Tuesday 12 December 2017

अकल्पित


माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती.

विजय एक बडा सरकारी अधिकारी. रिटायरमेंटला अजून दोन वर्षे बाकी होती. माधवी गृहिणी, पण वर्षभरापासून मुलगी जान्हवी लग्न होऊन अमेरिकेत आणि मुलगा निखिल नोकरी निमित्त  बेंगलोरला असल्यामुळे ती आपला बराचसा  वेळ एका संस्थेच्या समाजकार्यासाठी देत होती.

विजयने पेपरचे पान उलटले आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्याने उठून दार उघडले. दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या. "कोण हवंय आपल्याला?" विजयने विचारले, "मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम" इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले. "काय झालंय इन्स्पेक्टर?" प्रश्नांकित चेहरा करुन विजयने विचारले. एव्हाना माधवी बाहेर आली होती. "तुम्हाला आमच्या बरोबर पोलिस स्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल." इन्स्पेक्टर म्हणाले. "का? काय झाले?" विजयने विचारले.  "दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे सुमारे साडेचार लाखांची." इन्स्पेक्टरने माहिती दिली. "पण यांत माझा काय संबंध?" विजयला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं  अापल्याला का सांगताहेत. विजय आणि माधवी दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे आलटून पालटून पाहत होते. "तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे. आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे." दीक्षितांनी पुस्ती जोडली. विजय आणि माधवी दोघांच्या पायांखालची जमीन सरकल्या सारखी झाली. काय करावं, काय प्रतिक्रिया द्यावी, त्यांना कळेना.  त्याही अवस्थेत विजय माधवीला धीर देत म्हणाला, "मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस." आणि तो त्या तिघांबरोबर बाहेर पडला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर विजय बसला होता.


दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक दीड वाजेच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापाराच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता. "हे कसे शक्य आहे आमच्या घरी फक्त मी आणि माझी पत्नी असे दोघेच असतो आणि रात्री साडेनऊला तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणी सुद्धा आलेले नव्हते, मग... "  "मिस्टर विजय जोशी.." त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले,  "आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही. " त्यानंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार विजयला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला.

या प्रकाराला वॉर ड्रायव्हिंग असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर एअरक्रॅक सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस अॅडाप्टर, वायफाय पासवर्ड  क्रॅक करण्यासाठी  लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला, कि ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल ती व्यक्ती संकटात येऊ शकते. विजयच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड  आणि फारसे सिक्युर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चुक नसतांना तो नाहक गोवला गेला होता. थोडीशी बेपर्वाई त्यांच्या अंगलट आली होती. दोन महिने  खटला चालला. विजयवर डेबिट कार्ड च्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची मोठी रक्कम भरावी लागली. दरम्यान काही दिवस त्याला नोकरीतून निलंबित राहावे लागले.

मित्र मैत्रिणींनो तुमच्यापैकी बहुतेक जण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा, तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA इन्क्रिप्शनचा वापर करा. स्ट्राँग पासवर्ड लावा. शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत  नसल्यास राऊटर बंद करून ठेवा. घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेस ला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तर सावध आणि सजग राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

कविता दातार
सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट 

No comments:

Post a Comment