Tuesday 12 December 2017

मोहजाल


प्रियांका एक मध्यमवर्गीय मुलगी उच्च शिक्षणासाठी मुंबईत वनरूम फ्लॅटमध्ये राहणारी. कॉलेज, क्लास नंतर उरलेल्या वेळात विरंगुळा म्हणून तिला चॅटिंगचा नाद लागला. चॅटिंग करता करता राहुलशी तिची ऑनलाइन भेट, मैत्री झाली. म्हणजे त्याने तरी त्याचे नाव राहुल असे सांगितले. पुढे पुढे त्याच्याशी चॅटिंगचे तिला एवढे व्यसन जडले कि ती आपला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन कायम ऑन मोडवर ठेवू लागली. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती राहुलशी चॅटींग करत असे. एक दिवस राहुलने तिला चॅट विंडोमध्ये एक लिंक पाठवून त्याचा पर्सनल ऑनलाइन अल्बम बघण्यास सांगितले. अल्बममधील राहुलचे फोटो बघून ती अधिकच प्रभावित झाली. पुढच्या चॅटिंगच्या वेळेस तिने राहुलला समक्ष भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. आपण बाहेरगावी जात आहोत असे सांगून राहुलने तिला टाळले. त्या दिवशीपासून तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि तिचा लॅपटॉप  प्रोसेसिंगसाठी जास्त वेळ घेत आहे. राहुलशी तिचे चॅटिंग चालूच होते पण समक्ष भेटण्याची इच्छा जाहीर केल्यास तो काही करून ते टाळत होता. बऱ्याचदा वेबकॅम ऑन करून ती त्याच्याशी चाट करत असे तो मात्र आपल्या लॅपटॉपचा  वेबकॅम खराब झाला आहे असे सांगत असे. असे पाच सहा महिने लोटले दरम्यान प्रियांकाचा कोर्स पूर्ण झाला तिने नोकरीसाठी अप्लाय करायला सुरुवात केली. एका कंपनी कडून तिला नोकरीसाठी इंटरव्ह्यू कॉल आला.  पूर्ण तयारीनिशी ती इंटरव्ह्यूला हजर झाली. इंटरव्ह्यू घेणारा मध्यम वयीन  व्यक्ती तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. इंटरव्ह्यू अपेक्षेपेक्षा छान झाला बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं प्रियांकाने बरोबर दिली. आता ही नोकरी आपल्यालाच मिळणार अशी तिला खात्री वाटू लागली. चार दिवस तिने वाट पाहिली. पाचव्या दिवशी तिने त्या कंपनीला फोन करून चौकशी केली. इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्तीने तिला समक्ष भेटण्यास बोलावले. त्याने तिला जे सांगितले त्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसला.  कशीतरी ती आपल्या फ्लॅटवर आली. त्या माणसाचे शब्द वारंवार तिच्या डोक्यात घणाघात करत होते. "तु हुशार, स्मार्ट आहेस पण पोर्न साइटस् वर वारंवार  दिसणाऱ्या मुलीला आम्ही नोकरी देऊ शकत नाही".
एक एक संदर्भ तिच्या लक्षात येऊ लागला राहुलचे समक्ष भेटण्यास टाळाटाळ करणे,अशात ऑनलाइन कमीत कमी येणे, तिला पाठवलेले लिंक क्लिक करताच लॅपटॉपचे प्रोसेसिंग स्लो होणे. एक एक धागा जुळत गेला. विचार करून मेंदूचे तुकडे पडायला आले. गुगलवर सर्च केल्यावर तिच्या विचारांना पुष्टी मिळाली. तिने गुगल वर सर्च करून  सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटचा नंबर मिळवला आणि त्याला भेटायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी ती सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये आपल्या लॅपटॉपसोबत हजर झाली. त्याने सुमारे अर्धा तास लॅपटॉपचे आणि चाटस् चे  डिटेल्स बघून, आपल्या जवळील अँटी व्हायरस, अँटी स्पायवेअर आणि इतर साँफ्टवेअर वापरून, काही ठोकताळे मांडून तिला सांगितले की राहुलने तिला चॅटिंग करताना जी लिंक पाठवली होती ती त्याच्या ऑनलाइन अल्बमची तर होतीच पण त्याचबरोबर ट्रोजन लिंकही होती ट्रोजन हा व्हायरस सारखाच छुपा प्रोग्रॅम असून  जास्त पॉवरफुल असतो म्हणजे तो तुमच्या लॅपटॉपचा वेबकॅम सुद्धा ऑटोमॅटिकली ऑन करू शकतो. ट्रोजनचं डिटेक्शन अँटीव्हायरस लगेच करतो पण प्रियांकाच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस, अँटी स्पायवेअर काहीही नव्हते. प्रियांकाच्या एक एक गोष्ट लक्षात येऊ लागली वनरूम फ्लॅट  त्यात आपला लॅपटॉप इंटरनेट सहित कायम ऑन असणे, राहुल शी वेबकॅम ऑन करून मारलेल्या गप्पा. तिच्या हाता पायातले त्राण गेल्यासारखे झाले. तिचे फोटो आणि तिच्या अॅक्टिव्हिटीज रेकॉर्ड करून त्यांच्याशी फोटो एडिटर वापरून  छेडछाड करून त्याने तिचे  पोर्न फोटोज् आणि  व्हिडिओज्  बनवून तसल्या साइटस् वर अपलोड केले होते. हे फारच धक्कादायक होते. शहर पोलिस सायबर सेलला तिने रीतसर कम्प्लेंट नोंदवली. आज या घटनेला दोन वर्षे झाली पण राहुल   अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. कारण सायबर क्राईम करणारे  स्वतःचा ट्रेस लागू न देण्याची खबरदारी जरूर घेतात. तेव्हा मित्रमैत्रिणींनो  सावध, सतर्क रहा. अनोळखी लोकांशी कधीही चॅट करू नका. कुठलिही लिंक ओपन करु नका. आणि चांगले इंटरनेट सेक्युरीटी अँटीव्हायरस आपल्या संगणकावर, लॅपटॉप वर जरुर ठेवा.


कविता दातार
Cyber Security Consultant

2 comments:

  1. Omg this is horrible...is this based on true story?

    ReplyDelete