्राण आणून मोबाईलवरचा व्हिडीओ पाहण्यात मग्न होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा हा रोजचा परिपाठ झाला होता. ऑफिसमधून आल्यावर आवरून, रात्रीचे जेवण आटोपल्यावर पुढचे दोन तीन तास तो मोबाईल किंवा लॅपटॉपवर पॉर्न साइट्सवरचे व्हिडिओ पाहात रंगून जायचा. त्याला तसल्या साईटस सर्फ करण्याचे, त्यावरचे व्हिडीओ पाहण्याचे, क्वचित कधी तरी तिथे दिलेल्या लिंकवरून एखाद्या लेडी मेंबरची चॅटिंग करण्याचे व्यसन जडले होते. स्वतःला या सगळ्यांपासून दूर ठेवण्याचे खूपदा ठरवूनही त्याला ते जमत नव्हते.

रमेश पुण्यातील एका मोठ्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता. त्याची हुशारी, कार्यक्षमता आणि सरळ, साधा स्वभाव यामुळे तो त्याच्या सहकारी आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होता. चार वर्षांपूर्वी त्याची पत्नी रीमाचा कॅन्सरने मृत्यू ओढवला. एकुलती लेक राशी, आयआयटी पवईला इंजिनिअरिंग शिकत होती. रीमाच्या मृत्यूनंतरचे एकाकी आयुष्य रमेशला खायला उठायचे. दिवस तर कामात निघून जायचा. पण संध्याकाळी घरी आल्यावर त्याचा वेळ जात नसे. अशातच दुसरे कुठलेही व्यसन नसलेल्या रमेशला पॉर्न साईट बघण्याचे व्यसन लागले.

रात्रीचे साडेबारा वाजले. आता झोपावे नाहीतर उद्या ऑफिसला उशीर होईल, या विचाराने त्याने मोबाइलवर सुरू असलेला व्हिडिओ बंद केला आणि मोबाइल बाजूला ठेवला. अंथरूणावर पडणार तेवढय़ात ईमेल नोटिफिकेशन आले. कोणाचे मेल आहे ? बघावे, म्हणून त्याने मेलबॉक्स उघडला. अननोन सेंडरकडून आलेले मेल वाचत असताना त्याला घाम फुटला. मोबाइल धरलेले हात थरथरू लागले.

Hi Ramesh,
तू रोज ज्या पॉर्न साइट्स चवीने बघतो, त्या आम्हाला माहीत आहेत. तुझ्या सर्वात जास्त आवडीच्या साइटचा तुझा रजिस्टर्ड युजरनेम पासवर्ड आम्ही पाठवत आहोत, यासाठी की आम्हांला सर्व काही माहित आहे याची तुला जाणीव व्हावी. साइट बघतानाचे तुझे एक्स्प्रेशन्स सुद्धा आम्ही तुझ्या वेबकॅमवरून रेकॉर्ड केलेले आहेत. हे सर्व रेकॉर्ड म्हणजेच तुझे डर्टी सिक्रेट तुझ्या ऑफिसमधील सहकार्‍यांना आणि तुझ्या मुलीला आम्ही पाठवले तर काय होईल याचा विचार करावा. तसं काही व्हायला नको असेल तर, आम्हाला पाच हजार डॉलर्स बिटकॉइन्सच्या स्वरूपात खाली दिलेल्या लिंकवर दोन दिवसांत ट्रान्सफर करावे. धन्यवाद.
तुझा
एक हितचिंतक

ईमेल वाचल्यावर रमेशच्या तोंडचे पाणी पळाले. काय करावे ? त्याला समजत नव्हते. या बदनामी तून वाचण्यासाठी लगेचच पाच हजार डॉलर्स देऊन मोकळे व्हावे, असा एक विचार त्याच्या मनात आला. पण त्याआधी शेखर शी बोलावे असे त्याने ठरवले. शेखर त्याचा कलीग आणि फार जवळचा मित्र. तो त्याच्या कंपनीतील सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटचा इन्चार्ज होता. आता रात्र फार झाली आहे, उद्या त्याच्याशी बोलावे. असे ठरवून रमेशने झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याची झोप त्या मेल ने पुरती उडवली होती.

दुसऱ्या दिवशी शेखरला भेटून त्याने सर्व हकिकत काहीही आडपडदा न ठेवता सांगितली. त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन शेखरने बोलायला सुरुवात केली.
"रमेश. . पॉर्न साइट्स बघणं ठीक नाही हे तर नक्की. पण ज्याने तुला इमेल पाठवले आहे त्याच्याजवळ तुझे रेकॉर्डेड व्हिडिओ असतील असे वाटत नाही. कारण तुझा लॅपटॉप आणि मोबाइल मी स्वतः अँटी व्हायरस आणि अँटी मालवेअरने प्रोटेक्ट करून ठेवला आहे. त्यामुळे तुझ्या वेबकॅम एक्सेस करणे सोपे नाही. फार तर एखाद्या साइटवरील तुझा डेटा त्या ब्लॅकमेलर जवळ असू शकतो. कारण या पॉर्न साइट्स युजर्सच्या आवडी निवडीं बद्दल चा डेटा रेकॉर्ड करून ठेवतात. या वेबसाइटस् वरील युजर डेटा लीक करून हॅकर्स डार्क वेबवर काही हजारात विकतात. त्या डेटाच्या आधारे तुझी बदनामी कोणी करू शकेल असे मला तरी वाटत नाही. पण तुझा जवळचा मित्र म्हणून मी तुला एक गोष्ट जरूर सुचवीन की पॉर्न साइट्स बघण्याच्या या व्यसनातून बाहेर येण्यासाठी तू सायकिअॅट्रीस्टची जरूर मदत घ्यावी."

शेखरने सुचविल्यानुसार रमेशने पुण्यातील नामवंत सायकिअॅट्रीस्टची दोन महिने ट्रिटमेंट घेतली. त्यांनी दिलेल्या औषधांसोबत, उपचाराचा भाग म्हणून आपल्या घरातील इंटरनेट दोन महिने पूर्णतः बंद ठेवले. त्याबरोबरच चांगल्या साहित्याचे वाचन, मेडिटेशन आणि प्राणायाम यात आपले मन गुंतवले.

आज रमेश या पॉर्न साइट्स बघण्याच्या घाणेरड्या व्यसनातून पूर्णतः बाहेर येऊन एक सुखी जीवन जगत आहे.

©कविता दातार

2 comments:

  1. अतिशय छान कथा आहे
    आता या कथेतील पात्राला ही पॉर्न साईट बघायचे व्यसन कसे जडले हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल अलीकडच्या काळात मुख्यत्वे 10 वर्षाच्या काळात हा प्रकार डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे आयटी सेकटर चा वापर या अश्या पद्धतीने सुद्धा करतात हे आता लपून राहिलेले नाही

    दुसरा मुद्दा आर्थिक सुबत्ता अति हव्यास कॉर्पोरेट क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा टार्गेट कम्प्लिशन साठी कुठल्याही स्तरावर जाण्याची तयारी यामुळे येणारे फ्रस्ट्रेशन व भावनांची होणारी पायमल्ली कोंडमारा हि कारणे बव्हतांशी कारणीभूत आहे.
    रमेशची पत्नी वारल्यानंतर त्याला आलेले एकाकीपण घराला घरपण देणारी एका स्त्री ची अनुपस्थिती स्वतःच्या भावनांचा होणारा कोंडमारा हि सगळी कारणे कारणीभूत आहेत रमेशने जर योग्य स्थळ पाहून पुनर्विवाह केला असता तर हा प्रकार झाला नसता

    असो रमेश यातून विधायकरित्या बाहेर पडला हे खूप मह्त्वाचे आणि मुख्य म्हणजे त्याने धमकीला बळी न पडता मित्र शेखरशी केलेले विचारांचे शेअरिंग यामुळे एक अपघात होता होता वाचला असे म्हटले तर ते वावगे होणार नाही

    या अशा घटनांना रोखायचे असेल तर भावनांचे शेअरिंग महत्वाचे आहे

    बाय दी वे खूप छान कथानक नेटक्या शब्दात मांडणी
    खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. विस्तृत आणि विचारप्रवर्तक अभिप्रायाबद्दल खूपखूप धन्यवाद.

      Delete