Saturday, 5 January 2019

रॅन्समवेअर


१२ मे २०१७. सकाळचे साडेसहा वाजलेले. मोबाइलच्या आलार्मने अमिषाला नेहमी सारखी जाग आली. पटकन अंथरुणातून बाहेर येत तिने हातपाय ताणून आळस झटकला आणि बाथरूममध्ये शिरली. अमिषा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक करत होती. तिचे हे शेवटचे सेमिस्टर. त्याच्या प्रोजेक्टचा व्हायवा आणि प्रेझेंटेशन आठ दिवसांवर आले होते. भराभर आवरून तिने लॅपटॉप सुरू केला. प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या स्लाइड्सवर काही फायनल चेंजेस करायचे बाकी होते. लॅपटॉप सुरू झाल्यावर पासवर्ड टाकून ती विंडोज डेस्कटॉप स्क्रीनची वाट पाहू लागली.

पण हे काय ??? लॅपटॉपच्या स्क्रीनवर तर काही वेगळेच दिसत होते.

लाल बॅकग्राउंडच्या स्क्रीनवर पिवळ्या अक्षरांत एक मोठा मेसेज दिसत होता. "तुमचे डॉक्युमेंट्स, फोटोज, व्हिडिओज, डेटाबेस कुठलीही फाईल तुम्ही वापरू शकत नाही. कारण सर्व फाइल्स एनक्रिप्ट झाल्या आहेत. फाइल रिकव्हर करण्याच्या प्रयत्नांत वेळ घालवण्यात अर्थ नाही. फक्त आमची डिक्रिप्शन सर्व्हिस वापरूनच तुम्ही तुमच्या फाइल्स रिकव्हर करू शकता. त्यासाठी तुम्हाला तीन दिवसांत तीनशे डॉलर्स बिटकॉइन्सच्या स्वरूपात खाली दिलेल्या वेब अॅड्रेसवर द्यावे लागतील. तीन दिवसांत पेमेंट केले नाही तर सहाशे डॉलर्स लागतील. आणि सात दिवसांत तुमचे पेमेंट आले नाही तर तुमच्या फाइल्स कधीच रिकव्हर होऊ शकणार नाहीत." मेसेजच्या खाली एका वेबसाइटचा अॅड्रेस दिसत होता. आणि How to buy bitcoins? अशी एक लिंक दिसत होती. ती लिंक क्लिक केल्यावर एक वेबसाइट ओपन होत होती. तिथे तीनशे डॉलर्स भरून बिटक्वाइन मिळण्यासाठीचा इंटरफेस दिसत होता. अमिषाच्या लॅपटॉपवर रॅन्समवेअरचा हल्ला झाला आहे, हे समजायला तिला वेळ लागला नाही. तिच्या घशाला कोरड पडली. हातपाय बधीर झाले. स्वतःला सावरून ती विचार करू लागली. तिला आठवले, प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या गडबडीत तिने तिचे अँटीव्हायरस गेल्या आठवडय़ाभरात अपडेट केले नव्हते. त्यात इंटरनेट वरील सॅंपल प्रेझेंटेशन्स पाहण्याच्या नादात कुठल्या तरी अनसेक्युअर्ड वेबसाइटवरून पॉवरपॉइंट स्लाइड्स डाउनलोड केल्या होत्या. त्यातूनच रॅन्समवेअरचा हल्ला झाल्याची शक्यता दिसत होती. पण जे झाले त्यावर जास्त विचार न करता प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशनच्या फाइल्स कशा रिकव्हर कराव्या याचा ती विचार करू लागली. तिने पूर्ण प्रोजेक्टचा पेन ड्राइव्हवर बॅकअप घेऊन ठेवला होता. घरातल्या इंटरनेटशी कनेक्ट नसलेल्या कॉमन पीसीवर सुद्धा प्रोजेक्ट कॉपी करून ठेवला होता. पण प्रोजेक्ट रिपोर्ट आणि पॉवर पॉइंटमध्ये बनवलेल्या प्रेझेंटेशन स्लाइड्स मागच्या आठवड्यात गुगल ड्राइव्ह वर अपलोड केले होते. त्यानंतर त्यात बरेच बदल केल्याने ते जसेच्या तसे वापरता येणार नव्हते. त्यावर बरेच काम करावे लागणार होते. एकदा तिला वाटले तीनशे डॉलर्सच्या बिटकॉइन खरेदी करून या हॅकरला देऊन आपल्या सर्व फाइल्स रिकव्हर करून यातून सुटका करून घ्यावी, म्हणजे डोक्याला ताप नको. कारण पुन्हा रिपोर्ट आणि प्रेझेंटेशनवर काम करणे तिच्या जीवावर आले होते. त्यासाठी तिने गेले काही रात्रंदिवस एक केले होते. पण लगेच तिच्या मनात आले, तीनशे डॉलर्स म्हणजे जवळजवळ वीस हजार रुपये. का म्हणून आपण एवढे पैसे द्यायचे?? असे सहजपणे लोक पैसे देत गेले तर, असल्या असामाजिक तत्त्वांना प्रोत्साहन मिळून असे उद्योग वाढीस लागतील. नकोच. . . असा विचारही नको. आपण पुन्हा रात्रंदिवस एक करून आठवडाभरात प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन पूर्ण करू आणि आत्मविश्वासाने प्रोजेक्टच्या व्हायवाला सामोरे जाऊ. या विचारासरशी तिचे मन हलके झाले.

ठरवल्याप्रमाणे अमिषाने घरचा कॉमन पीसी इंटरनेटवर कनेक्ट केला. त्यावर अपडेटेड अँटी व्हायरस टाकून, दिवसरात्र मेहनत करून, गुगल ड्राइव्ह वरच्या जुन्या प्रोजेक्ट रिपोर्टवर आणि प्रेझेंटेशनवर काम केले. दरम्यान आपला लॅपटॉप सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट कडून रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. पण काही फाइल्स फक्त रिकव्हर झाल्या.

आज अमिषा मोठ्या आयटी कंपनीत सीनिअर असोसिएट आहे. मात्र दर दोन दिवसांआड ती आपल्या लॅपटॉपवरील अँटीव्हायरस अपडेट करते, इंटरनेटवरील फक्त सिक्युअर्ड वेबसाइट्स वर जाते, कुठल्याही माहित नसलेल्या सोर्सकडून आलेले ईमेल उघडत नाही आणि न चूकता रोज आपल्या डेटाचा बॅकअप घेउन ठेवते.

©कविता दातार

Friday, 7 December 2018

सावधान भाग ५

सावधान भाग ५


लिफ्टमधून बाहेर येऊन अमृताने तिच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटचे दार लॅच कीने उघडले. भराभर सगळे लाइट्स लावून, बेडरूमचा एसी चालू करून ती रेस्टिंग चेअरवर रिलॅक्स होऊन रेलली. डोळे मिटून ती आशुतोष बद्दलच्या विचारांत हरवली. "काय करत असेल अाशु? एव्हाना पोहोचला असेल का बंगलोरला?? उद्या त्याला आपल्या फ्लॅटचा ताबा मिळेल. पुढच्या विकेंडला जाऊया बेंगलोरला फ्लॅट बघायला म्हणजे इंटेरिअर डिझाइनर सोबत बोलून, ठरवून, लग्नाआधीच फ्लॅट डेकोरेट करून घेता येईल."

दोन वर्षांपूर्वी आशुतोष जोशीचे shubhvivah.com वरील प्रोफाइल पाहून अमृताने त्याला ईमेल केले. दोघेही एकमेकांना भेटले. दोन तीन भेटींतच दोघे एकमेकांना अनुरूप वाटले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. साधारणतः तिशीची अमृता साने, मुळची नाशिकची, कॉम्प्युटर सायन्समध्ये एमटेक झालेली, मोठ्या मल्टिनॅशनल आयटी कंपनीत सिस्टीम्स मॅनेजर, मुंबईतील पॉश एरियात भाड्याने वन बेडरूम फ्लॅट घेऊन राहत होती. तिचे वडील तिच्या लहानपणीच गेले. शिक्षिका असलेली आई अमृताच्या लहान भावाबरोबर नाशिकमध्ये राहात होती. बाळपणीच आईला पारखा झालेला, दिसायला अत्यंत देखणा आशुतोष त्याच्या वडिलांचा एकुलता मुलगा. बीटेक झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयआरएस ऑफिसर म्हणून बेंगलोरला पोस्टेड होता. त्याच्या वडिलांचा इम्पोर्ट एक्स्पोर्ट चा मोठा बिझनेस होता. त्यानिमित्त सध्या बऱ्यांच दिवसांपासून ते कॅनडा मधे रहात होते. दोन तीनदा प्रयत्न करूनही अमृताचा आणि तिच्या आईचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. आशुतोष मध्ये नाही म्हणण्यासारखे काहीच नसल्याने, अमृताच्या आईची या लग्नाला हरकत असण्याचे काहीही कारण नव्हते. फक्त एकदा तिला त्याच्या वडिलांना भेटायची इच्छा होती. पण या ना त्या कारणाने अजूनही त्यांच्या भेटीचा योग आला नव्हता.

गेल्या दोन वर्षांत आशुतोष सोबत घालवलेले सुंदर क्षण अमृताच्या मिटल्या डोळ्यांपुढे साकारत होते. गोड, आर्जवी बोलणे असलेला, हसरा आशुतोष पहिल्या भेटीतच तिच्या मनात भरला होता. बर्‍याचदा वीकेंडला अमृताला भेटण्यासाठी तो फ्लाइटने बेंगलोरहून मुंबईला यायचा. त्याच्यासोबत हॉटेलिंग, शॉपिंग, सिनेमा यांत दोन दिवस कसे जायचे तिला कळायचेही नाही. त्याच्या सोबत जागवलेल्या बेभान, धुंद रात्री आठवून आत्ताही तिच्या अंगभर रोमांच फुलले.

लग्न दोन महिन्यांवर आले होते. दोघांनीही कोर्ट मॅरेज करून अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना जंगी पार्टी द्यायचे ठरवले होते. भारी सॅलरी पॅकेज असलेल्या अमृताने आपल्या पगारातून स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी पहिल्यापासूनच पैसे बाजूला ठेवले होते. तिचे स्वतःचे घर - संसाराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. आशुतोषने बंगलोरला एका ब्रोकरच्या मार्फत दोन बेडरूम्स चा फ्लॅट बुक केला होता. नव्वद लाखांच्या फ्लॅटसाठी त्याने वीस लाख कर्ज काढून बाकीचे पस्तीस-पस्तीस लाख दोघांनी टाकायचे ठरवले होते. अमृताने परवाच बंगलोरमधील तन्मय गोस्वामी नावाच्या बिल्डरच्या अकाऊंटला पस्तीस लाख अॉनलाइन ट्रान्सफर केले होते.
भविष्याची सुंदर स्वप्ने रंगविणारी अमृता खूपच आनंदात होती. आकाशात उंच विहरणाऱ्या पक्षाप्रमाणे तिचे मन हलके झाले होते.

मोबाइलच्या रिंगने तिची तंद्री भंगली. बंगलोरहून के प्रसाद नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरचा फोन होता. तिने तन्मय गोस्वामी नावाच्या माणसाला पैसे ट्रान्सफर केले त्याबद्दल ते चौकशी करत होते. त्यासंदर्भात उद्या ते तिला भेटायला येणार होते. अमृता काळजीत पडली. तिला शंका आली, की ज्या बिल्डर तन्मय गोस्वामीला तिने पैसे ट्रान्सफर केले आहेत, तो फ्रॉड तर नाही? असे असल्यास आपले चांगलेच आर्थिक नुकसान होणार. तिने काळजीतच आशुतोषला फोन लावला. त्याचा फोन स्विच अॉफ आला. त्यानंतर वारंवार फोन लावूनही त्याचा फोन बंद असल्याचा ऑपरेटरचा मेसेज आला. अमृताच्या मनात आले, "आशूला काय झाले? तो कधीही फोन स्विच अॉफ ठेवत नाही. तो कुठल्या अडचणीत तर नसेल ना?" रात्रभर आशुतोषच्या काळजीने तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही.

सकाळी दहाच्या सुमारास इन्स्पेक्टर प्रसाद आपल्या दोन सहकार्‍यांसह तिच्या घरी आले.
"मॅडम तुम्ही तन्मय गोस्वामीला ओळखता का?" इन्स्पेक्टर प्रसादने तिला प्रश्न केला.
"नाही. त्यांना मी कधी भेटले नाही. पण ते बंगलोरचे मोठे बिल्डर आहेत. आमच्या फ्लॅटसाठी ची रक्कम मी त्यांच्या अकाऊंटला ऑनलाइन ट्रान्स्फर केली."
"तुम्हाला कोणी सांगितले ते बंगलोरचे बिल्डर आहेत म्हणून?"
"आशुतोष जोशी, म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याने."
"मग एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासही त्यांनीच तुम्हाला सांगितले असणार. ."
"हो. आशुतोषच्या सांगण्यावरुनच मी पस्तीस लाख तन्मय गोस्वामीच्या अकाऊंटला ट्रान्सफर केले."
"हम्म. ." इन्स्पेक्टर प्रसाद विचारात पडले. पुढच्याच मिनिटाला त्यांनी खिशातून एक फोटो काढून तिच्यासमोर धरला आणि विचारले,
"हा तुमचा होणारा नवरा आहे का?"
"हो हा आशुतोषचा फोटो आहे. पण त्याचा फोटो तुमच्या जवळ कसा?"
"मॅडम, हा आशुतोष जोशी नसून तन्मय गोस्वामी आहे."
"काही तरी काय बोलताय इन्स्पेक्टर?" अमृता रागाने म्हणाली.
"सॉरी मॅडम पण हे खरे आहे. मॅट्रीमोनी साइटवर स्वतःचे प्रोफाइल अपलोड करून, त्यावर खोटी माहिती टाकून, आयआरएस ऑफिसर असल्याचे भासवून, त्यासाठीचे बनावट आयडी कार्ड वापरून, उच्चशिक्षित, हाय प्रोफाइल मुलींना हेरून, आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा त्याचा धंदा आहे. त्याच्याविरुद्ध चार मुलींच्या कम्प्लेन्ट्स आहेत. तो फरार आहे आणि पोलिस त्याच्या शोधात आहेत."

इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून अमृताच्या पायाखालची जमीन सरकली. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला. त्या धक्क्याने तिला भोवळ आली आणि ती जमिनीवर कोसळली.

अमृता शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये होती. तिच्या उशाशी तिची आई बसली होती. सर्व प्रसंग आठवून ती ओक्साबोक्शी रडू लागली. एवढी उच्चशिक्षित, हायप्रोफाइल मुलगी मात्र एका बहुरूपी नराधमाने तिचे तन मन धन सर्वच लुटले होते.

*****

प्रिय वाचक,
ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. २०१४ ते २०१६ या दरम्यान तन्मय गोस्वामी नावाच्या व्यक्तीने आठ मुलींची या प्रकारे फसवणूक करून त्या सगळ्यांचे एकूण दीड कोटी रुपये लुबाडले. मॅट्रीमोनी साइटवर खोटे प्रोफाइल तयार करून, तिशीतल्या, अविवाहित, हाय प्रोफाइल, एकट्या राहणार्‍या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करणे ही त्याची मोडस ऑपरेंडी होती.

मॅट्रिमोनी साइटवरील दहापैकी सात प्रोफाइल बनावट असतात, असे मुंबईतील एका प्रसिद्ध सायबर कायदे तज्ज्ञाचे मत आहे. तेव्हा अशा साइटस् द्वारे लग्न ठरवताना शक्य तेवढी काळजी घेणे आवश्यक आहे.

*****

©कविता दातार

Friday, 30 November 2018

सावधान भाग ४

सावधान भाग ४


मेघा आज विशेष उत्साहात होती. तिचे आणि समीरचे दुबई ला जाण्यासाठीचे एअर तिकीट आणि व्हिसा तिच्या मेलवर ट्रॅव्हल कंपनीकडून आजच आला होता. आठवडाभरापूर्वीच बँकेकडून कुरियरमार्फत नवे चिप बेस्ड डेबिट कार्ड तिला मिळाले होते. एटीएमवर जाऊन तिने त्याचा पीन सेट करून त्याला अॅक्टिवेट देखील केले होते. सेट केलेला पीन तिने कार्ड कव्हर वर व्यवस्थित (!) लिहून ठेवला. कार्डवरची स्पेंडिंग लिमिट पाहूनच तिने आपली शॉपिंग लिस्ट बनवली. मोठ्या उत्साहाने ती प्रवासाच्या तयारीला लागली.

दुबईत पोहोचल्यावर सिटी टूर, डेझर्ट सफारी वगैरे झाल्यावर टुर गाईड सोबत सर्वजण ग्लोबल व्हिलेजमध्ये आले. तिथे प्रत्येक देशाचा एक स्टॉल होता आणि त्यावर त्या देशातल्या विशेष वस्तू आणि खाद्यपदार्थ विकायला ठेवले होते. तिथे भारताच्या स्टॉलवर गाय वासराची एक सुंदर पितळीची मूर्ती मेघाला खूप आवडली आणि तीने ती खरेदी केली. मूर्तीची किंमत जास्त असल्याने आणि तेवढे डरहॅम तीच्या जवळ नसल्याने तिने तिच्या डेबिट कार्डने पेमेंट केले. स्टॉलवरून बाहेर पडताना एका चायनीज मुलीचा तिला धक्का लागून तिच्या हातातले सामान खाली पडले. दिलगीरी व्यक्त करून ती मुलगी तिच्या बरोबर खाली वाकून तीचे सामान गोळा करू लागली आणि नंतर तिथून निघून गेली. रात्रि हॉटेलवर पोहचल्या वर तिच्या लक्षात आले की तिच्या मोबाइलवर इंटरनॅशनल रोमिंग नसल्याने बँकेकडून कुठलाही अलर्ट मेसेज तिला येऊ शकणार नव्हता. तिने ही गोष्ट समीरला सांगितली पण त्यावर फार विचार न करता टूर एन्जॉय कर असे त्याने तिला समजावले.

चार दिवसांचा दुबई टूर मस्त एन्जॉय करून दोघेही मुंबईत परतले. मुंबईत आल्याच्या दुसऱ्या दिवशी समीर अॉफिसला गेल्यावर तिने लॅपटॉप उघडून आपल्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट पाहीले आणि तिला धक्का बसला. टूरवर जाण्याआधी अकाउंटमधे सव्वाचार लाख रुपये बॅलन्स होता आणि आता बँकेचे स्टेटमेंट केवळ दीड लाख बॅलन्स दाखवत होते. एवढी तर तीने खरेदी केली नव्हती. तिने स्टेटमेंट नीट बघितले. पावणे तीन लाख रुपये डेबिट कार्डने पे केलेले दिसत होते. तिने हिशोब लावला साधारणतः एक लाखाची तिने खरेदी केली होती. मात्र हे पावणे दोन लाख रुपये कुठेही खर्च केलेले तिला आठवत नव्हते. मेघाने बँकेत जाऊन तपास लावण्याचे ठरवले. बँकेतील अधिकाऱ्याने तिला सांगितले की हे पैसे दुबई मॉल मधे तिचेच डेबिटकार्ड वापरून खर्च केले गेले आहेत. यापेक्षा जास्त माहिती तो सांगू शकला नाही. मेघाला दुबई मॉल मधे काही खरेदी केल्याचे आठवत नव्हते. तिने समीरला फोन लावला आणि सगळं सांगून विचारलं,
"समीर, अरे तु दुबई मॉल मधे माझे डेबिट कार्ड वापरुन काही खरेदी केलं आहेस का?"
"माझ्याजवळ माझे कार्ड असताना मी कशाला तुझे कार्ड वापरेन?? ते ही तुला न सांगता? काहीतरी काय??"
समीरने चिडून म्हंटले.
"चिडू नकोस ना. मी फक्त खात्री करण्यासाठी विचारले."
रडकुंडीला येऊन मेघा म्हणाली.
"ठीक आहे. . तू काळजी करू नकोस. . मी शॉर्ट लिव्ह घेऊन लवकर घरी येतो. मग आपण माझ्या सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट असलेल्या मित्राकडे जाऊन काय करता येइल ते बघू."
एवढे बोलून त्याने फोन ठेवला. मेघाच्या मनाला थोडी उभारी आली. पण तिची बैचेनी कमी झाली नाही. ती संध्याकाळ केव्हा होते याची वाट पाहू लागली.

संध्याकाळी समीर आल्यावर दोघेही त्याच्या सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट असलेल्या जॉय विल्सन नावाच्या मित्राच्या ऑफिसला आले. जॉयला सर्व हकीकत सविस्तर पणे सांगून काय करता येईल असे समीरने विचारले. थोडा वेळ विचार करून, लॅपटॉपवर काही सर्च करून जॉयने मेघाला विचारले "कार्ड वापरून शॉपिंग केल्यावर कोणी तुमचे कार्ड घेतले होते का? किंवा तुमच्या फार जवळ आले होते का ?" मेघाला कळेना कि हा असे का विचारतो आहे? मग तिला एकदम आठवले आणि ती म्हणाली, "हो एक चायनीज मुलगी मला येउन धडकली होती. त्यामुळे माझ्या हातातील सामान खाली पडले आणि तिने ते माझ्याबरोबर खाली बसून उचलून दिले" हे ऐकून जॉय म्हणाला. "ती चायनीज मुलगी नक्कीच हॅकर असणार. तुमच्या सामानासोबत कार्डही खाली पडले असणार. तिने त्यावरचा पीन पाहून लक्षात ठेवला असणार आणि तिच्या जवळच्या वायफाय अॅडॉप्टरच्या सहाय्याने तुमचे डेबिट कार्ड डिटेल्स चोरले असणार. नंतर ते डिटेल्स ब्लँक प्लॅस्टिक कार्डवर कॉपी करून दुबई मॉल मधे शॉपिंग केली असणार. सर्व परिस्थिती पाहता सायबर गुन्हेगाराचा माग काढणे आणि तुमचे पैसे परत मिळणे कठीण दिसतेय. कारण गुन्हा आपल्या देशात घडला नसून दुसऱ्या देशात घडला आहे आणि गुन्हेगार तिसर्‍याच देशातला आहे. ही घटना घडूनही तीन चार दिवस होऊन गेले आहेत. तरी मी जमतील तसे प्रयत्न करतो." यापुढे शक्य ती काळजी बाळगण्याचे मनाशी ठरवून जॉयचा निरोप घेउन मेघा समीर तिथून बाहेर पडले.

जॉयने सांगितल्याप्रमाणे वायफायचे चिन्ह असलेले नवीन चीप बेस्ड डेबिट आणि क्रेडिट कार्ड आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेन्टिफिकेशन) एनेबल्ड असते. त्यामुळे वायफाय असलेल्या ठिकाणी कार्ड रीडरमध्ये स्वाइप न करता फक्त टॅप केले तरी चालते. एवढेच काय एखादा हॅकर तुमच्या सहा सात इंच जवळ आल्यावरही तुमच्या कार्डचे डिटेल्स आरएफआयडी मुळे वायफाय अॅडॉप्टर वापरून हॅक करू शकतो. मात्र ते डिटेल्स वापरून तो कुठलेही एकच ट्रान्जेक्शन करू शकतो. कारण आरएफआयडी च्या द्वारे पास झालेला कोड दरवेळेस वेगळा असतो. हे टाळण्यासाठी तुम्ही आपले कार्ड ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून सोबत बाळगू शकता किंवा आरएफआयडी ब्लॉकिंग वॉलेट कुठल्याही शॉपिंग साइटवरून किंवा दुकानातून खरेदी करून वापरू शकता. तेव्हा सावधान आणि सुरक्षित राहून नवीन टेक्नोलॉजी चा वापर करा.

© कविता दातार

Friday, 23 November 2018

सावधान भाग १

सावधान भाग १

प्रसंग १

मोहिनीने मेलबॉक्स उघडला. तिच्या बँकेकडून आलेले मेल दिसत होते. त्यात एक लिंक दिली होती. बँकेच्या नेट बँकिंग अॅप ची ती लिंक होती. लिंक क्लिक करून ते अॅप मोहिनीने मोबाइल वर इंस्टॉल केले. चेक करून पाहण्यासाठी अॅप ओपन करून तिने आपला कस्टमर आयडी आणि पासवर्ड देऊन  सबमिट बटन क्लिक केले. त्याबरोबर तिचा मोबाइल हँग झाला. रिसेट करून मोबाइल सुरू केल्यावर  बँकेकडून साठ हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज तिला आला. बर्‍याचदा हॅकर्स बँकेच्या इमेल आयडीशी मिळता-जुळता
इमेल आयडी वरून लोकांना इमेल पाठवून फसवणूक करतात.

प्रसंग २

सकाळी १० च्या सुमारास समीरला एक फोन कॉल आला. एक्सवायझेड सिक्युरिटीज मधून बोलत असल्याचे आणि आजचा दिवस शेअर ट्रेडिंग, ब्रोकरेज फ्री असल्याचे पलीकडील मुलीने गोड आवाजात सांगितले. ट्रेडिंग करण्यासाठीचे अॅप तिने त्याला मेलद्वारे पाठवले. समीरने ते इंस्टॉल केले.  समीरचे एक्सवायझेड बँकेत डिमॅट अकाऊंट होते. त्या अॅपमध्ये त्याच्या डिमॅट अकाउंटचे डिटेल्स दिसत होते. शेअर खरेदी करण्यासाठी लिंक दिसत होती. तरीही खात्री करुन घेण्यासाठी त्याने बँकेत फोन केला. तेथील अधिकार्‍याने ब्रोकरेज फ्री अॉफर नसल्याचे सांगितले. वेळीच समीरने खात्री करून घेतल्याने त्याची आर्थिक फसवणुक टळली.

बनावट अॅप्सपासून सावधान रहा. गुगल प्लेस्टोअर किंवा  आयओएस अॅप स्टोअर या सारख्या खात्रीच्या स्रोतांवरूनच कुठलेही अॅप इन्स्टॉल करून वापरा.

©कविता दातार

सावधान भाग २

सावधान भाग २

रीना लग्न होउन मुंबईत येउन वर्ष उलटलं होतं. तिचे एमसीए पर्यंत शिक्षण झाले होते. इंटरनेट वरील एका जॉब पोर्टलच्या माध्यमातून तिने पाच सहा कंपन्यांमधे नोकरीसाठी अप्लाय केले होते. काही दिवसांनी तिला एका नावाजलेल्या कंपनीकडून (??) ईमेल आले. ईमेलनुसार रीना त्या कंपनीत ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर  या पदासाठी निवडली गेली होती. सिक्युरिटी म्हणून तिचे डेबिट कार्ड डिटेल्स  कंपनीला हवे होते. बर्‍याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या रीनाला या बातमीमुळे खूपच आनंद झाला. फारसा विचार न करता तिने आपल्या डेबिट कार्डचे डिटेल्स त्या मेल आयडी वर पाठवले. तासाभरात तिला एक फोन आला. फोनवर बोलणारी मुलगी अत्यंत आर्जवी स्वरात पाचशे रुपये प्रोसेसिंग चार्जेस तिच्या डेबिट कार्ड वरून वळते करण्यासाठी परवानगी मागत होती. त्यासाठी जो ओटीपी तिच्या मोबाइल वर येइल तो पाठवण्याची तिने विनंती केली. रीना ला माहीत होते कि कोणाशीही कार्ड डिटेल्स आणि ओटीपी कधी शेअर करू नाही. पण तिला चालून आलेली नोकरीची संधी सोडावी वाटत नव्हती. तिने बँकेकडून आलेला ओटीपी ज्या नंबरवरून कॉल आला होता त्यावर  एसएमएस करून पाठवून दिला. थोड्याच वेळात तिच्या अकाऊंट मधले तीस हजार रुपये डेबिट झाल्याचा एसएमएस तिला आला. तिने लगेचच थोड्या वेळापूर्वी आलेल्या फोनवर फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला पण तो फोन बंद होता. तिला स्वतःच्या मूर्खपणावर खूप राग आला. अचानक तिला कुठेतरी वाचल्याचे आठवले की आरबीआयच्या नव्या नियमा नुसार डेबिट/क्रेडिट कार्ड फसवणुकीमुळे झालेले ग्राहकांचे नुकसान तीन दिवसांच्या आत बँकेत रिपोर्ट केल्यास बँकेकडून १००% नुकसान भरपाई मिळते. त्याप्रमाणे लगोलग ती बँकेत जायला निघाली. बँकेतील अधिकाऱ्याने सांगितले तुम्ही ओटीपी स्वतःहून दिला असल्यामुळे आम्ही हे नुकसान भरून देऊ शकत नाही.

बऱ्यांच प्रसंगांत असे होते की सुजाण, सुशिक्षित, लोकांना सर्व काही माहित असते जसे डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स, ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. नुकसान झाल्यास सायबर सेलला कम्प्लेंट करून बँकेत रिपोर्ट करावा म्हणजे नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच कुठलीही कंपनी तुम्हाला नोकरी देताना तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही किंवा तुमची कार्ड डिटेल्स मागत नाही.  पण परिस्थितीवश किंवा काही कारणाने त्यांच्या हातून अशा चुका घडतात आणि ते आर्थिक फसवणुकीला बळी पडतात.

यावर एक उपाय असा करता येइल कि आपण ज्या अकाऊंटद्वारे नेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंट करतो. त्या अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स ठेवावा म्हणजे नुकसान जरी झाले तरी त्याची तीव्रता कमी असेल. काही ठिकाणी डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याची सुरक्षित रक्कम मर्यादा जास्त असल्यामुळे नुकसान कमी होते. तसेच क्रेडिट कार्ड चोरी झाल्यास त्यानंतर त्याच्याद्वारे होणार्‍या व्यवहारांची जबाबदारी  कार्डधारकाची नसते. मात्र बँकेच्या हेल्पलाईनवर आणि सायबर सेलला चोरीची कंप्लेंट दिली गेली असावी.

©कविता दातार

सावधान भाग ३

सावधान भाग ३
आशाताई. . वय वर्षे सदुसष्ट. वयाच्या मानाने खूपच अॅक्टिव्ह, अलर्ट, पॉझिटिव्ह. सतरा वर्षांपूर्वी एकुलत्या मुलगा आणि सुनेचा रस्ता अपघातात झालेला अकाली मृत्यू त्यांना मुळापासून हादरवून गेला. पण पाच वर्षांच्या शाल्मली कडे पाहून त्यांनी आपले आभाळाएवढे दुःख गिळले. आणि तिच्या संगोपनात स्वतःला झोकून दिले. आता शाल्मली बीटेक, एमबीए होऊन मुंबईत मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतेय.
व्हॉट्सअॅपच्या नोटिफिकेशन साउंड ने आशाताई भानावर आल्या. त्यांनी हातातले पुस्तक बाजूला ठेवले आणि मोबाइल उचलला. कुठला तरी नवाच नंबर दिसत होता पण प्रोफाईल फोटो मात्र शाल्मलीचा होता.
"हाय आज्जी. ."
"अग हा कुठला नंबर आहे ?"
"मी म्हटले होते ना, ड्युएल सिम मोबाइल आहे तर जीओचे अजून एक सीम घेते. त्यावरून कॉलींग स्वस्त पडतं. त्यावरूनच तुला मेसेज करतेय. कशी आहेस?"
"मी छान आहे गं. . पण आजकाल तुझा आवाज दुर्लभ झालाय. . मला माहित आहे तुला खूप काम असतं, पण कधीतरी आजीसाठी थोडा वेळ काढावा की. . "
"हो ग एकदा हे प्रोजेक्ट संपलं ना कि मी जरा मोकळी होईन. मग नाशिकला २ -३ दिवस तुझ्याकडे येईन तेव्हा खूप गप्पा करूया. बरं ऐक ना. . मला ओनर ने फ्लॅट रीकामा करायला सांगितलं आहे. मी नवी जागा बघितली आहे पण डिपॉझिट दीड लाख म्हणताहेत. आता मी तिथूनच बोलतेय. लगेचच ही जागा फायनल करावी लागेल. नाहीतर कुठे रहायचे प्रश्न आहे. माझ्याजवळ सध्या एवढे पैसे नाहीत. सॅलरीची वाट बघत बसले तर ही जागा हातची जाईल. तु दीड लाख लगेच ट्रान्सफर करतेस का? नाहीतर तुझे कार्ड डिटेल्स दे. ते वापरून ऑनलाइन पेमेंट करते मी या फ्लॅटच्या ओनर ला."
"हं थांब. .कार्ड कुठे ठेवलं बरं मी. . हं आठवलं. . पर्स मधे ठेवलं होतं. .हं घे लिहून. . 4212xxxxxxxx7654. कार्डवरचे नाव आशा दीक्षित. एक्स्पायरी डेट 12/23. सीव्हीव्ही 911. एवढ्याने काम होईल ना? फ्लॅट नीट बघून घे. सर्व सोयी आहेत ना ? याची खात्री करून घे आणि डील झाल्यावर मला कळव. "
"थॅंक्स माय डियर आज्जी. . तुझ्या फोनवर एक ओटीपी येईल तो मला या नंबरवर लगेच फॉरवर्ड कर. मी पळते. I will catch you later....Byeee !!"
शाल्मली ऑफलाइन झाली. आशाताईंनी हसून फोन खाली ठेवला. फोनवर आलेला ओटीपी त्यांनी लगेच शाल्मलीच्या नव्या नंबर वर फॉरवर्ड केला. थोड्या वेळाने त्यांना परत मेसेज आल्याचा साउंड आला. "शामुने ओनरला पैसे ट्रान्सफर केले असणार." असे मनाशी म्हणून मेसेज न पाहताच बाजूला ठेवलेले पुस्तक त्यांनी उचलले.
संध्याकाळचे साडेसहा वाजले. फिरण्यासाठी म्हणून त्या बाहेर निघणार एवढ्यात मोबाइल वाजला. त्यांनी फोन उचलला. पलीकडून शाल्मली बोलत होती.
"काय गं ! पैसे दिलेत का ओनरला? केव्हा शिफ्ट होतेय नव्या जागेत ?" त्यांनी विचारले.
"कुठली नवी जागा?? कशा संबंधी बोलतेयस तु?" शाल्मलीने गोंधळून विचारले.
"अगं मघाशी नाही का आपण व्हॉट्सअॅपवर बोललो?? तुझ्या नव्या नंबरवरून? तुला मी माझे कार्ड डिटेल्स दिले. तुला दीड लाख रुपये लवकरात लवकर ओनरला ट्रान्स्फर करायचे म्हणलीस नवी जागा घेण्यासाठी."
"आजी बरी आहेस ना तू? मी आज दोन दिवसांनंतर तुझ्याशी बोलतेय. आणि माझा ह्या नंबर व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नंबर नाही आहे. तू कोणाला दिलेस कार्ड डिटेल्स ??"
आशाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी शाल्मलीला सर्व घटनाक्रम सांगितला. शाल्मली अवाक झाली. तिने त्यांच्याकडून ज्या नंबरवरून व्हाॅटस्अॅप मेसेजेस आले तो नंबर मागितला. त्यांनी फोन बंद केला आणि व्हॉट्सअॅपवरून शाल्मलीला तो नंबर पाठवला. मघाशी आलेला बँकेकडून चा मेसेज त्यांनी बघितला. त्यांच्या अकाऊंटमधून चार लाख डेबिट झाले होते. आशाताईंना स्वतःच्या मुर्खपणाचा खूप राग आला. अगतिकतेने त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. खूप मोठा आर्थिक फटका त्यांना बसला होता. स्वतःही त्यांनी त्या नंबरवर दोन तीनदा कॉल केला पण हा नंबर अस्तित्वात नाही असा त्यांना रिप्लाय मिळाला. त्यांनी बँकेच्या हेल्पलाइनला फोन करून सर्व डिटेल्स देऊन काही करता येत असल्यास करण्याची विनंती केली. पण त्यांनी स्वतःच ओटीपी फॉरवर्ड केल्याने हेल्पलाइन ऑपरेटरने त्यांना पैसे परत मिळणे कठीण असल्याचे सांगितले. तरी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आशाताईंना त्या आश्वासनातील फोलपणा जाणवला.
शाल्मलीने सुद्धा बँक हेल्पलाइनला फोन केला. सायबर सेलला ऑनलाइन कम्प्लेंट दिली. कम्प्लेंट ची कॉपी घेऊन दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन सर्व घटना सांगून पैसे परत मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. एका सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटचीही मदत घेतली. त्याने दिलेल्या माहितीनुसार कार्ड डिटेल्स चा उपयोग करून सायबर चोराने ऑनलाइन ज्वेलरी विकत घेतली होती. ज्या सीमकार्डवरून आशाताईंना मेसेजेस आले होते ते सिमकार्ड दादर मधील एका दुकानातून शाल्मलीच्या नावानेच खरेदी केले गेले होते. दोन महिन्यांच्या तपासाअंती सुद्धा अजूनपर्यंत सायबर गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला नाही.
हा घटनाक्रम पाहता एक खूणगाठ प्रत्येकाने लक्षात ठेवावी कि कुठल्याही परिस्थितीत आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स फोन किंवा इमेल वरून अगदी आपल्या जवळच्या माणसांशीही कधीही शेअर करू नये. तसेच आपले आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे कागदपत्रं कुठे द्यायचे झाल्यास त्यावर तारीख आणि कशासाठी देत आहात ते लिहून सही करावी. म्हणजे पुनःपुन्हा त्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही.

©कविता दातार

Tuesday, 2 October 2018

इंटरनेट वरील अर्थार्जनाचे मार्ग

#WorkFromHomeThruNet
#इंटरनेट वरील #अर्थार्जनाचे_मार्ग


इंटरनेट हे माहिती आणि मनोरंजनाचा खजिना हे आपणां सर्वांना माहितच आहे. याबरोबरच इंटरनेट वापरून आपण अर्थार्जन देखील करू शकतो हेही तुम्हांला ऐकून माहीत असेल. इंटरनेटवर अर्थार्जनाचे भरपूर मार्ग उपलब्ध आहेत जसे,

-#फ्रिलान्सर
तुम्ही  प्रोग्रामर, डिझायनर, मार्केटर, अकाउंटंट, कंसल्टंट, लेखक किंवा काहीही असलात तरी तुम्हाला इंटरनेटवरील फ्रीलान्सिंग वेबसाइट्सवर भरपूर काम उपलब्ध आहे. फ्रीलान्सर म्हणून काम देणाऱ्या काही विश्वासार्ह वेबसाइट्स. . .
Upwork.com
Elance.com
Freelancer.com
Guru.com
99designs.com
या साइट्सवर तुमचे आकर्षक प्रोफाइल बनवून, तुम्ही जे जे काही करू शकतात ते सर्व पर्याय निवडून ठेवल्यास तुम्हाला  नक्कीच काम मिळू शकते.  माझ्या परिचयातील एका मुलीने पुण्यातील नोकरी गमावल्यावर  Upwork या साइटच्या माध्यमातून वेब डिझाइनिंग करून अवघ्या वीस दिवसांत पंधराशे डॉलर्स कमावले. तुम्ही उत्तम चित्रकारी करत असाल तर 99designs या साइटवर  तुम्हाला खूप काही करण्यासारखे आहे.

- फ्रीलान्सर म्हणून काम करण्यासाठी तुम्ही खूप वेळ देऊ शकत नसाल तर काही छोटी कामे सुद्धा काही साइट्सवर उपलब्ध आहेत. जसे मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर करणे, स्कॅन केलेल्या पुस्तकातील उतारे टाइप करणे, कपड्यांचे डिझाइन्स बनवणे, लोगो डिझाइन्स, डेटा एन्ट्री वगैरे. यासाठी तुम्हाला कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ५० डॉलर्स मिळू शकतात आणि कुठलीही बांधिलकी न ठेवता तुम्ही जमेल तेव्हा काम करू शकता. अशी छोटी कामं देणाऱ्या साइट्स पैकी काही लोकप्रिय साइट्स आहेत
mturk.com (Amazon's mechanical turk)
fiverr.com
peopleperhour.com
या साइट्स म्हणजे कमी अवधीत काम करणाऱ्या आणि करवून घेणाऱ्या लोकांच्या मार्केट प्लेसेस आहेत.

- तुम्ही डॉक्टर, डायटिशियन, सायकॉलॉजिस्ट, शिक्षक किंवा समुपदेशक  असाल तर तुमच्या #लेक्चर्स_टिप्स आणि #सल्ल्यांचे_व्हिडिओज बनवून लिंकच्या स्वरूपात लोकांना उपलब्ध करून पैसे मिळवू शकता. हे सर्व कसे करायचे हे समजून घेण्यासाठी या विषयातील सल्लागारांची मदत घेता येइल.
-  वरील प्रमाणे व्हिडिओज बनवून यूटय़ूबवर (YouTube.com) अपलोड करता येतील. यासाठी फक्त तुमचे जीमेल अकाऊंट असणे गरजेचे आहे. व्हिडिओ सोबत जाहिराती दाखविल्यास जाहिरातदारांकडून यूट्यूबला पैसे मिळतात व त्यातील चोपन्न टक्के भाग व्हिडिओ ज्याने अपलोड केला आहे त्याला दिला जातो. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या अर्चना हेब्बर यांनी तेथे सॉफ्टवेअर टेस्टींगमध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना नोकरी मिळाली नाही. मग वेळ जाण्यासाठी म्हणून त्यांनी साऊथ इंडियन खाद्यपदार्थांचे ब्लॉग्ज लिहिणे सुरू केले. मैत्रिणीच्या सांगण्यावरून खाद्यपदार्थ बनवण्याचा व्हिडिओ बनवून त्यांनी यूट्यूबवर टाकला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज त्यांचे हेब्बर किचन या नावाचे यू ट्यूब चॅनेल सुप्रसिद्ध आहे आणि त्या लाखों रुपये कमवत आहेत.

- Meesho, Sello, InstaShop, SocialShopWave या आणि अशा काही #अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकांशी जोडले जाऊन त्यांना #ऑनलाइन_शॉपिंग उपलब्ध करून देऊ शकता. हा पर्याय वापरून अनेक गृहिणी घरबसल्या महिन्याला हजारो रुपये कमवत आहेत.

- #फेसबुक_पेज बनवून ते प्रमोट करून (पेजची जाहिरात करून, (हा पर्याय फेसबुकवर उपलब्ध आहे) ) त्यावर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या प्रोडक्ट लिंक्स उपलब्ध करून त्या लिंक्स बघणाऱ्यांनी क्लिक केल्यास आणि त्यावरून खरेदी केल्यास शॉपिंग वेबसाइट तुम्हाला चार ते दहा टक्के कमिशन देते. या प्रकाराला अफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात.

- फेसबुक पेज, इन्स्टाग्रामवर प्रोडक्ट रिव्ह्यूज लिहून सुद्धा ते प्रॉडक्ट विकणाऱ्या शॉपिंग साइट कडून तुम्हाला कमिशन मिळू शकते. यासाठी मात्र लेखन कौशल्याबरोबरच त्या प्रॉडक्टची माहिती असणे जरुरीचे आहे.

- तुमचे लेखन कौशल्य वापरून तुम्ही एखाद्या #स्टार्टअप किंवा #वेबसाइटसाठी_लेखकाचे काम करू शकतात. याला कंटेंट रायटिंग असे म्हणतात. कन्टेंट रायटर्स ला इंटरनेटवर बऱ्यापैकी मागणी आहे. एक चांगला कंटेंट रायटर प्रत्येक आर्टिकल साठी ५००० ते २०००० रुपये घेतो.

- तुम्ही एखाद्या विषयात निष्णात असाल आणि तुमचे लेखन कौशल्य चांगले असेल तर तुम्ही #स्वतःची_वेबसाइट सुरू करून त्यावर #ब्लॉग लिहू शकतात. त्या ब्लॉग सोबत प्रोडक्ट लिंक्स जोडून अँफिलिएट मार्केटिंग करून बर्‍यापैकी पैसे कमवता येतात. मात्र यासाठी किमान पंधरा हजारांची सुरुवातातीला गुंतवणूक करावी लागते. तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि काही महिने किंवा एक दोन वर्षे वाट बघून मग कमाई सुरू होते. या कमाईत सातत्य असून हे तुमचे स्वतःचे रचनात्मक काम असते. अमित अग्रवाल, अर्चना दोषी, प्रदीप गोयल हे भारतातील काही सुप्रसिद्ध ब्लॉगर लाखो रुपये महिना कमावतात. सौंदर्य, आरोग्य, पाककला, गुंतवणूक, तंत्रज्ञान या विषयांवरील ब्लॉग्ज लोकप्रिय ठरतात.

- तुम्ही #डिझायनर असल्यास स्वतः डिझाइन केलेले कपडे, ज्वेलरी, शो पीसेस अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या अॉनलाइन शॉप वर विकायला ठेवू शकता किंवा स्वतःचे डिजिटल स्टोअर (स्टार्टअप) सुरू करू शकतात. डिजिटल स्टोअर सुरू करण्यासाठी सुरुवातीला बऱ्यापैकी गुंतवणूक आणि मेहनतीची तयारी हवी.

गृहिणी, अर्थार्जनाची गरज असलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींनी या पर्यायांचा विचार करण्यास हरकत नाही.

काही कारणाने नोकरी गमावलेल्या, दुर्दैवाने अपघातामुळे किंवा आजारपणामुळे घरी बसावे लागलेल्या लोकांनी निराश न होता या सर्व पर्यायांचा जरुर विचार करावा.

©कविता दातार