Monday, 9 April 2018

फेसबुक फोटो शेअरिंग


फेसबुक फोटो शेअरिंग

काल एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. आवाजात नाराजी झळकत होती. तिने सांगितले, फेसबुकवर तिने अपलोड केलेला तिचा फोटो एका अनोळखी व्यक्तीने शेअर केला आहे. तिने त्याला तो फोटो काढून टाकण्यासाठी विनंतीवजा मेसेज केला, पण त्याने उत्तर दिले नाही आणि फोटोही काढला नाही. फेसबुकला रिपोर्ट करून देखील काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तिने पोस्ट केलेला फोटो  डिलीट केला. मी, त्या व्यक्तीने शेअर केलेली पोस्ट चे डिटेल्स मला पाठव असे तिला सांगितले. त्याप्रमाणे तिने पाठवलेल्या  डिटेल्सवरून मी त्याचे फेसबुक प्रोफाइल पाहिले. तिचा फोटो अजूनही तिथेच होता. मराठमोळ्या वेशातील माझ्या मैत्रिणीचा सुंदर फोटो त्या टुकार माणसाच्या वॉलवर पाहून मला फार वाईट वाटले.  त्याला काही लोकांनी लाइक्स देऊन कमेंटही केले होते. मी त्या फोटोचा स्पॅम रिपोर्ट फेसबुकला केला. पण काहीही उपयोग झाला नाही.

मैत्रिणींनो यावरून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते,
तुम्ही तुमचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत असाल तर ते फक्त तुमच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांनाच दिसतील अशी सेटिंग करा. मोबाइलवरून पोस्ट करत असाल तर  पोस्टच्या उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील, त्या डॉट्सवर टॅप करून एडिट प्रायव्हसी हे ऑप्शन सिलेक्ट करून, आलेल्या लिस्टमधून फ्रेंड्स ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्ही पोस्ट केलेले फोटोज फेसबुकवरील तुमचे मित्र मैत्रिणी फक्त पाहू शकतील. कारण एखादा फोटो पब्लिकली पोस्ट केला गेल्यास तो कोणीही बघू शकते आणि शेअरही करू शकते. शेअर हे ऑप्शन डिसेबल करण्यासाठी फेसबुकमध्ये सध्यातरी कुठलाही उपाय नाही. तर सावध राहा आणि सोशल मीडियाचा सांभाळून वापर करा.

कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

Sunday, 8 April 2018

खाजगी माहिती चे व्यापारीकरण

खाजगी माहिती चे व्यापारीकरण

आपल्यापैकी बहुतेक जण सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. स्मार्टफोन्सचा वापर सुद्धा गेल्या काही वर्षात वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होणारे फायदे जसे अनेक आहेत, तसे तोटे देखील आहेत. यात अधोरेखित करता येण्याजोगा तोटा म्हणजे तुमच्या खासगी माहितीचे व्यापारीकरण. एकदा का आपण सोशल नेटवर्किंग साइटवर अथवा एखाद्या स्मार्टफोन अॅपवर आपल्याबद्दलची माहिती लिखित किंवा फोटो, व्हिडीओच्या स्वरूपात टाकली, कि ती माहिती खासगी राहू शकत नाही.

कुठल्याही वेबसाइट किंवा अॅपचे दोन प्रमुख आर्थिक स्रोत म्हणजे जाहिराती आणि  वापरकर्त्यांची माहिती (users' data). बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या कंपनी, संस्था, शॉपिंग अथवा मार्केटिंग साइट्स कडून ई-मेलस् येतात. आपला ईमेल आयडी त्यांना कुठून मिळतो? याचा विचार केला तर आपल्या लक्षात येइल कि आपला इमेल आयडी यांना पुरवला जातो. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे भारतात वीस कोटी युजर्स आहेत. दिवसागणिक यात वाढ होत आहे.  लोकप्रियतेमुळे अनेक मार्केटींग कंपनी फेसबुकच्या यादीत आहेत. यावरून यूजर्स डेटाची उलाढाल किती प्रचंड प्रमाणात आहे याचा अंदाज येऊ शकतो. आज फेसबुकचे मार्केट कॅपिटल साधारणतः  साडेचारशे ते पाचशे अब्ज डॉलर्स एवढे आहे. असे म्हणतात की कुठलीही सेवा जर आपल्याला विनामूल्य मिळत असेल तर त्यात आपणच प्रॉडक्ट असतो.

केंब्रिज अॅनालिटिका कंपनी प्रकरणाने यावर नव्याने प्रकाश टाकला गेला आहे. या प्रकरणात तर फेसबुकवरील एका अॅपच्या द्वारे युजर्सचा डेटा फेसबुकच्या नकळत चोरून केंब्रिज अॅनालिटीका कंपनीला अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणूक अभियानासाठी विकला गेला.

फेसबुकच्या सेटींग्स मध्ये "Download a copy of your Facebook data" असे लिहिलेली एक लिंक आहे. ती लिंक वापरून फेसबुकवरील आपला सुरुवातीपासूनच डेटा डाऊनलोड करता येतो यात वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, वॉल पोस्ट्स, आपल्या फ्रेंडलिस्टमधील लोकांचे ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर असं सगळं काही मिळतं. एक साधारण हॅकर किंवा ज्याला आपला पासवर्ड माहीत असेल अशी व्यक्ती हा डेटा सहज मिळवू शकते. फेसबुकच नाही तर गुगल-प्लस, लिंक्डइन, ट्विटर आणि इतर कुठलीही वेबसाइट या प्रकारे आपल्या डेटाचा वापर करतात.

एवढेच नाही तर स्मार्टफोनच्या अँड्रॉइड, आयओएस या सारख्या ऑपरेटिंग सिस्टम्स सुद्धा आपल्या स्मार्टफोनवरील सगळा डेटा त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करून ठेवतात. त्यांचा सर्व्हर हॅक झाल्यास आपल्या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.

यावरून असं म्हणता येइल की आपल्या लिखित, फोटो आणि व्हिडिओ स्वरूपातील वैयक्तिक माहितीची विक्री, चोरी आणि दुरुपयोग शक्य आहे.

खासगी माहितीचे व्यापारीकरण पूर्णपणे टाळता येणे आजच्या काळात शक्य नसले तरीही काही गोष्टींची खबरदारी  आपण घेऊ शकतो.
-शक्यतोवर मोबाईल नंबर कुठल्याही वेबसाइटवर शेअर करणे टाळावे.
-खासगी आयुष्याबद्दलची सुक्ष्म माहिती, फोटो, व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करणे टाळावे. जुजबी माहिती फक्त पोस्ट करावी.
-सोशल मीडिया वापरत असताना त्यावरील दुसरे अनधिकृत अ‍ॅप वापरू नये. उदा. फेसबुकवर मल्लू अ‍ॅप सारखे अ‍ॅप्लिकेशन.
-आपले बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयीची कसल्याही प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.
-स्मार्टफोनवर खासगी क्षणांचे फोटो, व्हिडिओ शक्यतो चित्रित करू नये, त्याऐवजी वैयक्तिक कॅमेराचा वापर करावा.
-स्मार्टफोनवर वापरत असलेल्या अॅप्सना जरुरी तेवढ्याच परमिशन्स द्याव्या.
-लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर हॅकिंग किंवा तत्सम गोष्टींपासून वाचण्यासाठी आणि डेटाच्या सुरक्षेसाठी चांगले इंटरनेट सिक्युरिटी अँटी व्हायरस वापरावे.


कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

Thursday, 22 March 2018

फेसबुक डेटा लीक प्रकरण

फेसबुक डेटा लीक प्रकरण 

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेसबुकला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. #DeleteFacebook चे आवाहन जगभरातून जोर धरत आहे. हे आवाहन व्हॉट्सअॅप चा सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन याने जगभरातील लोकांना केले आहे.  अमेरिका आणि कॅनडात एक कोटी युजर्सने आपली फेसबुक अकाऊंट्स डिलीट केली आहेत. भारतात हा आकडा लाखांच्या घरात असेल.
२०१६ मध्ये अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून अप्रत्यक्षपणे  लीक झाली होती.  विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इलेक्शन कॅम्पेन हाताळणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी होती केंब्रिज अॅनालिटिका. ही इंग्लंडमधील एक मोठी डेटा अॅनालिटिक्स कंपनी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीत शिकणार्‍या अलेक्झांडर कोगन याने एक पर्सनॅलिटी क्विझ अॅप या कंपनीच्या मदतीने डेव्हलप करून फेसबुकमध्ये सामील केले.   खरे तर फेसबुकवर असे बरेच अॅप्स तुम्ही वापरले असतील. उदाहरणा दाखल "तुम्ही मागच्या जन्मी कोण होता?", "कुठल्या सेलिब्रिटीशी तुमचा चेहरा मिळतो?" किंवा "तुमचे खरे प्रोफेशन काय असायला हवे?" वगैरे. हे अॅप्स वापरताना तुमची परमिशन घेऊन तुमचा डेटा एक्सेस केला जातो.  तर या कोगन महाशयांनी अशा रीतीने पाच कोटी युजर्सचा डेटा मिळवून केंब्रिज अॅनालिटिकाला पुरवला. 
या डेटामधील युजर्सचे पॉलिटिकल व्ह्यूज, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे वैयक्तिक मतं, अपेक्षा या सगळ्याचा अभ्यासपूर्वक वापर करून ट्रम्प यांच्या इलेक्शन कॅम्पेन ची आखणी करण्यात आली, असा आरोप आहे. या सगळ्यांत फेसबुकचा प्रत्यक्ष संबंध नसताना नुकसान मात्र त्यांनाच सोसावे लागत आहे. फेसबुकचे मार्केट कॅपिटल ५० अब्ज डॉलर्सने घटले आहे. लाखो लोक फेसबुकवरून आपले अकाउंट डिलीट करत आहेत. काही देशात फेसबुकची चौकशी सुरू आहे. फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. भारतात फेसबुकचे वीस कोटी युजर्स आहेत. हा आकडा एकूण युजर्सच्या दहा टक्के आहे. म्हणूनच कदाचित भारतीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर माफी मागितली आहे आणि फेसबुकवरील सुरक्षा प्रणाली अजून जास्त अद्ययावत  करण्याची हमी दिली आहे. जेणे करून अशा प्रकारचे युजर्स डेटा लीक भविष्यात टाळता येतील.

कविता दातार
Cyber Security Consultant

Monday, 22 January 2018

मृगजळ

नेहा एक निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीतील सामान्य रंग रूपाची आणि बुद्धीची बारावी कॉमर्सला शिकणारी मुलगी. मुंबईतील धारावीमध्ये छोट्या दोन रुमच्या ब्लॉकमध्ये ती, तिचे एका बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे वडील, आई आणि एक लहान भाऊ राहत होते. नेहाला कॉलेजमध्ये फारसे कोणी मित्र मैत्रिणी नव्हते. याला कारण तिचा एकलकोंडा, अबोल स्वभाव. छान कपडे घालावेत, स्टायलिश राहावं, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात रमावं, आपल्यालाही एक खास मित्र असावा, असे तिला फार वाटे. पण एकंदर परिस्थितीमुळे तिचे हे मनोरथ मनातच विरून जात. समवयस्क मुला मुलींना हास्य विनोद करताना पाहून तिला फार असूया वाटे. आपल्या परिस्थितीची चीड येई. आणि ती अजूनच अंतर्मुख होत असे. एक प्रकारचा न्यूनगंड तिच्यात वाढीस लागला होता.
कधी नव्हे ते नेहा आज खुशीत होती. त्याला कारणही तसेच होते. गेले दोन महिने ती तिच्या बाबांना एक सेकंडहँड स्मार्टफोन घेऊन द्या म्हणून सांगत होती. आज त्यांनी तिच्यासाठी आपल्या बँकेतील एका सहकाऱ्याचा दोन वर्ष जुना स्मार्टफोन उधारीवर खरेदी केला होता. थोडे थोडे करून ते त्या सहकाऱ्याला पैसे देणार होते. मोठ्या अपूर्वाईने तिने बाबांच्या हातून फोन घेतला. उलटपालट करून पाहिला. हात रुमालाने स्वच्छ पुसला आणि जुन्या साध्या मोबाइल फोनमधील सिमकार्ड काढून त्या  स्मार्टफोन  मध्ये घातले. फोन सुरू केल्यावर त्याच्या स्क्रीनवरील रंगबिरंगी आयकॉन्स ती अनिमिष नेत्रांनी बघू लागली. बाबांकडून थोडे पैसे घेऊन जवळच्या दुकानात जाऊन तिने नेटपॅक विकत घेतला. घरी येऊन तिने व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर असे अॅप्स मोबाइल फोनवर इन्स्टॉल केले. फेसबुकवर तिने स्वतःचे अकाऊंट तयार केले. आणि त्यावर प्रोफाइल फोटो म्हणून ऐश्वर्या या प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्रीचा सुरुवातीच्या काळातला फोटो लावला. तिच्या बरोबर शिकणाऱ्या काही मुला मुलींना फेसबुकवर शोधून तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही दूरस्थ, अनोळखी मुलांची नावं अंदाजे टाइप करून त्यांनाही तिने फ्रेंड रिक्वेट पाठवली. यातील एक होता क्रिश जॉन्सन.
                                    ******

क्रिश त्याच्या ऑस्ट्रेलियातील सिडनी मधील घरात लॅपटॉपवर कॉलेज असाइनमेंट पूर्ण करण्यात गढून गेला होता. मोबाईल फोनवरील नोटिफिकेशन साउंडने त्याची तंद्री भंग पावली.  त्याने मोबाईल उचलून पाहिला फेसबुकवर एक नवी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. साहजिक कुतुहलाने त्याने रिक्वेस्ट पाठवणाऱ्या व्यक्तीचा प्रोफाइल उघडून पाहिला. "wow ! beautiful !!" प्रोफाइल वरचा फोटो पाहताच त्याच्या तोंडून सहजोद्गार निघाले. लगेच त्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि फेसबुक मेसेंजरवरून मेसेज पाठवला. "Hi ! thanks for the request. You are very beautiful. what's the meaning of your name ? Neha ?" मेसेंजरचा नोटिफिकेशन साऊंड एेकताच  नेहाने मेसेज बॉक्स उघडला. क्रिशचे प्रोफाईल पाहून आणि मेसेज वाचून ती रोमांचित झाली. आयुष्यात प्रथमच कोणीतरी, त्यातही एका हॅण्डसम फॉरेनर मुलाने तिची स्तुती केली होती. नेहा हरखून गेली. लगेच तिने त्याला रिप्लाय केले. "Hi ! thanks. Meaning of my name is Love." यानंतर त्या दोघांनी जवळपास अर्धा तास चॅटिंग केले. क्रिशने तिला स्वतःबद्दल बरंच काही सांगितलं. सिडनीमध्ये तो इंटरनॅशनल फायनान्स या विषयात ग्रॅज्युएशन करत होता. त्याच्या वडिलांची सुपर शॉप्सची चेन होती. त्याची आई भारतीय असून मुंबईतील होती. बावीस वर्षांपूर्वी ती ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी आली असताना क्रिशच्या वडिलांशी तिची भेट झाली आणि त्यांनी लग्न केले. दोन वर्षांनी क्रिशचा जन्म झाला. क्रिश हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याला त्याच्या आईची जन्मभूमी मुंबईत एकदा भेट देण्याची इच्छा होती. नेहाने तिचे आई वडील डॉक्टर असल्याचे क्रिशला खोटेच सांगितले. क्रिश सोबत चॅटिंग केल्यापासून नेहा जणूकाही हवेत तरंगत होती. तिला या सगळ्याचे खूपच अप्रूप वाटत होते. एक प्रकारच्या आभासी जगात ती विहरत  होती. त्यानंतर रोजच किमान एकदा ती दोघं फेसबुक मेसेंजरवर भेटू लागली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले. क्वचित कधितरी क्रिश तिला फोन कॉल सुद्धा करायचा. अशातच क्रिशने तिच्यावरच्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली. नेहाला आभाळ कवेत आल्यासारखे वाटू लागले. तिला जणू स्वर्ग दोन बोटे उरला. क्रिशने नेहाला तिचे अजून काही फोटो पाठवायला सांगितले. तिने ऐश्वर्याचे काही काळापूर्वीचे फोटो इंटरनेट वर शोधून त्याला पाठवले. हे आभासी जगच तिला खरे वाटू लागले. तिच्या मनात कायम क्रिशचेच विचार असायचे. हळू हळू अभ्यासातील तिचे लक्ष उडाले. घरातील कामात आईला मदत करताना छोट्या छोट्या चुका होऊ लागल्या. कधीतरी तिला वाटे की क्रिशला सगळं खरं सांगून टाकावं आणि आपला खरा फोटो सुद्धा पाठवून द्यावा. पण एकदा चॅटिंग करताना तिने क्रिशला विचारले, "which quality of mine impress you the most ?" क्रिशने लगेच उत्तर दिले , "Your divine beauty.."
हे ऐकल्यावर तिने त्याला खरं सांगायचा विचारही सोडून दिला. या मृगजळा पासून दूर जाण्याची तिची इच्छा नव्हती. ती या सगळ्यांत अधिकच गुंतत चालली होती.

डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा होता. आज नेहाला थोडी कणकण असल्याने ती कॉलेजला न जाता घरी आराम करत होती.  दुपारचे तीन वाजले होते. तिने मोबाइलवर मेसेंजर उघडून पाहिले क्रिश ऑफलाइन होता. तिच्या लक्षात आले, ऑस्ट्रेलियात आता रात्रीचे साडेआठ वाजले असणार आणि क्रिश सॅटर्डे नाईट आऊटसाठी बाहेर असणार. तिने सहज जीमेल बॉक्स उघडला. त्यात क्रिशने काही तासांपूर्वी पाठवलेले मेल दिसत होते. अधीरतेने तिने मेल वाचायला सुरुवात केली.

Dearest Neha,
Here is a big surprise for you. I am coming to Mumbai on Friday, 29th December. I am eager to meet the most beautiful girl in the world.

पुढे त्याने त्याच्या फ्लाइटचे आणि हॉटेल बुकिंगचे डिटेल्स दिले होते आणि नेहा त्याला मुंबईत आल्याबरोबर एअरपोर्टबाहेर दिसावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. क्रिशची ममा जरी मुंबईतील होती तरी अॉस्ट्रेलिअन माणसाशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी काही संबंध ठेवले नव्हते. त्यामुळे क्रिश हॉटेलमध्ये राहणार होता. भारतात खास करून मुंबईला भेट देण्याची त्याची इच्छा माहित असल्याने त्याच्या ममा डॅडकडून त्याला सहज संमती मिळाली होती.  ईमेल वाचताना नेहाचे हात थरथरत होते. घशाला कोरड पडली होती. कशीतरी उठून माठाजवळ जाऊन ती दोन तीन ग्लास पाणी प्यायली. काहीतरी मौल्यवान असे हातातून निसटून चालले आहे या वैफल्याने आणि खोटेपणाच्या दडपणाने ती खूप अस्वस्थ झाली. तिने क्रिश च्या मेलला काही उत्तर न देता, त्याला कुठलाही मेसेज न पाठवता मोबाईल स्विचऑफ करून कपाटाच्या आतल्या खणात ठेवून दिला आणि घरात अस्वस्थपणे येरझारा घालत विचार करू लागली, 'आपलं खरं रंगरूप, परिस्थिती क्रिशला समजल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ? तो नक्कीच आपला तिरस्कार करेल. कदाचित आपल्या घरच्यांना भेटून आपला खोटेपणा उघडकीस आणेल. अरे देवा !! हे काय होऊन बसलं ?  त्याला आपण मुंबईच्या बाहेर जातो आहोत असं खोटं सांगू यात का ? पण त्याचा काय उपयोग ? कधी ना कधी तो इथे येणारच.'  खूप विचारांती नेहाने त्याच्याशी पूर्णपणे संपर्क थांबवण्याचे पक्के ठरवले. अगतिकतेने तिचे डोळे भरून आले.
                                  ******
सहार एअरपोर्टच्या सर्व्हिस काउंटरवर आपले ई टुरिस्ट व्हिसा डॉक्युमेंट दाखवून बाकी औपचारिकता पूर्ण करून क्रिश बाहेर आला आणि उत्सुकतेने नेहा कुठे दिसते का ? ते पाहू लागला. चार दिवसांपासून नेहाने त्याच्या मेसेजेस, ईमेल आणि फोन कॉल्सला उत्तर दिले नव्हते त्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती. ती बरी असेल ना? कि तिचा मोबाइल हरवला असेल? अशा अनेक शंका त्याच्या मनात येत होत्या. काही झाले तरी मुंबईत येऊन नेहाला भेटण्याचे त्याने नक्की ठरवले होते. बराच वेळ तिची वाट पाहून, तिला पुन्हा पुन्हा कॉल करूनही काही उत्तर येत नव्हते. कंटाळून क्रिश टॅक्सी करून, इंटरनेट वरून बुक केलेल्या, हॉटेलच्या रूमवर आला. साडे चौदा तासांच्या प्रवासाने तो खरं तर दमला होता. त्याला जेटलॅग  ही जाणवत होता फ्रेश होऊन त्याने थोडी झोप घेण्याचे ठरवले. दोन तास झोपून उठल्यावर त्याने नेहाला परत कॉल केला. यावेळेस दोन तीनदा रिंग वाजून कॉल डिस्कनेक्ट झाला. परत कॉल केल्यावर मोबाइल स्विच अॉफ असल्याचा ऑपरेटरचा मेसेज आला. नेहाशी कसा संपर्क साधावा ? हे त्याला कळत नव्हते. त्याच्या जवळ तिच्या घराचा किंवा कॉलेजचा पोस्टल अॅड्रेस सुद्धा नव्हता. आता क्रिशला नेहाचा संशय येऊ लागला. त्याला स्वतःच्या मूर्खपणाची चीड आली. गुगलवर 'नेहा शर्मा मुंबई' असे टाकून त्याने तिच्या बद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. पण त्याला तिच्या फेसबुक प्रोफाइल शिवाय तिच्या माहितीशी जुळणारं असं काही मिळालं नाही. नेहाने तिच्या खोलीतून समुद्र दिसतो असे सांगितल्याचे त्याला आठवले म्हणून त्याने बीचेसच्या आजूबाजूच्या रहिवासी भागात टॅक्सीतून फिरून तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला सापडणं  शक्यच नव्हतं. तेथील काही लोकांना त्याने तिचा मोबाईलवरील फोटो दाखवून ही मुलगी कुठे राहते ? असं विचारल्यावर ती लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. त्यातील एकाने त्याला सांगितले की ही बॉलिवूड  फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या आहे. ते ऐकून क्रिशला प्रचंड धक्का बसला.
नेहाने आपल्याला मुर्ख बनवले अशी त्याची खात्री पटली. त्याने मुंबई पोलीस सायबर सेलची मदत घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने सायबर सेलला ऑनलाइन कम्प्लेंट दिली. कम्प्लेंट देऊन दोन दिवस झाले तरीही त्याला सायबर सेल वरून कुठलाही रिप्लाय आला नव्हता.
त्याच्या डॅडने त्याला काही मदत लागली तर संपर्क करता यावा यासाठी मुंबईतील ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट मधील आपल्या एका मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. त्याच्या ममानेही तिच्या एका मुंबईतील मैत्रिणीचा फोन नंबर आणि पत्ता त्याला दिला होता. त्या दोघांनाही फोन करून त्याने सगळं सविस्तर सांगितलं. त्याचे मुंबईत येण्याचे प्रयोजनही सांगितले. दोघांनीही त्याला मदत करण्याचे मान्य केले. त्याच्या आईची मैत्रीण, त्याच्यासोबत मुंबईतील बीकेसी रोडस्थित सायबर सेल  पोलिस स्टेशनमध्ये आली. तेथील  सायबर सिक्युरिटी  एक्सपर्ट ने क्रिशच्या मोबाइलवर मेसेंजर थ्रू येणारे मेसेजेस तपासले. मेसेजेस ज्या डिव्हाइसवरून आले होते त्याचे लोकेशन बांद्र्याच्या आसपासचे दिसत होते. पण आता ते डिव्हाइस वापरात नसावे असे वाटत होते.   त्याच्या डॅडच्या ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट मधील मित्राने आपली ओळख वापरून पोलिसांना ते ठिकाण शोधून काढण्याची विनंती केली. पुढच्या तीन चार दिवसांत पोलिसांनी मोबाइल चे कॉल डिटेल्स वापरून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून नेहाचा पत्ता शोधून काढला. नेहाला तिच्या आई वडिलांबरोबर पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. नेहाला पाहून क्रिश आश्चर्य चकित झाला. इतकी सर्वसामान्य मुलगी अशी फसवणूक करेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सर्व प्रकार कळल्यावर नेहाचे वडील डोक्याला हात लावून खुर्चीत कोसळले. तिची आई रडायला लागली. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मान खाली घालून उभी होती. आज ती  कोणाशीही नजर मिळवू शकत नव्हती. धरणीने दुभंगून आपल्याला पोटात घ्यावं असं तिला वाटत होतं. क्रिश बरोबर आलेली त्याच्या आईची मैत्रीण नेहावर खूप संतापली होती. "काय केलंस तू हे ?? एका मुलाच्या आयुष्याशी खेळताना तुला लाज कशी नाही वाटली?" क्रिश नेहा जवळ जाऊन पाणावलेल्या डोळ्यांनी एवढंच म्हणाला, "You cheated me. you badly played with my emotions. but please don't do this again to anybody." पोलिसांनी नेहाच्या वडिलांना सांगितले की क्रिशने नेहाविरुद्ध कम्प्लेंट फाइल केल्यास तिला १ ते ३ वर्षांची शिक्षा आणि पंचवीस ते पन्नास हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. पण क्रिशचा टुरिस्ट व्हिसा तीसच दिवसांचा  असल्याने आणि तसेही त्याला आता इथे जास्त दिवस थांबण्याची  इच्छा नसल्याने त्याने नेहा विरुद्ध  कंप्लेंट दिली नाही. पोलिसांनी नेहाला समज देऊन सोडून दिले. 
                                   ******
आज दहा दिवसांनी क्रिश मुंबई हून सिडनीला जड मनाने, एक दुस्वप्न सोबत घेउन निघाला होता. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी.


Tuesday, 12 December 2017

मोहजाल


प्रियांका एक मध्यमवर्गीय मुलगी उच्च शिक्षणासाठी मुंबईत वनरूम फ्लॅटमध्ये राहणारी. कॉलेज, क्लास नंतर उरलेल्या वेळात विरंगुळा म्हणून तिला चॅटिंगचा नाद लागला. चॅटिंग करता करता राहुलशी तिची ऑनलाइन भेट, मैत्री झाली. म्हणजे त्याने तरी त्याचे नाव राहुल असे सांगितले. पुढे पुढे त्याच्याशी चॅटिंगचे तिला एवढे व्यसन जडले कि ती आपला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन कायम ऑन मोडवर ठेवू लागली. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती राहुलशी चॅटींग करत असे. एक दिवस राहुलने तिला चॅट विंडोमध्ये एक लिंक पाठवून त्याचा पर्सनल ऑनलाइन अल्बम बघण्यास सांगितले. अल्बममधील राहुलचे फोटो बघून ती अधिकच प्रभावित झाली. पुढच्या चॅटिंगच्या वेळेस तिने राहुलला समक्ष भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. आपण बाहेरगावी जात आहोत असे सांगून राहुलने तिला टाळले. त्या दिवशीपासून तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि तिचा लॅपटॉप  प्रोसेसिंगसाठी जास्त वेळ घेत आहे. राहुलशी तिचे चॅटिंग चालूच होते पण समक्ष भेटण्याची इच्छा जाहीर केल्यास तो काही करून ते टाळत होता. बऱ्याचदा वेबकॅम ऑन करून ती त्याच्याशी चाट करत असे तो मात्र आपल्या लॅपटॉपचा  वेबकॅम खराब झाला आहे असे सांगत असे. असे पाच सहा महिने लोटले दरम्यान प्रियांकाचा कोर्स पूर्ण झाला तिने नोकरीसाठी अप्लाय करायला सुरुवात केली. एका कंपनी कडून तिला नोकरीसाठी इंटरव्ह्यू कॉल आला.  पूर्ण तयारीनिशी ती इंटरव्ह्यूला हजर झाली. इंटरव्ह्यू घेणारा मध्यम वयीन  व्यक्ती तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. इंटरव्ह्यू अपेक्षेपेक्षा छान झाला बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं प्रियांकाने बरोबर दिली. आता ही नोकरी आपल्यालाच मिळणार अशी तिला खात्री वाटू लागली. चार दिवस तिने वाट पाहिली. पाचव्या दिवशी तिने त्या कंपनीला फोन करून चौकशी केली. इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्तीने तिला समक्ष भेटण्यास बोलावले. त्याने तिला जे सांगितले त्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसला.  कशीतरी ती आपल्या फ्लॅटवर आली. त्या माणसाचे शब्द वारंवार तिच्या डोक्यात घणाघात करत होते. "तु हुशार, स्मार्ट आहेस पण पोर्न साइटस् वर वारंवार  दिसणाऱ्या मुलीला आम्ही नोकरी देऊ शकत नाही".
एक एक संदर्भ तिच्या लक्षात येऊ लागला राहुलचे समक्ष भेटण्यास टाळाटाळ करणे,अशात ऑनलाइन कमीत कमी येणे, तिला पाठवलेले लिंक क्लिक करताच लॅपटॉपचे प्रोसेसिंग स्लो होणे. एक एक धागा जुळत गेला. विचार करून मेंदूचे तुकडे पडायला आले. गुगलवर सर्च केल्यावर तिच्या विचारांना पुष्टी मिळाली. तिने गुगल वर सर्च करून  सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटचा नंबर मिळवला आणि त्याला भेटायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी ती सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये आपल्या लॅपटॉपसोबत हजर झाली. त्याने सुमारे अर्धा तास लॅपटॉपचे आणि चाटस् चे  डिटेल्स बघून, आपल्या जवळील अँटी व्हायरस, अँटी स्पायवेअर आणि इतर साँफ्टवेअर वापरून, काही ठोकताळे मांडून तिला सांगितले की राहुलने तिला चॅटिंग करताना जी लिंक पाठवली होती ती त्याच्या ऑनलाइन अल्बमची तर होतीच पण त्याचबरोबर ट्रोजन लिंकही होती ट्रोजन हा व्हायरस सारखाच छुपा प्रोग्रॅम असून  जास्त पॉवरफुल असतो म्हणजे तो तुमच्या लॅपटॉपचा वेबकॅम सुद्धा ऑटोमॅटिकली ऑन करू शकतो. ट्रोजनचं डिटेक्शन अँटीव्हायरस लगेच करतो पण प्रियांकाच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस, अँटी स्पायवेअर काहीही नव्हते. प्रियांकाच्या एक एक गोष्ट लक्षात येऊ लागली वनरूम फ्लॅट  त्यात आपला लॅपटॉप इंटरनेट सहित कायम ऑन असणे, राहुल शी वेबकॅम ऑन करून मारलेल्या गप्पा. तिच्या हाता पायातले त्राण गेल्यासारखे झाले. तिचे फोटो आणि तिच्या अॅक्टिव्हिटीज रेकॉर्ड करून त्यांच्याशी फोटो एडिटर वापरून  छेडछाड करून त्याने तिचे  पोर्न फोटोज् आणि  व्हिडिओज्  बनवून तसल्या साइटस् वर अपलोड केले होते. हे फारच धक्कादायक होते. शहर पोलिस सायबर सेलला तिने रीतसर कम्प्लेंट नोंदवली. आज या घटनेला दोन वर्षे झाली पण राहुल   अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. कारण सायबर क्राईम करणारे  स्वतःचा ट्रेस लागू न देण्याची खबरदारी जरूर घेतात. तेव्हा मित्रमैत्रिणींनो  सावध, सतर्क रहा. अनोळखी लोकांशी कधीही चॅट करू नका. कुठलिही लिंक ओपन करु नका. आणि चांगले इंटरनेट सेक्युरीटी अँटीव्हायरस आपल्या संगणकावर, लॅपटॉप वर जरुर ठेवा.


कविता दातार
Cyber Security Consultant

अकल्पित


माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती.

विजय एक बडा सरकारी अधिकारी. रिटायरमेंटला अजून दोन वर्षे बाकी होती. माधवी गृहिणी, पण वर्षभरापासून मुलगी जान्हवी लग्न होऊन अमेरिकेत आणि मुलगा निखिल नोकरी निमित्त  बेंगलोरला असल्यामुळे ती आपला बराचसा  वेळ एका संस्थेच्या समाजकार्यासाठी देत होती.

विजयने पेपरचे पान उलटले आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्याने उठून दार उघडले. दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या. "कोण हवंय आपल्याला?" विजयने विचारले, "मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम" इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले. "काय झालंय इन्स्पेक्टर?" प्रश्नांकित चेहरा करुन विजयने विचारले. एव्हाना माधवी बाहेर आली होती. "तुम्हाला आमच्या बरोबर पोलिस स्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल." इन्स्पेक्टर म्हणाले. "का? काय झाले?" विजयने विचारले.  "दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे सुमारे साडेचार लाखांची." इन्स्पेक्टरने माहिती दिली. "पण यांत माझा काय संबंध?" विजयला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं  अापल्याला का सांगताहेत. विजय आणि माधवी दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे आलटून पालटून पाहत होते. "तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे. आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे." दीक्षितांनी पुस्ती जोडली. विजय आणि माधवी दोघांच्या पायांखालची जमीन सरकल्या सारखी झाली. काय करावं, काय प्रतिक्रिया द्यावी, त्यांना कळेना.  त्याही अवस्थेत विजय माधवीला धीर देत म्हणाला, "मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस." आणि तो त्या तिघांबरोबर बाहेर पडला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर विजय बसला होता.


दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक दीड वाजेच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापाराच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता. "हे कसे शक्य आहे आमच्या घरी फक्त मी आणि माझी पत्नी असे दोघेच असतो आणि रात्री साडेनऊला तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणी सुद्धा आलेले नव्हते, मग... "  "मिस्टर विजय जोशी.." त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले,  "आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही. " त्यानंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार विजयला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला.

या प्रकाराला वॉर ड्रायव्हिंग असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर एअरक्रॅक सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस अॅडाप्टर, वायफाय पासवर्ड  क्रॅक करण्यासाठी  लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला, कि ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल ती व्यक्ती संकटात येऊ शकते. विजयच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड  आणि फारसे सिक्युर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चुक नसतांना तो नाहक गोवला गेला होता. थोडीशी बेपर्वाई त्यांच्या अंगलट आली होती. दोन महिने  खटला चालला. विजयवर डेबिट कार्ड च्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची मोठी रक्कम भरावी लागली. दरम्यान काही दिवस त्याला नोकरीतून निलंबित राहावे लागले.

मित्र मैत्रिणींनो तुमच्यापैकी बहुतेक जण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा, तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA इन्क्रिप्शनचा वापर करा. स्ट्राँग पासवर्ड लावा. शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत  नसल्यास राऊटर बंद करून ठेवा. घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेस ला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तर सावध आणि सजग राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

कविता दातार
सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट 

मीनू

मीनू




संध्याकाळचे साडेसात वाजले तशी मी लॅपटॉप बंद करून उठले.  अंजूला ऑफिस बंद करण्याच्या आवश्यक त्या सूचना देऊन बाहेर पडणार तेवढ्यात माझा मोबाइल वाजला. 
"हॅलो मावशी, मी मीनू बोलतेय." पलीकडून मीनूचा रडवेला आवाज. "काय गं, काय झाले?" मी थोड्या काळजीनेच विचारले. मीनू माझ्या मैत्रिणीची सुंदर, हुशार मुलगी आणि माझी विद्यार्थिनी. दोन महिन्यांपूर्वीच तिचे लग्न ठरले होते. "तुला भेटायचे आहे, आता लगेच. तू कुठे आहेस?" घायकुतीला येऊन मीनू म्हणाली. "लगेच ये. मी अजून ऑफिसला आहे." असे तिला सांगून मी फोन बंद केला आणि ताटकळत उभ्या असलेल्या अंजूला जायला सांगितले.  पंधराव्या मिनिटाला मिनू माझ्यासमोर बसली होती. डोळे रडून  लाल झाले होते. अजूनही तिचे डोळे सारखे भरून येत होते. आधि मी तिला शांत होऊ दिले. पाणी प्यायला दिले. मग विचारले "काय झालंय मीनू? मला नीट सांगशील का?" उत्तरादाखल तिने तिचा मोबाइल फोन माझ्या पुढ्यात धरला आणि त्यावर एक साइट उघडून तिचे काही आक्षेपार्ह फोटोग्राफ्स मला दाखवत म्हणाली, "बघ मावशी, माझे किती घाणेरडे फोटो या साइटवर अपलोड झाले आहेत." एवढे बोलून ती हमसून रडू लागली. मीनूचे ते अश्लिल, बिभत्स फोटो बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी मोबाइल तिच्या हातातून काढून बाजूला ठेवला आणि माझ्या खुर्चीतून उठून तिच्या जवळ गेले. तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत मी तिला शांत रहाण्यास सांगितले. थोड्याच वेळात स्वतःला सावरत मीनूने सांगायला सुरुवात केली "या फोटोजची लींक मला माझ्या मैत्रिणीने फॉरवर्ड केली. मला कळावे म्हणून. तिच्या नवऱ्याला हे एका पोर्न साइटवर दिसले. अजून असले माझे फोटोज कुठल्या कुठल्या साइट्स वर असतील देवच जाणे. विश्वास ठेव मावशी मी कोणाचे असले फोटोज बघितले सुद्धा नाहीत. मग स्वतःचे काढून घेईन का?" मीनूला रडू आवरत नव्हते. मी हतबुद्ध होऊन तिच्याकडे पहात होते. कुठल्या शब्दांत तिचं सांत्वन करावं, मला कळत नव्हते. थोड्या वेळात मी स्वतःला सावरत म्हटलं "शांत हो मीनू, रडून काहीच होणार नाहीये. या संकटाला कसं तोंड द्यायचं? याचा आपल्याला डोकं शांत ठेवून विचार करायला हवा." "कसं शांत राहू मावशी? हे सगळं माझ्या सासरच्यांना कळलं तर माझं लग्न होऊ शकणार आहे का?" मीनूची शंका रास्त होती. फार वेळ न घालवता भराभर सुत्रं हलवायला हवी  होती. मी लॅपटॉप सुरू केला. तिच्या मैत्रिणीने पाठवलेली लिंक वापरून त्या साइटवर जाउन आधी तिच्या फोटोजचे बारकाईने निरिक्षण केले. फोटोतला मुलीचा चेहरा मीनूचा असला तरी बाकी शरीर दुसर्‍याच कुणा मुलीचे आहे हे तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटू वरून लक्षात आले. ते फोटो ताबडतोब काढून टाकण्याचे त्या साइटला मी विनंतीवजा इमेल केले. ही सर्व घटना तिच्य‍ा होणार्‍या नवर्‍याला माहित असणं जरुरी होतं. बाहेरुन कळण्यापेक्षा आपणच त्याला सांगायचे असे ठरवून त्याला फोन लावला. फोनवर त्याल‍ा काय घडलंय  ते सविस्तर सांगितलं. तो फारच समंजस वाटला. उलट त्याने मीनूची यांत काहि चूक नाही म्हणून तिने फार मनाला लावून घेउ नये अशी तिची समजूत काढली. दुसर्‍या दिवशी सायबर सेल ला जाउन तक्रारअर्ज द्यायचे ठरवले. एव्हाना मीनू बरीच शांत झाल्यासारखी वाटली. फोटोंतला चेहरा मीनूच्या मोबाइल मध्ये असलेल्या तिच्या काही फोटोंशी जुळत असल्याने मी लॅपटॉप बंद करून तिचा मोबाइल नीट तपासून बघायचे ठरवले. सर्वप्रथम मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तिने कुठले अॅप्स इन्स्टॉल केले आहेत ते बघितले. ‍त्यात जास्त करून मेकअप आणि हेल्थ संबधित अॅप्स मला दिसले. प्रत्येक अॅपच्या परमिशन्स मी तपासल्या. त्यापैकी एका अॅपला सगळ्याच परमिशन्स दिलेल्या दिसत होत्या. जेव्हा आपण स्मार्टफोनवर एखादे अॅप इन्स्टॉल करतो तेव्हा ते अॅप तुमच्या फोनचा कसा वापर करणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणारा एक स्क्रीन येतो. त्या स्क्रीनवर तुम्हाला ओके किंवा कॅन्सल क्लिक करावे लागते. हे करताना बहुतेक जण फारसा विचार करत नाहीत. इथेच  मीनूचे चुकले होते, तिने या अॅपला कॅमेरा, स्टोरेज, मीडिया फाइल्स इत्यादी सगळेच एक्सेस परमिशन्स दिलेले दिसत होते. त्यामुळे याच अॅपच्या थ्रू तिचे फोटोग्राफ्स कुठेतरी अपलोड होऊन त्यांचं मॉर्फिंग (दुसर्‍या फोटोसोबत मिक्सिंग) केलं जात असावं.  जरुरी तेवढे अॅप्स तिच्या स्मार्टफोन वर ठेवून बाकीचे अॅप्स मी अनइन्स्टॉल केले. दुसऱ्या दिवशी सायबर सेलला तिने रितसर कम्प्लेंट नोंदवली. त्याचा तपास अजूनही चालू आहे. आज मीनूचे लग्न होऊन सहा महिने झाले आहेत आणि ती सुखात आहे. 

मित्र मैत्रिणींनो मीनूची ही सत्य घटना मी तिच्या संमतीने तुमच्याशी शेअर करत आहे. हेतू एवढाच की आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात.
स्मार्टफोनवर कुठलेही अॅप इन्स्टॉल करताना गुगलवर त्याचे रिव्ह्य़ूज तपासा. त्याला आपण कोणत्या परमिशन्स देत आहोत ते नीट बघा. अॅपला दिलेल्या परमिशन्स नंतरही सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही काढून घेऊ शकता. व्हायाप्रोटेक्ट आणि ओएस मॉनिटर सारखे अॅप्स वापरून तुमच्या स्मार्टफोनवरचा डेटा लीक तर होत नाही आहे ना? हे बघू शकता. मुळांत असलेले आणि जरुरी तेवढेच अॅप्स आपल्या स्मार्टफोनवर ठेवा. सावध आणि सतर्क राहा. पुन्हा भेटू या एका नव्या सायबर क्राइम स्टोरीसह.

कविता दातार