Tuesday 12 December 2017

डेबिट/ क्रेडिट/एटीएम कार्ड फसवणूक

डेबिट/ क्रेडिट/एटीएम कार्ड फसवणूक

१) सुलभा एक मध्यमवयीन स्त्री. पतीच्या पश्चात सुमेधाला तिनेच मोठे केले होते. उदरनिर्वाहासाठी सुलभा खानावळ आणि मुलींचे  वसतिगृह चालवत असे. सुमेधाचे लग्न पंधरा दिवसांवर आले होते. सुलभाची जोरात तयारी सुरू  होती. लग्नासाठी म्हणून तिने बँकेतल्या ठेवी मोडून आपल्या सेव्हिंग अकाऊंट ला सगळे पैसे जमा केले होते.  कपड्यांच्या खरेदीला जायचे असल्याने आज सकाळपासून तिची घाई गडबड सुरू होती. १० वाजताच्या सुमारास एक फोन आला."नमस्कार, मी तुमच्या बँकेतून बोलतेय. डेबिट कार्डचा वापर केल्याबद्दल तुम्हाला कॅशबॅक ऑफर आहे. त्यासाठी आम्हाला तुमचा डेबिट कार्ड नंबर कन्फर्म करायचा आहे. प्लीज तुम्ही कार्ड नंबर सांगता का?" कॅशबॅक ऑफर  म्हटल्यावर  सुलभाने कुठलीही खातरजमा न करता डेबिट कार्ड शोधून फोनवर बोलणाऱ्या मुलीला डेबिट कार्डचा नंबर सांगितला. तयार होउन खरेदीसाठी ती आणि सुमेधा निघणार तेवढ्यात तिला मोबाइल वर दीड  लाख रु. डेबिट झाल्याचा बॅँकेकडून  मेसेज आला. सुलभा भोवळ येऊन मटकन खाली बसली. कसेबसे त्राण गोळा करत तिने सुमेधाला सगळा प्रकार सांगितला. सुलभाला शांत करून सुमेधाने तिच्या मोबाईलवर असलेल्या बँकेच्या अॅपवर लॉगिन करून चेक केले कुठल्यातरी ऑनलाईन ज्वेलरी वेबसाइटवर तिच्या कार्डचा वापर करून खरेदी केली गेली होती. तिने लगेच बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून ट्रान्झॅक्शनची माहिती दिली, डेबिट कार्ड ब्लॉक करायला सांगितले आणि सायबर सेलला कम्प्लेंट देण्यासाठी ती बाहेर पडली.


२) होस्टेलला राहून शिकणारी हर्षाली घाईत कॉलेजला जाण्यासाठी निघाली. कालच पप्पांचा पैसे जमा केल्याचा मेसेज आल्यामुळे,  रस्त्यातच असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ती थांबली. या गोष्टीला दोन दिवस उलटले आणि हर्षालीला तिच्या बँकेतील तेवीस हजार रु. डेबिट झाल्याचा मेसेज आला. बँकेत जाऊन चौकशी केल्यावर कळले की तिच्या डेबिट कार्डचा वापर करून कोणी तरी तेरा हजाराची  एका मॉलमध्ये शॉपिंग केली आहे आणि दहा हजार रुपये एटीएम मधून काढून घेतले आहेत. हर्षालीला आठवले की ज्या दिवशी तिने एटीएममधून पैसे काढले होते, त्या दिवशी एटीएमच्या कार्ड स्लॉटमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवत होते. असं वाटत होतं की त्या कार्ड स्लॉटमध्ये आधीच  एक कार्ड इन्सर्ट केले आहे. तिच्या सायबर सिक्युरिटी शिकणाऱ्या मैत्रिणीकडून कळले की ते खरं तर कार्ड स्कीमर होते. त्याद्वारे कुठल्याही कार्डवरचा डेटा कॉपी केला जाउन त्यावरून डुप्लिकेट कार्ड तयार केले जाऊ शकते. हर्षालीला वाटले की आपण संशय आल्यावर कार्डचा वापर न करता बँकेला किंवा एटीएम केबीनबाहेरच्या सेक्युरीटी गार्डला कळवायला हवे होते. आपल्या सोबतच बऱ्याच लोकांचे नुकसान वाचले असते.

३) राहुल आज खूप दिवसांनी पुण्यातल्या एका अद्ययावत, आलिशान हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवायला आला होता. जेवण झाल्यावर बील चुकते करण्यासाठी म्हणून त्याने वेटर जवळ आपले डेबिटकार्ड दिले. कार्ड घेउन आत जाउन वेटर   स्वाइप मशीन घेउन बाहेर आला. काही दिवसांनी राहुलला त्याच्या डेबिट कार्डचा वापर होत असल्याचे मेसेजेस येऊ लागले. त्याने लगेच बँकेत जाऊन कार्ड ब्लॉक केले आणि सायबर सेलला कम्प्लेंट नोंदवली.  कम्प्लेंट देताना राहुलने हॉटेलच्या वेटरवर संशय व्यक्त केला. त्याद्वारे पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून क्रेडिट, डेबिटकार्ड  कॉपी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. तुमच्यापैकी बहुतेक जणांना पाच सहा महिन्यांपूर्वीची पूण्यातील ही घटना आठवत असेल.


४) अथर्वने घाईघाईने परीक्षा हॉल बाहेरील रॅकवर आपली सॅक ठेवली आणि तो पेपर देण्यासाठी आत गेला. त्या संध्याकाळीच वीस हजार रुपये त्याच्या अकाऊंटमधून काढून घेतल्याचा बँकेचा मेसेज आला. त्याने आपल्या सॅकच्या आतील कप्प्यात ठेवलेले एटीएम कार्ड तपासले. कार्ड तेथे नव्हते आणि अथर्वने कालच पीन बदलून लक्षात रहावा म्हणून त्या कार्डच्या कव्हरवर लिहून ठेवला होता. गाफिल राहिल्याने अथर्वचे नुकसान झाले होते वर आई बाबा रागावले ते वेगळेच. 

५) मी काश्मीरमध्ये गेले असताना गालिचां च्या कारखान्यातील एक गालिचा  खूप आवडल्याने तो विकत घेण्यासाठी म्हणून पैसे काढायला जवळचे एक एटीएम शोधून त्याच्या केबिनमध्ये शिरले. एटीएम मशीन बघताच मला काहीतरी वेगळेपण जाणवले. त्याची बनावट नेहमीच्या एटीएम मशीन सारखी नसून काही वेगळीच होती शिवाय ते कुठल्याही बँकेच्या इमारतीत नसून एकांतात होते आणि तेथे कोणी गार्डही नव्हता. मी पैसे न घेताच बाहेर पडले. काही दिवसांनी काश्मीरमधील काही ठिकाणी बनावट एटीएम मशीन वापरून कार्डचा डेटा कॉपी करून डुप्लिकेट कार्ड बनवून बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची बातमी मी वाचली.

वरील घटना वाचून काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. 
- कधीही तुमच्या कार्डचा नंबर किंवा इतर माहिती कोणाशीही शेअर करू नका. अशी माहिती विचारण्यासाठी बँक तुम्हाला कधीच कॉल करत नाही.
-एटीएम मशिनच्या रचनेमध्ये किंवा त्याच्या कार्ड स्लॉट मध्ये वेगळेपण जाणवल्यास आपले कार्ड न वापरता त्वरित बँकेला माहिती द्यावी.
-स्वाईप मशीनमध्ये आपल्या समोरच कार्ड स्वॅप करून घेउन हाताने झाकून किंवा कोणाला दिसणार नाही अशा रितीने पिन नंबर टाकावा.
-एटीएम कार्डच्या कव्हरवर किंवा इतर कुठेही पिन नंबर लिहून ठेऊ नये तो लक्षात ठेवावा.
-वरीलपैकी कुठल्याही परिस्थितीत किंवा इतर कोणताही डेबिट, क्रेडिट कार्ड संबंधित फ्रॉड झाल्यास कार्ड  देणार्‍या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून किंवा बँकेशी संपर्क करून तुमचे कार्ड त्वरित ब्लॉक करावे आणि पोलिसांच्या सायबर सेल ला कंप्लेंट द्यावी.

काही दिवसांतच आपला देश शंभर टक्के कॅशलेस व्यवहार असलेल्या अर्थव्यवस्थेकडे वळेल. म्हणूनच ह्या काही बाबी सर्वांना माहित असणे केव्हाही चांगले.


कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

No comments:

Post a Comment