Tuesday 12 December 2017

मीनू

मीनू




संध्याकाळचे साडेसात वाजले तशी मी लॅपटॉप बंद करून उठले.  अंजूला ऑफिस बंद करण्याच्या आवश्यक त्या सूचना देऊन बाहेर पडणार तेवढ्यात माझा मोबाइल वाजला. 
"हॅलो मावशी, मी मीनू बोलतेय." पलीकडून मीनूचा रडवेला आवाज. "काय गं, काय झाले?" मी थोड्या काळजीनेच विचारले. मीनू माझ्या मैत्रिणीची सुंदर, हुशार मुलगी आणि माझी विद्यार्थिनी. दोन महिन्यांपूर्वीच तिचे लग्न ठरले होते. "तुला भेटायचे आहे, आता लगेच. तू कुठे आहेस?" घायकुतीला येऊन मीनू म्हणाली. "लगेच ये. मी अजून ऑफिसला आहे." असे तिला सांगून मी फोन बंद केला आणि ताटकळत उभ्या असलेल्या अंजूला जायला सांगितले.  पंधराव्या मिनिटाला मिनू माझ्यासमोर बसली होती. डोळे रडून  लाल झाले होते. अजूनही तिचे डोळे सारखे भरून येत होते. आधि मी तिला शांत होऊ दिले. पाणी प्यायला दिले. मग विचारले "काय झालंय मीनू? मला नीट सांगशील का?" उत्तरादाखल तिने तिचा मोबाइल फोन माझ्या पुढ्यात धरला आणि त्यावर एक साइट उघडून तिचे काही आक्षेपार्ह फोटोग्राफ्स मला दाखवत म्हणाली, "बघ मावशी, माझे किती घाणेरडे फोटो या साइटवर अपलोड झाले आहेत." एवढे बोलून ती हमसून रडू लागली. मीनूचे ते अश्लिल, बिभत्स फोटो बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी मोबाइल तिच्या हातातून काढून बाजूला ठेवला आणि माझ्या खुर्चीतून उठून तिच्या जवळ गेले. तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत मी तिला शांत रहाण्यास सांगितले. थोड्याच वेळात स्वतःला सावरत मीनूने सांगायला सुरुवात केली "या फोटोजची लींक मला माझ्या मैत्रिणीने फॉरवर्ड केली. मला कळावे म्हणून. तिच्या नवऱ्याला हे एका पोर्न साइटवर दिसले. अजून असले माझे फोटोज कुठल्या कुठल्या साइट्स वर असतील देवच जाणे. विश्वास ठेव मावशी मी कोणाचे असले फोटोज बघितले सुद्धा नाहीत. मग स्वतःचे काढून घेईन का?" मीनूला रडू आवरत नव्हते. मी हतबुद्ध होऊन तिच्याकडे पहात होते. कुठल्या शब्दांत तिचं सांत्वन करावं, मला कळत नव्हते. थोड्या वेळात मी स्वतःला सावरत म्हटलं "शांत हो मीनू, रडून काहीच होणार नाहीये. या संकटाला कसं तोंड द्यायचं? याचा आपल्याला डोकं शांत ठेवून विचार करायला हवा." "कसं शांत राहू मावशी? हे सगळं माझ्या सासरच्यांना कळलं तर माझं लग्न होऊ शकणार आहे का?" मीनूची शंका रास्त होती. फार वेळ न घालवता भराभर सुत्रं हलवायला हवी  होती. मी लॅपटॉप सुरू केला. तिच्या मैत्रिणीने पाठवलेली लिंक वापरून त्या साइटवर जाउन आधी तिच्या फोटोजचे बारकाईने निरिक्षण केले. फोटोतला मुलीचा चेहरा मीनूचा असला तरी बाकी शरीर दुसर्‍याच कुणा मुलीचे आहे हे तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटू वरून लक्षात आले. ते फोटो ताबडतोब काढून टाकण्याचे त्या साइटला मी विनंतीवजा इमेल केले. ही सर्व घटना तिच्य‍ा होणार्‍या नवर्‍याला माहित असणं जरुरी होतं. बाहेरुन कळण्यापेक्षा आपणच त्याला सांगायचे असे ठरवून त्याला फोन लावला. फोनवर त्याल‍ा काय घडलंय  ते सविस्तर सांगितलं. तो फारच समंजस वाटला. उलट त्याने मीनूची यांत काहि चूक नाही म्हणून तिने फार मनाला लावून घेउ नये अशी तिची समजूत काढली. दुसर्‍या दिवशी सायबर सेल ला जाउन तक्रारअर्ज द्यायचे ठरवले. एव्हाना मीनू बरीच शांत झाल्यासारखी वाटली. फोटोंतला चेहरा मीनूच्या मोबाइल मध्ये असलेल्या तिच्या काही फोटोंशी जुळत असल्याने मी लॅपटॉप बंद करून तिचा मोबाइल नीट तपासून बघायचे ठरवले. सर्वप्रथम मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तिने कुठले अॅप्स इन्स्टॉल केले आहेत ते बघितले. ‍त्यात जास्त करून मेकअप आणि हेल्थ संबधित अॅप्स मला दिसले. प्रत्येक अॅपच्या परमिशन्स मी तपासल्या. त्यापैकी एका अॅपला सगळ्याच परमिशन्स दिलेल्या दिसत होत्या. जेव्हा आपण स्मार्टफोनवर एखादे अॅप इन्स्टॉल करतो तेव्हा ते अॅप तुमच्या फोनचा कसा वापर करणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणारा एक स्क्रीन येतो. त्या स्क्रीनवर तुम्हाला ओके किंवा कॅन्सल क्लिक करावे लागते. हे करताना बहुतेक जण फारसा विचार करत नाहीत. इथेच  मीनूचे चुकले होते, तिने या अॅपला कॅमेरा, स्टोरेज, मीडिया फाइल्स इत्यादी सगळेच एक्सेस परमिशन्स दिलेले दिसत होते. त्यामुळे याच अॅपच्या थ्रू तिचे फोटोग्राफ्स कुठेतरी अपलोड होऊन त्यांचं मॉर्फिंग (दुसर्‍या फोटोसोबत मिक्सिंग) केलं जात असावं.  जरुरी तेवढे अॅप्स तिच्या स्मार्टफोन वर ठेवून बाकीचे अॅप्स मी अनइन्स्टॉल केले. दुसऱ्या दिवशी सायबर सेलला तिने रितसर कम्प्लेंट नोंदवली. त्याचा तपास अजूनही चालू आहे. आज मीनूचे लग्न होऊन सहा महिने झाले आहेत आणि ती सुखात आहे. 

मित्र मैत्रिणींनो मीनूची ही सत्य घटना मी तिच्या संमतीने तुमच्याशी शेअर करत आहे. हेतू एवढाच की आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात.
स्मार्टफोनवर कुठलेही अॅप इन्स्टॉल करताना गुगलवर त्याचे रिव्ह्य़ूज तपासा. त्याला आपण कोणत्या परमिशन्स देत आहोत ते नीट बघा. अॅपला दिलेल्या परमिशन्स नंतरही सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही काढून घेऊ शकता. व्हायाप्रोटेक्ट आणि ओएस मॉनिटर सारखे अॅप्स वापरून तुमच्या स्मार्टफोनवरचा डेटा लीक तर होत नाही आहे ना? हे बघू शकता. मुळांत असलेले आणि जरुरी तेवढेच अॅप्स आपल्या स्मार्टफोनवर ठेवा. सावध आणि सतर्क राहा. पुन्हा भेटू या एका नव्या सायबर क्राइम स्टोरीसह.

कविता दातार

No comments:

Post a Comment